रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील सिद्धेवाडीच्या महाकाय मारुतीच्या मूर्तीचे स्थलांतर
मिरज – रत्नागिरी-नागपूर या महामार्गाचे काम सध्या युद्धपातळीवर चालू आहे. या महामार्गात मिरज-पंढरपूर रस्त्यावरील सिद्धेवाडीजवळ मिरजेचे प्रसिद्ध शिल्पकार विजय गुजर यांनी त्यांच्या शेतामध्ये वर्ष २००० मध्ये ४० फूट उंच आणि १५ टन वजन असलेल्या मारुतीच्या मूर्तीची स्थापना केली होती. अनेक प्रवासी गाड्या येथे थांबून या मारुतीचे दर्शन घेऊन पुढे जात होते. नव्याने होत असलेल्या या महामार्गाच्या कामात या मूर्तीला स्थलांतरित करावे लागणार असल्याचे शासनाने निश्चित केले. मूर्ती वाचवण्याचे सर्व प्रयत्न गुजर कुटुंबियांनी केले; परंतु तांत्रिक अडचणींमुळे शासनाने ही मूर्ती अन्यत्र हलवण्याचे काम १७ नोव्हेंबर या दिवशी चालू केले.
याविषयी शिल्पकार विजय गुजर यांनी सांगितले की,
कलाकाराच्या भावना शासनाला काय कळणार ? अत्यंत कष्टाने बनवलेली ही महाकाय मारुतीची मूर्ती हलवतांना वेदना होत आहे. किमान कलेकडे पाहून तरी मार्ग अन्यत्र वळवण्यात आला असता; परंतु शासकीय यंत्रणेसमोर आमचा नाईलाज झाला. अत्यंत जड अंतःकरणाने ही मूर्ती मला स्थलांतरित करावी लागते आहे.