खायचे आणि दाखवायचे दात !
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांच्या ‘अ प्रॉमिस्ड लॅण्ड’ या पुस्तकात त्यांच्या कार्यकाळात कुख्यात आतंकवादी ओसामा बिन लादेन याला ठार केल्याचा एक किस्सा सांगितला आहे. यामध्ये ओबामा सांगतात की, त्यांच्या व्यतिरिक्त मंत्रीमंडळातील काही निवडक सदस्यांनाच पाकिस्तानात घुसून ओसामाला मारण्याच्या ‘ऑपरेशन’ची माहिती होती. त्यामध्ये अमेरिकेचे तत्कालीन उपराष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि अमेरिकेचे संरक्षणमंत्री रॉबर्ट गेट्स यांनी ओसामाला मारण्याच्या ‘ऑपरेशन’चा विरोध केला होता. याविषयी विस्ताराने ओबामा सांगतात की, त्यांना याविषयी पाकला कल्पना देऊ नये, असे वाटत होते. याचे कारण होते, पाकचे सैन्य हे आतंकवादी आणि तालिबानी या दोघांशी संपर्क ठेवून होते. त्यामुळे पाकला याची माहिती दिल्यास लादेनला मारण्याची संधी जाऊ शकली असती.
ओबामा यांच्या या खुलाशात अनेक महत्त्वाची माहिती लक्षात येते. जो बायडेन तेव्हा अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणजे महत्त्वाच्या पदावर होते आणि आता तर ते राष्ट्राध्यक्ष म्हणजे सर्वोच्च पदावर आहेत. ते सकृतदर्शनी मवाळ वाटतात. असे असले, तरी ते पाकधार्जिणे आहेत, हे भारताच्या दृष्टीने गंभीर आणि महत्त्वाचे सूत्र आहे. पाकमध्ये लपलेल्या आतंकवाद्यांच्या एका म्होरक्याला मारण्यासाठी विरोध असणे, याचे अनेक कंगोरे निघू शकतात. तशी अमेरिका काय पहिल्यांदाच एखाद्या देशात घुसून स्वत:च्या शत्रूला ठार करते असे नाही. अमेरिकेचा शत्रू जगात कुठेही असला, तरी ती कुणाचाही मुलाहिजा न ठेवता थेट सैनिकी कारवाई करते. काही वर्षांपूर्वी अमेरिकेने ‘एम्ओबी’ म्हणजे ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब’ अफगाणिस्तानातील आतंकवाद्यांच्या तळावर टाकला होता. कासिम सुलेमानीला इराकमध्ये घुसून मारले, तर हुकूमशहा सद्दाम हुसेनला त्याच्या देशात जाऊन पकडले. त्यामुळे पाकमध्ये घुसून ओसामाला मारण्याला बायडेन यांचा विरोध हा केवळ त्यांच्या पाकप्रेमामुळेच आहे, हे लक्षात घ्यायला हवे.
येथे दुसरी आश्चर्याची म्हणा किंवा अमेरिकेच्या दुटप्पीपणाची गोष्ट लक्षात येते. ज्या अमेरिकेला पाकचे सैनिक तालिबान आणि अन्य आतंकवादी यांच्या संपर्कात असतात, याची माहिती आहे, त्यांना ते यासाठी केवळ संपर्क करत नाही की, अमेरिकेचा एक शत्रू हातातून निसटेल; मात्र हीच अमेरिका भारतात आतंकवादी आक्रमणे करणार्या आणि आतंकवाद्यांना आश्रय देणार्या पाकला भरभरून अर्थसाहाय्य करते. या अर्थसाहाय्यामध्येही बायडेन यांची भूमिका महत्त्वाची आहे. एवढेच काय लादेनलाही अमेरिकेनेच शस्त्रसाहाय्य करून उभे केले आणि तो डोईजड झाल्यावर त्याला संपवले. अमेरिका केवळ त्याच्या हितसंबंधांचा विचार करूनच साहाय्य करते अथवा एखाद्याशी वैर पत्करते. स्वत:च्या युद्धसाहित्याचा अधिकाधिक खप करण्यासाठी दोन देशांमध्ये युद्ध लावून देते आणि स्वत: पुढाकार घेऊन युद्ध थांबवण्याचा दिखावाही करते. काश्मीरच्या प्रश्नावर अथवा अन्य सूत्रांवर मध्यस्थी करू, असेही अमेरिका सांगते आणि दुसर्या बाजूला भारताने अफगाणिस्तानातील आतंकवाद मोडून काढावा, असेही सांगते. स्वत:च्या लाभ-हानीचा विचार करणे अयोग्य नाही; मात्र त्यासाठी इतरांचा बळी देण्याची वृत्ती घातक आहे. पाकप्रेमी बायडेन सत्तेवर आल्यामुळे भारताने अमेरिकेविषयी अधिकच सतर्क रहाण्याचा धोरण स्वीकारणे आवश्यक बनले आहे, हे मात्र खरे !