सद्गुरु चारुदत्त पिंगळे यांनी गुरु-शिष्य नात्यासंदर्भात व्यक्त केलेले अपूर्व विचार !
‘गुरूंसंदर्भातील शिष्याच्या विचारांत टप्प्या-टप्प्याने कसा पालट होत जातो, याची अद्वितीय माहिती सद्गुरु चारुदत्त पिंगळे यांनी या लेखात दिली आहे. मला कितीही विचार केला असता, तरी असे विचार सुचले नसते. सद्गुरु चारुदत्त पिंगळे यांच्याकडून अमूल्य ज्ञान मिळाल्याविषयी मी त्यांचा कृतज्ञ आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
१. ‘गुरुऋण कधीच फेडले जात नाही’, याची जाणीव होणे
१ अ. ‘गुरूंचे ऋण फेडले पाहिजे’, असा अहंकार असणे आणि सेवा करतांना ‘आपण गुरुऋण फेडण्याचा जेवढा प्रयत्न करतो, तेवढे ते वाढतच जाते’, याची जाणीव होणे : ‘गुरुदेवांचे ऋण आपण कधीच फेडू शकत नाही. मला मागील काही प्रसंग आठवतात. प्रथम मला ‘गुरूंचे ऋण फेडले पाहिजे’, असा अहंकार होता. ‘गुरूंचे ऋण आम्ही कधीच फेडू शकत नाही’, हे मला समजत नव्हते. नंतर सेवा करत असतांना मला जाणवले, ‘मी गुरूंसाठी जे काही करतो (सेवा), त्यासाठी मला जे मिळते (आनंद), ते गुरुच देतात. त्यामुळे आपण गुरुऋण फेडण्याचा जेवढा प्रयत्न करतो, तेवढे आपले ऋण वाढतच जाते. त्या वेळी गुरूंनी सुचवले, ‘माझ्याकडून एवढे ऋण (कर्ज) घे की, ते फेडता येणार नाही.’
१ आ. ‘गुरुदेवांचे सेवाकार्य वाढवत रहायचे आणि त्यासाठी गुरुदेवांजवळच बळ मागायचे’, असा भाव निर्माण होणे अन् यातूनच स्वतःची अकार्यक्षमता लक्षात येऊन ‘सर्वकाही गुरुच करतात’, याची अनुभूती येणे : तेव्हा माझ्यामध्ये असा भाव उत्पन्न झाला, ‘आता ऋण फेडणे म्हणजे त्यांचे सेवाकार्य वाढवणे आणि त्यासाठी जे काही लागेल, ते त्यांच्याकडेच मागायचे. ते इतके मागायचे की, गुरु म्हणतील, ‘आता तू ते फेडू शकणार नाहीस.’ त्या वेळी माझी अकार्यक्षमता माझ्या लक्षात आली आणि ‘मी तर काहीही करू शकत नाही’, याची मला जाणीव झाली. ‘सर्वकाही गुरूच करत आहेत’, ही अनुभूती गुरुदेव देत आहेत.
२. ‘आपण असमर्थ आहोत’, याचे विस्मरण झाल्यावर गुरूंनीच त्याचे स्मरण करून देणे
२ अ. पूर्ण विश्वामध्ये ज्यांच्या चरणी शरण जावे, असे समर्थ केवळ गुरुदेवच असणे : दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये जे बोधचित्र येते, ते पुष्कळ गहन आहे. त्यातील ‘समर्थ’ हा तीन अक्षरांचा शब्द पुष्कळ गहन आहे. पूर्ण विश्वामध्ये केवळ एकच समर्थ आहेत, ज्यांच्या चरणी आपण शरण जाऊ शकतो, ते म्हणजे गुरुदेव !
२ आ. ‘तुझ्या माध्यमातून मी कार्य करत आहे’, याचे गुरुदेवांनीच स्मरण करून देणे : ‘तुझ्या माध्यमातून मीच कार्य करत आहे. तू तर केवळ निमित्तमात्र आहेस’, याची अनुभूती गुरुदेव देतात. मधल्या कालावधीमध्ये हा भाव मी विसरलो होतो. गुरुदेवांनी मला या गोष्टीचे आतून स्मरण करून दिले. ते म्हणाले, ‘आता तू नाही, तर मीच कार्य करत आहे, याचीच अनुभूती घे.’
