सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या देहातून प्रक्षेपित होणार्या चैतन्यामुळे साधकाला आलेली अनुभूती
१. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या डाव्या पायाला बिंदूदाबन करण्याची सेवा करतांना हाताला विजेचा झटका बसणे, त्याप्रमाणे झटका बसूनही त्यातून वेगळेच अनुभवता येणे आणि नंतर मनातील विचार न्यून होणे
‘९.१०.२०१९ या दिवशी सायंकाळी ७ वाजून ५५ मिनिटांनी मी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या डाव्या पायाला बिंदूदाबन करण्याची सेवा करत होतो. त्या वेळी माझ्या डाव्या हाताला विद्युतवाहक तारेला हात लागल्यावर जसा झटका (शॉक) बसतो, त्याप्रमाणे झटका बसला आणि माझा हात सद्गुरु पिंगळेकाकांच्या पायापासून दूरवर फेकला गेला, तसेच माझ्या डाव्या हाताच्या कोपराजवळ हाड मोडल्याचा आवाज झाला. माझ्या शरिराच्या डाव्या भागात झिणझिण्या आल्या. त्या वेळी कोणत्याही प्रकारची विद्युतवाहक तार जवळ नव्हती किंवा ज्याचा स्पर्श होऊन धक्का लागू शकतो, असे अन्य काहीही जवळ नव्हते. मला असा अनुभव प्रथमच आला. मला धक्का बसूनही त्याचा त्रास न होता वेगळाच अनुभव आला. मला झटका बसल्यानंतर माझ्या मनातील विचार न्यून झाले. मी सद्गुरु पिंगळेकाकांना याविषयी सांगितले.
२. दुसर्या दिवशी भावसत्संगात ‘सेवा करतांना चैतन्यामुळे झटका बसला’, असे एका साधिकेने सांगितल्यावर ‘देवाने तुमच्या अनुभूतीचे उत्तर दिले’, असे सद्गुरु पिंगळेकाकांनी सांगणे
दुसर्याच दिवशी रात्री सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्यावर बिंदूदाबन करत असतांना आम्ही भावसत्संगात सांगत असलेली सूत्रे ऐकत होतो. त्या वेळी एका साधिकेने सांगितले, ‘‘सेवा करतांना मला झटका बसला. मला झटका बसल्याने माझ्यावरील अनिष्ट शक्तीचे काळे आवरण नष्ट झाले. गुरुदेवांमधील चैतन्यामुळे मला झटका बसला.’’ त्या वेळी सद्गुरु पिंगळेकाकांनी सांगितले, ‘‘या ताईंना झटका बसला. काल तुम्हालाही झटका बसला होता. देवानेच तुम्हाला तुमच्या अनुभूतीचे उत्तर दिले.’’
३. कृतज्ञता
सद्गुरु पिंगळेकाकांनी असे सांगितल्यानंतर माझ्या लक्षात आले, ‘सनातन संस्थेच्या संतांच्या देहातून प्रक्षेपित होणारी शक्ती आणि चैतन्य हे पुष्कळ अधिक प्रमाणात आहे.’ देवाने मला त्याचा अनुभव घेण्याची संधी दिली. त्याबद्दल मला कृतज्ञता वाटली. ‘देव आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर कोणत्याही माध्यमातून देत असतो. केवळ आपण ते ग्रहण करायला हवे’, हे मला शिकायला मिळाले.’
– एक साधक, देहली (११.१०.२०१९)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |