पुण्यातील प्रस्तावित साथरोग रुग्णालय ठाणे येथे उभारण्याचा निर्णय
पुणे – जगभरातील विविध आजारांच्या साथींचा संसर्ग पुण्यात सातत्याने दिसत आहे. स्वाइन फ्लू पाठोपाठ आता ११ वर्षांनंतर कोरोना महामारीची साथ पुणे येथे मुंबईपेक्षा अधिक तीव्रतेने आहे. त्यामुळे पुण्यात साथरोग रुग्णालय होणे अत्यंत आवश्यक आहे. ११ वर्षांपूर्वी स्वाइन फ्लूच्या साथीच्या वेळी साथरोग रुग्णालय स्थापन करण्याची केलेली घोषणा अद्याप पूर्ण झालेली नाही. राज्य सरकारने पुण्याऐवजी ठाण्यात साथरोग रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
११ वर्षांत पुण्यात कायमस्वरूपी साथरोग रुग्णालय न झाल्याविषयी स्वयंसेवी संस्थांनी खंत व्यक्त केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नायडू रुग्णालयाचे साथरोग रुग्णालयात रूपांतर करण्यात आले. पुणे महापालिका नायडू रुग्णालयाच्या जागी स्व. अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याची सिद्धता करत आहे. त्यामुळे नायडू रुग्णालयाचे ‘तात्पुरते साथरोग रुग्णालय’ असे असलेले अस्तित्व संपुष्टात येणार आहे. त्यामुळे कायमस्वरूपी साथरोग रुग्णालय हवे, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.