३. ‘रामनाथी आश्रमात जाऊन गुरूंना भेटावे’, असे वाटणे आणि त्या वेळी ‘आपण स्थुलातून रामनाथीमध्ये अन् गुरुदेवांच्या देहातही अडकलो आहोत’, हे लक्षात येणे
माझ्या मनात मधे मधे ‘रामनाथी आश्रमात जावे’, असा विचार येत होता. मला वाटायचे, ‘रामनाथीला नामजपादी उपायांसाठी जावे. त्या वेळी गुरुदेवांचे दर्शन तरी होईल.’ त्या वेळी माझ्या लक्षात आले, ‘मी स्थुलातून रामनाथीमध्ये आणि गुरुदेवांच्या देहातही अडकलो आहे.’ ‘त्यांचे दर्शन किंवा भेट व्हायला हवी’, असे मला वाटत होते. मला हे ठाऊक होते की, याची आवश्यकता नाही, तरीही मी ते आकर्षण टाळू शकत नव्हतो.
४. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या सान्निध्यात विचारप्रक्रियेमध्ये पालट होत असल्याचे जाणवणे
चार मासांपूर्वी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ या देहली सेवाकेंद्रात आल्या होत्या. त्या वेळी माझ्या आंतरिक प्रक्रियेमध्ये पालट होत असल्याचे लक्षात आले. त्या वेळी काहीतरी परिवर्तनाची प्रक्रिया चालू झाली होती. मी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या सान्निध्यामध्ये आलो. तेव्हा माझ्या मनाची वेगळी प्रक्रिया चालू झाली, ‘स्थुलात कशाला अडकायचे ? रामनाथी आश्रम हे तर त्या भिंंतींचे नाव आहे, वास्तूचे नाव आहे. प.पू. भक्तराज महाराज यांनी आपल्या ग्रंथात लिहिले आहेे, ‘या भिंतींना आश्रम म्हणत नाहीत.’ प.पू. भक्तराज महाराज यांच्या गुरुदेवांनी (श्री अनंतानंद साईश यांनी) म्हटले होते, ‘‘माझा आश्रम निर्माण होत आहे; परंतु मी स्थूल आश्रमाला स्थूल म्हणणार नाही, मी सगुण म्हणीन.’’
५. ‘स्वतः रामनाथी आश्रमामध्येच आहे’, असा भाव अनुभवता येणे, तरीही ‘गुरुदेवांना कधीतरी भेटावे’, अशी इच्छा असणे
रामनाथी आश्रम हे ईश्वराचे सगुण रूप आहे. त्या वेळी मला आतून सुचले, ‘ज्याप्रमाणे भ्रमणभाषवर चित्र ‘झूम’ केले की, चित्र मोठे होते, तसेच रामनाथी आश्रमाचे स्वरूप व्यापक आहे. ‘आपण नेहमी रामनाथी आश्रमामध्ये रहातो’, असा भाव ठेवला पाहिजे. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या सानिध्यात हा विचार माझ्या मनात आला. तेव्हाच मला ‘आता मी रामनाथी आश्रमामध्येच आहे’, असा भाव अनुभवता आला, तरीही ‘गुरुदेवांना कधीतरी भेटावे’, अशी इच्छा होतीच !
६. सहस्रो साधक गुरुदेवांना भेटलेलेही नसतांना किंवा काही साधकांना रामनाथी आश्रमामध्ये येण्याची संधी मिळालेली नसतांना त्यांचा विचार करण्यापेक्षा केवळ ‘स्वतःला गुरुदेव भेटावेत’, अशी इच्छा असणे’, हे चुकीचे असल्याचे लक्षात येणे
गुरुदेवांनी केवळ भ्रमणभाष केल्यानेच त्रास दूर व्हायचे. ते म्हणाले, ‘‘तेथे सर्व साधक आहेत. त्यांना तुमची आवश्यकता आहे आणि तुम्हाला इकडे यावेसे का वाटते ?’’ आता मला पटले, ‘मी केवळ माझाच विचार करतो की, मला गुरुदेवांना भेटायचे आहे; पण असे सहस्रो साधक आहेत, जे गुरुदेवांना भेटलेही नाहीत, ज्यांना रामनाथी आश्रमामध्ये येण्याची संधी मिळत नाही किंवा जे काही कारणामुळे येऊ शकत नाहीत. तेव्हा ‘गुरुदेवांकडे जाऊन मी त्यांना केवळ सगुणामध्ये पाहीन’, असा विचार करणे किंवा सगुणामध्ये अडकणे’, हे तर चुकीचेच आहे ना ?’
