भोंगळ आणि भ्रष्ट कारभाराच्या विरोधात भाजपचा कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकार्यांना घेराव
कणकवली – येथील उपजिल्हा रुग्णालयातील विविध समस्या आणि वैद्यकीय अधिकारी रुग्णांकडून पैसे घेत असल्याचा आरोप करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी २१ नोव्हेंबरला येथील उपजिल्हा रुग्णालयाला धडक देत वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश टाक यांना घेराव घातला अन् खडसावले. ‘जोपर्यंत जिल्हा शल्यचिकित्सक येत नाहीत, तोपर्यंत येथून जाणार नाही’, अशी चेतावणी आंदोलनकर्त्यांनी दिली. त्यामुळे घटनास्थळी आलेले अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
(सौजन्य : Sindhudurg 24 taas)
या वेळी संतप्त कार्यकर्त्यांनी सांगितले की, कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील अस्वच्छतेसह अन्य समस्यांविषयी यापूर्वी आवाज उठवूनही वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश टाक यांनी याकडे दुर्लक्ष केले, तसेच वैद्यकीय दाखल्यासाठी रुग्णाकडून पैसे घेतले जातात. त्यामुळे आंदोलन करावे लागले. (कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासन सर्वांना स्वच्छतेचे धडे देत असतांना शासकीय रुग्णालयातच अस्वच्छता असेल आणि जनतेने लक्षात आणून देऊनही त्यावर कार्यवाही होत नसेल, तर शासनाने प्रथम वैद्यकीय अधिकार्यांचेच स्वच्छतेविषयी प्रबोधन करणे आवश्यक आहे ! – संपादक)
या वेळी रुग्णांना भेडसावणार्या समस्यांसह उपजिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी रुग्णांकडून पैसे घेतले जात असल्याचा आरोपही भाजप पदाधिकार्यांनी केला, तसेच एका वैद्यकीय दाखल्यासाठी संबंधितांकडून पैसे घेतल्याचा व्हिडिओ असल्याचे पदाधिकार्यांनी सांगितले असता डॉ. टाक यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. अखेर डॉ. पाटील यांनी रुग्णालयात धाव घेत रुग्ण कक्षाची पहाणी केली अन् कक्षातील दुरावस्थेविषयी अप्रसन्नता व्यक्त केली. ‘२४ नोव्हेंबरला जिल्हा शल्यचिकित्सकांच्या उपस्थितीत भाजप पदाधिकार्यांशी चर्चा करून समस्या सोडवू’, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेराव मागे घेतला. १ घंटा हे आंदोलन चालू होते. (आज शासकीय कर्मचार्यांना सहस्रो रुपयांपासून लाखो रुपयांपर्यंत वेतन मिळते. असे असतांना वैद्यकीय दाखले आणि शस्त्रक्रिया यांसाठी रुग्णांकडून पैसे घेतले जात असतील, तर ते सर्वथा लज्जास्पद आहे ! आरोपांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केल्यास असे पुन्हा करण्याचे कुणाचे धाडस होणार नाही ! – संपादक)