रात्री दूध पिण्याविषयी मार्गदर्शक सूत्रे आणि ते पिण्यासंदर्भात पाळावयाची पथ्ये
रात्री झोपतांना दूध प्यायल्याने पचनशक्ती मंदावते आणि कफाचे विकार होतात. त्यामुळे शक्यतो रात्री झोपतांना दूध न पिता सकाळी उठल्यावर स्नानानंतर दूध प्यावे. दूध प्यायल्यानंतर किंवा दुधासह काही खाऊ नये; कारण अन्य पदार्थांमध्ये मिठाचा अंश असतो ज्याचा दुधाशी झालेला संयोग शरिराला अपायकारक असतो. दूध प्यायल्यावर काही खायचे असल्यास ते साधारण एका घंट्याने खावे. रात्री दूध प्यायचेच झाल्यास त्यात १ कप दुधाला अर्धा चमचा या प्रमाणात हळद घालून ते प्यावे.
दूध पितांना ते उष्णच प्यावे. एका वेळी १ कप एवढेच दूध प्यावे. अधिक दूध प्यायल्यास ते पचतेच असे नाही. पुष्कळ जण आम्लपित्ताचा त्रास होतो म्हणून थंड दूध पितात. आम्लपित्तामध्ये थंड दूध प्यायल्याने तात्पुरता लाभ झाला, तरी थंड दूध पचनशक्ती बिघडवून टाकते. त्यामुळे बद्धकोष्ठता निर्माण होते आणि अजीर्ण झाल्यामुळे आम्लपित्ताचा त्रास आणखी वाढतो. त्यामुळे कधीही थंड दूध पिऊ नये.
झोपणे
शक्यतो पूर्वेस किंवा दक्षिणेस डोके करून झोपावे. ‘पश्चिम किंवा उत्तर या दिशांना डोके करून झोपल्यास आयुष्याचा र्हास होतो’, असे विष्णु आणि वामन पुराणांत सांगितले आहे. झोपेच्या वेळी अतिवार्याचे सेवन करू नये; कारण तसे केल्याने शरिरात रूक्षता वाढते, त्वचेचे आरोग्य बिघडते आणि सांधे जखडतात. प्रत्येकाने आपल्याला आवश्यक तेवढी झोप घेतली पाहिजे. सामान्य माणसाला सर्वसाधारण ६ ते ८ घंटे झोप पुरते. ‘आपण किती झोप घेतल्यास दिवसभरात आपली कार्यक्षमता चांगली रहाते’, याचा स्वतःच अभ्यास करून त्यानुसार आपल्या झोपेचा अवधी ठरवावा.