७. ‘गुरुदेव आपल्याजवळ आहेत’, याची अनुभूती येऊनही त्यांना पाहिल्याविना चैन पडत नसणे
मला ‘माझ्या समवेत आणि माझ्या अंतर्मनात गुरुदेव आहेत’, ही अनुभूती येते, तरीही माझ्याकडून त्याद्वारे अनुसंधान साधण्याचा प्रयत्न का होऊ शकत नाही ?’, अशी विचारप्रक्रिया होऊन नंतर मी तसे प्रयत्न चालू केले, तरीही ‘मला रामनाथीला यायचे आहे, गुरुदेवांना सगुणातून भेटायचे आहे’, असा विचार येऊन मी स्थिर राहून सेवा करू शकतो. अशी मनाची प्रक्रिया होऊन ‘मी सगुणाला सोडणार नाही’, असे ठरवले. बाकी सर्व ठीक आहे. माझी सेवा करण्यासाठी मी हे करीन; परंतु साक्षात् ईश्वर पूर्ण विश्वाचा, ब्रह्मांडाचा उद्धार करण्यासाठी आला आहे. कार्याच्या दृष्टीने ते मला सांगत आहेत, ‘मी आपल्याजवळ आहे’, तरीही त्यांना पाहिल्याविना कधी कधी चैन पडत नाही ना ?
८. ‘सगुण आणि निर्गुण यांमध्ये भेद नाही’, हे गुरुदेवांचे वाक्य आठवून सर्वांमध्ये गुरुदेवांचेच रूप पहाता येणे आणि तरीही सगुणाची ओढ कायम असणे
आपल्याला सगुणाचाही लाभ करून घ्यायचा आहे. एकदा गुरुदेवांनीच सांगितले, ‘सगुण निर्गुण नाही भेदाभेद ।’ मी दूर असतो, तेव्हा मला हिंदुत्वनिष्ठ आणि साधक यांच्यामध्ये अन् आता सर्व समाजामध्येही गुरुदेव दिसत आहेत. ते गुरुदेवांचे निर्गुण स्वरूप आहे; कारण ते प्रत्यक्ष त्यांचे रूप नाही. त्यांची अनुभूती येते. जसे सगुण आणि निर्गुण यांमध्ये भेद नाही, तसेच निर्गुण आणि सगुण यांमध्येही भेद नाही ना ? मग त्यांना पहाण्यामध्ये आणि आनंद घेण्यामध्ये मला काय अडचण आहे ? पण एक तर सगुणाची किंवा निर्गुणाची ओढ असणे, हासुद्धा एक सूक्ष्म अहंकार होता. हासुद्धा माझ्या अज्ञानाचा भाग होता. सगुणामध्ये त्यांच्यामध्ये पूर्ण ब्रह्मांडाचे दर्शन होते. हा प्रयत्न करता करता मी अकस्मात् म्हटले, ‘नाही. हे सर्व ठीक आहे की, मी प्रयत्न करीन; परंतु जेव्हा संधी मिळेल, ते संधी देतील, माझ्याशी बोलतील, तेव्हा मला त्यांचे दर्शन घ्यायचे आहे.’ जे आवश्यक आहे, ती इच्छासुद्धा तेच निर्माण करतील. अध्यात्मप्रसाराच्या कार्याच्या दृष्टीने असेल, माझ्या साधनेच्या दृष्टीने असेल किंवा हिंदु राष्ट्राच्या दृष्टीने असेल, त्यांना जे अपेक्षित असेल, तेच विचार त्यांनी मला द्यावेत.
९. प्रार्थना
‘गुरुदेव, माझ्यावर १०० टक्के जप्ती आली आहे. माझी गुरूंच्या इच्छेपेक्षा भिन्न अशी कोणतीही इच्छा नसावी. गुरु जे कार्य करू इच्छितात, त्यामध्ये माझ्या इच्छेची अडचण येऊ नये. केवळ माझ्याच नाही, तर जे जे त्यांच्या चरणी निस्सीम श्रद्धा ठेवत आहेत, जे ईश्वरप्राप्तीचा किंवा हिंदु राष्ट्राचा विचार घेऊन आपल्या क्षमतेने प्रयत्न करत आहेत, त्या सर्वांवर आपण अनन्य कृपेचा वर्षाव करा आणि आम्हा सर्वांचा उद्धार करा’, हीच आपल्या चरणी प्रार्थना करतो.’
– (सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती. (२५.६.२०१८)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |