‘लॉकडाऊन’च्या काळात विदर्भातील दैवी बालसाधकांनी व्यष्टी साधनेचे चांगले प्रयत्न करणे आणि त्यामुळे साधक अन् पालक यांच्या प्रयत्नांत वाढ होणे
१. दैवी बालसाधिका कु. नीरजा कुलकर्णी (वय १० वर्षे) हिने स्वतःचा व्यष्टी साधनेचा आढावा दायित्व असलेल्या साधकांना देण्यास आरंभ करणे आणि तिच्याकडून जिल्ह्यातील अन्य दैवी बालसाधकांनीही प्रेरणा घेणे
‘दळणवळण बंदीच्या काळात अमरावती जिल्ह्यात साधकांचे गट करून प्रतिदिन व्यष्टी साधनेचा ‘ऑनलाईन’ आढावा घेण्याचे नियोजन साधारण एप्रिल २०२० च्या पहिल्या आठवड्यापासून चालू केले होते. आधुनिक वैद्या (सौ.) सुखदा कुलकर्णी या प्रतिदिन स्वतःचा आढावा दायित्व असलेल्या साधकांना देत होत्या. प्रतिदिन आईला आढावा देतांना पाहून त्यांची मुलगी दैवी बालसाधिका कु. नीरजा कुलकर्णी (वय १० वर्षे) आईच्या मागे लागून म्हणत होती, ‘‘मीसुद्धा नामजप करते. अत्तर-कापूर यांचे उपाय करते. मलाही आढावा द्यायचा आहे.’’ तेव्हा दायित्व असलेल्या साधकांंना विचारून तीही आढावा देऊ लागली. तिची तळमळ पाहून ‘दायित्व असलेल्या साधिकेने जिल्ह्यातील अन्य दैवी बालसाधकांना व्यष्टी साधनेचे गांभीर्य सांगून त्यांचाही आढावा घ्यावा’, असे सुचवले. त्यानुसार एप्रिलच्या तिसर्या आठवड्यापासून बालसाधकांचा आढावा चालू झाला. तेव्हापासून आजपर्यंत हा आढावा नियमित होत आहे. या आढाव्यात ४ ते १२ वर्षे या वयोगटातील ७ – ८ बालसाधक चिंतनसारणीप्रमाणे आढावा देतात. (त्यामध्ये प्रामुख्याने ‘नामजप, प्रार्थना, कृतज्ञता, अत्तर आणि कापूर यांचे उपाय, आवरण काढणे, स्वयंसूचना सत्र करणे, देवीकवच आणि सर्व मंत्रजप ऐकणे अन् भावजागृतीचे प्रयत्न, गुरुस्मरण, आत्मनिवेदन, क्षमायाचना करणे, साष्टांग नमस्कार, तसेच एक चूक ५ टप्प्यांत (खोलात जाऊन) सांगणे’ इत्यादींचा समावेश आहे.)
२. बालसाधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा चालू झाल्यापासून त्यांचा नामजप नियमित होणे आणि त्यांच्यात सकारात्मक पालट जाणवणे
अमरावती जिल्ह्यातील प्रतिसाद पाहून अन्य चार जिल्ह्यांतही असे आढावे चालू करण्यात आले आहेत. त्यांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. या व्यष्टी साधनेच्या आढाव्यामुळे बालसाधकांचा नामजप नियमित होत आहे. काही बालसाधकांनी दैनंदिनी बनवली आहे आणि त्यानुसार प्रत्येक कृती करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. त्यांना स्वतःच्या चुकांची जाणीव होत आहे, तसेच ते घरातील व्यक्तींशी आदराने बोलतात. त्यांची ऐकण्याची वृत्ती आणि नम्रता वाढली आहे अन् चिडचिड, हट्ट, आवड-नावड न्यून झाली आहे.
३. बालसाधकांच्या व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांसह आढावा घेणारे आणि बालसाधकांचे पालक यांच्या प्रयत्नांमध्येही वाढ होणे, यामध्ये धर्मप्रेमींची मुलेही सहभागी होणे आणि त्यामुळे धर्मप्रेमींचे प्रयत्नही वाढणे
बालसाधकांच्या व्यष्टी साधनेच्या आढाव्यांमुळे आढावा घेणार्या साधकांचे व्यष्टी साधनेचे प्रयत्न वाढले आहेत. ‘बालसाधकांकडून प्रांजळपणाने आढावा कसा द्यायचा ?’, हे शिकायला मिळते’, असे त्यांचा आढावा घेणार्या साधकांनी सांगितले. जिल्ह्यांमध्ये या बालसाधकांच्या पालकांचा सत्संग घेण्यात आला. तेव्हा ‘बालसाधकांच्या वाढलेल्या प्रयत्नांमुळे पालकांचे साधनेचे प्रयत्नसुद्धा वाढत आहेत’, असे समजले. यामध्ये धर्मप्रेमींची मुलेही सहभागी आहेत. त्या धर्मप्रेमींचे प्रयत्नही वाढले आहेत.’
– (पू.) श्री. अशोक पात्रीकर, अमरावती (१.७.२०२०)