बालसाधकांच्या व्यष्टी साधनेच्या आढाव्याच्या माध्यमातून ‘आगामी ‘हिंदु राष्ट्रा’ची पिढी कशी आदर्श असेल ?’, याची आलेली प्रचीती !
‘अमरावती जिल्ह्यामध्ये मागील २ मासांपासून (महिन्यांपासून) बालसाधकांचा व्यष्टी साधनेचा आढावा चालू आहे. मला देवाच्या कृपेने व्यष्टी साधनेचा आढावा घेण्याची संधी मिळाली आहे. त्यामध्ये प्रतिदिन ८ – ९ बालसाधक मला व्यष्टी साधनेचा आढावा देतात. सर्व बालसाधक १२ वर्षांपेक्षा लहान आहेत. त्यांच्या माध्यमातून गुरुदेवांनी शिकवलेली काही सूत्रे आणि प्रसंग पुढे दिले आहेत.
१. ५ टप्प्यांत चूक सांगणे, त्यावर सांगितलेले प्रायश्चित्त घेणे आणि लगेचच प्रायश्चित्त घेतल्याचा आढावाही देणे
एकदा व्यष्टी साधनेच्या आढाव्यामध्ये एका बालसाधिकेने ५ टप्प्यांत (टीप) तिची चूक सांगितली. प्रायश्चित्त लक्षात न आल्याने तिने ते मला विचारले. तेव्हा मी तिला ‘दहा उठा-बशा काढ’, असे सांगितले. त्यानंतर तिच्या भावाचा आढावा होईपर्यंत तिने लगेचच १० उठा-बशा काढल्या. भावाचा आढावा झाल्यावर उठा-बशा काढल्याचे तिने मला सांगितले. या प्रसंगात बालसाधिकेमधील ‘तत्परता आणि आज्ञापालन’ हे गुण माझ्या लक्षात आले. ‘तिने लगेचच प्रायश्चित्त घेतल्याचा आढावाही दिला’, हे मला तिच्याकडून शिकता आले.
सर्व बालसाधक आरंभी चिंतनसारणीनुसार आढावा देत होते आणि नंतर केवळ झालेली चूकच सांगत होते. काही दिवसांनी एका बालसाधिकेने तिची चूक ५ टप्प्यांत सांगितली. दुसर्या दिवसापासून प्रत्येक बालसाधक ५ टप्प्यांतच चुका सांगू लागले आणि काही दिवसांतच ५ टप्प्यांत चूक सांगून झाल्यावर त्यासाठी प्रायश्चित्त सांगून ते पूर्ण केल्याचा आढावाही देऊ लागले, उदा. एका बालसाधिकेने तिच्या वडिलांचे ऐकले नव्हते. ‘ती चूक आहे’, असे तिच्या लक्षात आल्यावर तिने ती चूक स्वीकारून त्यावर लगेचच प्रायश्चित्त म्हणून १० उठा-बशा काढल्या आणि दुसर्या दिवशी ‘प्रायश्चित्त पूर्ण केले’, असा परिपूर्ण आढावा दिला.
टीप : ५ टप्पे म्हणजे १. चूक, २. त्यामागील स्वभावदोष, ३. चुकीचे परिणाम, ४. चूक होऊ नये, यासाठी काढलेली उपाययोजना आणि ५. घेतलेले प्रायश्चित्त
२. स्वतःच्या प्रतिमेचा कोणताच अडथळा न ठेवता प्रांजळपणे चुका स्वीकारणे
एकदा एका बालसाधिकेला तिच्या वडिलांचा राग आला होता. त्यामुळे तिने त्यांच्याशी अबोला धरला होता. चूक सांगताना ‘तिला राग का आला होता आणि तिच्या मनात काय प्रतिक्रिया आल्या होत्या ?’, ही प्रक्रिया तिने अगदी सहज अन् प्रांजळपणे सांगितली. तेव्हा मी तिला समजावून सांगितले, ‘‘असे करायला नको.’’ तेव्हा तिने तेही अगदी सहजतेने स्वीकारले आणि तिच्या बाबांची क्षमा मागितली अन् ती त्यांच्याशी बोलू लागली.
‘बालसाधक स्वतःच्या प्रतिमेचा कोणताच अडथळा न ठेवता प्रांजळपणे चुका स्वीकारून योग्य प्रकारे स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवतात’, हे मला प्रकर्षाने शिकायला मिळाले.
३. बालसाधकांविषयी जाणवलेली अन्य वैशिष्ट्यपूर्ण सूत्रेअ. बालसाधक त्यांच्याकडून होणारे प्रयत्न अत्यंत प्रांजळपणे आणि प्रामाणिकपणे सांगतात.
अ. भावजागृतीसाठीच्या प्रयत्नांमध्ये त्यांनी भावप्रयोग घेणे शिकून घेतले आहे.
आ. ते बुद्धीचा कोणताही अडथळा न ठेवता प्रयत्न करत असल्यामुुळे त्यांच्या पालकांचेही व्यष्टी साधनेचे गांभीर्य वाढले आहेत. बालसाधक त्यांच्या पालकांकडून होणार्या चुका त्यांना स्पष्टपणे सांगून त्यांना साधनेत साहाय्य करत आहेत.
इ. काही बालसाधक छोट्या-छोट्या कविता अथवा गीते यांतून त्यांचे विचार व्यक्त करतात.
ई. हे बालसाधक ‘आगामी ‘हिंदु राष्ट्रा’ची पिढी किती आदर्श असेल ?’, याची प्रचीती देतात.
‘हे गुरुदेवा, ‘तुम्ही आणि पू. पात्रीकरकाका यांनी मला या बालसाधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेण्याची संधी दिलीत अन् त्यांच्याकडून मला शिकायला मिळालेली सूत्रे लिहून घेतलीत’, याविषयी मी आपल्या चरणी संपूर्ण शरणागतभावाने कृतज्ञ आहे.’
– कु. शबरी देशमुख, अमरावती (६.७.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |