सिंधुदुर्ग जिल्ह्यात समुद्रकिनार्‍यावरील जलक्रीडा प्रकार चालू करण्यास अनुमती ! – जिल्हाधिकारी

सिंधुदुर्गनगरी २० नोव्हेंबर (जि.मा.का.) – ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत पर्यटन क्षेत्र, तीर्थस्थळे, प्रार्थनास्थळे चालू करण्यास अनुमती देण्यात आली आहे, तसेच उपाहारगृहे, रेस्टॉरंट यांसह खासगी वाहतुकीसही अनुमती देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात समुद्रकिनार्‍यावर अनेक पर्यटक भेट देत आहेत.त्या अनुषंगाने जिल्ह्यातील समुद्रकिनार्‍यावरील सर्व जलक्रीडा प्रकार चालू करण्यास अनुमती देणारे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत.

जिल्ह्यातील समुद्रकिनार्‍यावर विविध जलक्रीडा जसे ‘बोटिंग’, ‘एटीव्ही रायडींग’ चालवल्या जातात. कोविड-१९ विषाणूच्या संसर्गाच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून शासनाने लागू केलेल्या निर्बंधांमुळे हे जलक्रीडा प्रकार बंद करण्यात आले आहेत; पण सध्या ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत हॉटेल आणि अनुषंगिक आस्थापने, विश्रांतीगृहे, गेस्ट हाऊस, तसेच ‘इनडोअर अन् आऊटडोअर’ क्रीडा प्रकार मानक कार्यप्रणालीचा अवलंब करून चालू करण्यास मान्यता दिली आहे. सर्व प्रकारच्या खासगी, सार्वजनिक वाहतुकीसही मान्यता दिली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक जिल्ह्यातील समुद्रकिनार्‍यांना भेटी देत आहेत. या पार्श्‍वभूमीवर समुद्रकिनार्‍यावर चालणारे जलक्रीडा प्रकार चालू करण्यास अनुमती देणारे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम २५ आणि ३०, तसेच महाराष्ट्र कोविड-१९ उपाययोजना नियम २०२० मधील नियम १० अन्वये जिल्हाधिकार्‍यांना यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार त्यांनी समुद्रकिनार्‍यावरील सर्व प्रकारच्या जलक्रीडा चालू करण्याचे आदेश दिले आहेत.

या जलक्रीडांच्या ठिकाणी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्याद्वारे निर्गमित केलेल्या अन् सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन, पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाद्वारे देण्यात आलेल्या मानक कार्यप्रणालीचा अवलंब करणे बंधनकारक आहे. शारीरिक अंतर पाळणे, मास्क घालणे, वेळोवेळी हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे, हे सर्व संबंधितांवर बंधनकारक आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड विधान संहिता कलम १८८, २६९, २७०, २७१, तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या कलम ५१ सह अन्य तरतुदीनुसार फौजदारी शिक्षेस पात्र राहील, असे आदेश जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांनी दिले आहेत.