सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ८ सहस्र विद्यार्थ्यांच्या निकालाची पुनर्तपासणी !
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचा भोंगळ कारभार !
निकालामध्ये चुका का राहिल्या आहेत, हे विद्यापिठाने सांगायला हवे. यामध्ये दोषी असणार्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी. काही केले तरी यामुळे विद्यार्थ्यांना झालेल्या मनस्तापाची हानी कधीही भरून निघणार नाही.
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाने घेतलेल्या ऑनलाइन आणि ऑफलाइन (प्रत्यक्ष) परीक्षांचे निकाल घोषित करण्यात येत असतांना निकालातील गोंधळ आणि चुका समोर येऊ लागल्या आहेत. परीक्षा देऊनही १८ सहस्र विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर अनुपस्थित किंवा शून्य गुण असे नमूद केले आहे. त्यामुळे विद्यापिठाकडून ८ सहस्र विद्यार्थ्यांच्या निकालाची पुनर्तपासणी करण्यात येत असून १० सहस्र ३३ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते, अशी माहिती विद्यापिठाने दिली. युवक क्रांती दलाच्या शिष्टमंडळाने कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांची भेट घेऊन निकालात त्रुटी असलेल्या ७०० विद्यार्थ्यांची यादीच दिली आहे. तसेच तातडीने उपाययोजना न केल्यास आंदोलन करण्याची चेतावणी देण्यात आली आहे.
याविषयी विद्यापिठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे म्हणाले, निकालात त्रुटी असल्याच्या तक्रारी येऊ लागल्यावर विद्यापिठाने निकालाची पुनर्तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्यात प्रत्येक विद्यार्थ्याचा निकाल स्वतंत्रपणे विचारात घेतला जाईल. परीक्षा ऑनलाइन पद्धतीने झाल्याने प्रत्येक विद्यार्थ्यांचे डिजिटल पुरावे उपलब्ध आहेत. तेही विचारात घेतले जातील.