महाविकास आघाडी सरकारने जनतेची पूर्णतः फसवणूक केली ! – आमदार सुधीर गाडगीळ

मारुति चौक येथे भाजपच्या वतीने वीजदेयक फाडून निदर्शने

मारुति चौक येथे आमदार सुधीर गाडगीळ (मध्यभागी तोंडाला निळा मास्क लावलेले) यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करतांना भाजप कार्यकर्ते

सांगली, २० नोव्हेंबर (वार्ता.) – राज्य सरकारने कोरोनाच्या काळात वीजदेयक माफ करण्याचे आश्‍वासन दिले होते; परंतु सरकारने पैसे नाहीत, हे कारण सांगत त्यांचा शब्द फिरवला आहे. आता आघाडी सरकार त्यांचा शब्द फिरवून ‘आम्ही असे बोललोच नाही’,  असे सांगून केंद्र सरकारने आम्हाला पैसे द्यावेत, अशी मागणी करत आहे. महाविकास आघाडी सरकारने जनतेची पूर्णतः फसवणूक केली असून ऊर्जामंत्र्यांनी दिलेला शब्द फिरवल्याने त्यागपत्र द्यावे, अशी मागणी भाजप आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांनी केली. मारुति चौक येथे भाजपच्या वतीने २० नोव्हेंबर या दिवशी वीजदेयके फाडून निदर्शने करण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी शहर जिल्हाध्यक्ष श्री. दीपकबाबा शिंदे, महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. स्वाती शिंदे, नगरसेवक श्री. युवराज बावडेकर, श्री. लक्ष्मण नवलाई, सर्वश्री प्रकाश बिरजे, पृथ्वीराज पवार, गौतम पवार, श्रीकांत शिंदे, प्रसिद्धीप्रमुख श्री. केदार खाडिलकर यांसह अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.