कोरोनामुळे कार्तिकी यात्रा जिल्हा प्रशासनाने केली रहित !
यात्रा कालावधीत बससेवाही बंद रहाणार
एकादशीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – वाढत्या कोरोना संसर्गामुळे या वर्षीची कार्तिकी यात्रा जिल्हा प्रशासनाने रहित केली आहे. यात्रा काळात भाविकांनी गर्दी करू नये यासाठी २५ आणि २६ नोव्हेंबर या दिवशी शहर आणि परिसरातील ८ गावांमध्ये संचारबंदी लागू केली जाणार आहे, तसेच २२ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत पंढरपुरातून बाहेर जाणारी आणि बाहेरून शहरात येणारी बस वाहतूकही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालख्या आणि दिंड्या यांना यात्रा काळात प्रवेशबंदी करण्यात आली असून शहर अन् परिसरातील ३५० मठ बंद ठेवण्यात येणार आहेत.
निवडणूक आयुक्तांनी कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा करण्यास अनुमती दिली असून २६ नोव्हेंबर या दिवशी कार्तिकी एकादशीला श्री विठ्ठलाची महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सपत्नीक होणार आहे. मागील ८ मासांपासून बंद असलेले श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर मुखदर्शनासाठी उघडण्यात आले आहे. प्रतिदिन २ सहस्र भाविकांना ऑनलाईन दर्शन पास उपलब्ध करून देण्यात आले आहेत; मात्र यात्रा काळात ऑनलाईन दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे.