मुंबईतील वीजपुरवठा तांत्रिक कारणामुळेच खंडित झाला होता – आयआयटी
मुंबई – मुंबईसह उपनगरांमध्ये १२ ऑक्टोबर या दिवशी वीजपुरवठा तांत्रिक कारणामुळेच खंडित झाला होता, असा अहवाल आयआयटी मुंबईचे विद्युत अभियांत्रिकी शाखा विभाग प्रमुख प्रा. बी.जी. फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीने दिला आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता.
मुंबईतील वीज पुरवठा खंडित प्रकरणी तीन समित्या स्थापन झाल्या असून त्यातील एका समितीच्या सादर झालेल्या अहवालात म्हटले आहे की, व्यवस्थेकडून त्वरित कार्यवाही व्हायला विलंब झाला असल्यामुळे एकाच वेळी संपूर्ण मुंबई आणि उपनगरांतील वीज गेली होती. मुंबईला पुरवण्यात येणारी अतिरिक्त वीज आयलँडिंग सुविधा नीट ठेवणे आवश्यक होते; मात्र ती नीट नव्हती. अशी परिस्थिती उद्भवणे अनपेक्षित होते. त्यामुळे अशा परिस्थितीत जी जलद प्रक्रिया व्हायला हवी होती, ती झाली नाही.