विलास मेथर हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाद्वारे चौकशी व्हावी ! रोहन खंवटे
पणजी, १७ नोव्हेंबर (वार्ता.) – पर्वरी येथील विलास मेथर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाद्वारे (सीबीआयद्वारे) चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आमदार रोहन खंवटे यांनी केली आहे. या हत्येच्या अन्वेषणामध्ये राजकीय हेतूने एखाद्याला लक्ष्य करून आय.पी.एस्. अधिकारी चुकीचा पायंडा पाडत आहेत, असा आरोप त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले, ‘‘अवैध कृत्ये उघड करणार्यांना शांत करण्यासाठी शासन पोलिसांचा वापर करत आहे. विलास मेथर यांच्या हत्येच्या अन्वेषणाविषयी मी गप्प आहे. याचा अर्थ पोलीस अन्वेषणाच्या नावाखाली जे काही करत आहेत, त्याला माझी मान्यता आहे, असे नाही. विलास मेथर यांच्या हत्येचे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवण्यायोग्य आहे. राजकीय हेतूने लक्ष्य करण्याचा पायंडा आय.पी.एस्. अधिकार्यांनी पाडला असून पोलीस उपअधीक्षक आणि इतर तसेच करू लागल्यास पोलीस यंत्रणा भ्रष्ट होईल. राजकीय हेतूने लोकांना लक्ष्य करणे हे धोकादायक आहे.
केंद्रीय अन्वेषण विभागाने केवळ मेथर यांच्या हत्येचे अन्वेषण न करता पायथोना वॉर्डमध्ये एका महिलेवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणाचेही अन्वेषण करावे. पैशांची अफरातफर, गुन्हेगारी जगत, अमली पदार्थ यांविषयी किंवा इतर महत्त्वांच्या विषयावर मी आवाज उठवल्यावर शासनाला दुखते; परंतु मी वाईट परिस्थितीतून चांगले निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. भाजप आणि काँग्रेस हे एकत्र येऊन मेथर हत्याप्रकरणी राजकारण करत आहेत.’’