तहसीलदारांनी ७५ लाख रुपयांचा अपहार केल्याची तक्रार

बेळगाव – दळणवळण बंदीच्या काळात येथील खानापूर तालुक्यात मार्च २०२० ते मे २०२० पर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही. तरीही या काळात पेंडल व्यवस्था, पोलीस बॅरिकेट्स, जेवण, ‘सॅनिटायझर’, ‘मास्क’ आणि इतर कामे यांसाठी ७५ लाख रुपये व्यय दाखवण्यात आला आहे. एवढा व्यय करून कोणतेही काम करण्यात आले नाही. त्या कामासाठी कोणतीही निविदा संमत करण्यात आली नाही. खानापूर तहसीलदार रेश्मा तालीकोटी यांनी कोरोनाच्या नावाखाली पैशांचा अपहार केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते गंगाधर दोडमनी यांनी केला आहे. खोटी कागदपत्रे आणि देयके सादर केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यांना सर्व माहिती ही माहिती अधिकाराच्या अंतर्गत मिळाली आहे. या प्रकरणी त्यांनी एसीबीकडे तक्रार प्रविष्ट केली असून यासंदर्भात पुढील तपास करण्याचे आश्‍वासन त्यांना देण्यात आले आहे. (संदर्भ : belgavkar.com)