‘अष्टम अखिल भारतीय हिंदु अधिवेशना’मध्ये सूत्रसंचालनाची सेवा करतांना साधिकेला शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
१. सूत्रसंचालन करण्याची सेवा करतांना आनंदाची अनुभूती येऊन ‘आयत्या वेळी येणारे अडचणींचे प्रसंग स्थिर राहून सकारात्मकतेने कसे सोडवता येतील ?’, हे शिकायला मिळणे
‘अष्टम अखिल भारतीय हिंदु अधिवेशना’मध्ये मला सूत्रसंचालन करण्याची सेवा होती. ही सेवा करतांना ईश्वर आतूनच मला आनंदाची अनुभूती देत होता. समन्वय कक्षातील सर्व साधक येणारा प्रत्येक प्रसंग अत्यंत आनंदाने, स्थिरतेने आणि प्रसन्न राहून हाताळत होते. वास्तविक तेथे खूप धावपळ असते. आयत्या वेळी अडचणींचे प्रसंगही येतात; परंतु ‘प्रत्येक वेळी स्थिर राहून ते प्रसंग पूर्ण सकारात्मकतेने कसे सोडवू शकतो ?’, हे शिकायला मिळाले. ही सेवा करतांना ‘आम्ही सर्वजण मनाने एक झालो आहोत’, असे मला वाटत होते आणि त्याचा परिणाम असा झाला की, आता सेवेतील साधकांशी जवळीक वाढली आहे. ‘आम्ही सर्वजण एकाच कुटुंबातील आहोत’, असे वाटते. काही चुका झाल्या, तरी सहसाधकांकडून ‘इतरांना समजून घेणे, तसेच स्वतःचे कुठे चुकले ?’, हे पहाणे असे प्रयत्न होत असल्यामुळे वातावरण हलके आणि आनंदी रहात होते.
२. ‘संतांमुळे सूक्ष्मातील आक्रमणांपासून कसे रक्षण होते ?’, हे अनुभवायला मिळणे
व्यासपीठ, म्हणजे एक प्रकारची सूक्ष्म युद्धभूमीच असते. संतांमुळे तेथे होणार्या ‘सूक्ष्मातील आक्रमणांपासून कसे रक्षण होते ?’, हे अनुभवायला मिळाले. पहिल्या दिवसापासूनच कोणत्याही स्थूल कारणाविना अकस्मात् वीज जाण्याचा अडथळा येत होता. याविषयी सद्गुरु गाडगीळकाकांना सांगितल्यावर त्यांनी केलेल्या नामजपादी उपायांमुळे अडथळा दूर होत होता.
३. मनात नकारात्मक विचार आल्यावर उपाय म्हणून सद्गुरु जाधवकाकांनी श्री गुरूंना प्रार्थना करण्यास सुचवणे
या वेळी सूत्रसंचालनाला आरंभ करण्यापूर्वी माझ्या मनात ‘माझ्यात स्वभावदोष आणि अहं आहेत, तर माझ्याकडून ही सेवा होऊ शकणार नाही’, असे नकारात्मक विचार येत होते. सद्गुरु जाधवकाकांनी मला आधीच श्री गुरूंना प्रार्थना करण्यास सांगितले होते. त्यामुळे ‘माझे आणि अनिष्ट शक्ती यांचे अस्तित्व नष्ट होऊ दे अन् त्या स्थानी आपले (श्री गुरूंचे) अस्तित्व निर्माण होऊ दे’, ही प्रार्थना माझ्याकडून वारंवार होत होती; कारण सेवा श्री गुरूच करतात आणि आम्हाला केवळ माध्यम बनवतात. त्यामुळे ‘कृतज्ञतेच्या व्यतिरिक्त मनात काहीच येऊ नये’, असे मला वाटत होते.
४. सरावाच्या वेळी श्रीकृष्णाने आश्वस्त करणे
सराव करतांना सहसाधकांकडून, सुमितदादा, कार्तिकदादा आणि विनोददादा यांच्याकडून मला सतत प्रोत्साहन मिळत होते. ‘साधना म्हणून आपल्याला कुठे सुधारणा करायची आहे’, हे आम्ही एकमेकांना सांगत होतो. सुमितदादांनी सांगितले, ‘आपण प्रत्येक दिवशी शेवटी चुका सांगून क्षमायाचना करूया.’ त्याप्रमाणे थोडे प्रयत्न होऊ लागले. एकदा आम्ही सर्वजण लहान चित्रीकरण कक्षात (‘स्टुडिओे’मध्ये) सराव करत होतो. त्या वेळी तेथे ठेवलेल्या सिंहासनावर ‘साक्षात् श्रीकृष्ण बसला आहे आणि मोठ्या कौतुकाने आमच्याकडे पाहून स्मितहास्य करत आहे’, असे मला दिसले. तेव्हा मला पुष्कळ आनंद झाला. नंतर सरावाच्या वेळी मी ही अनुभूती सुमितदादा आणि कार्तिकदादा यांना सांगितली. सुमितदादांना त्याच ठिकाणी ‘सुगंधाची अनुभूती आली होती’, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे ते वारंवार सिंहासनाच्या समोर जाऊन सराव करत होते. कार्तिकदादा अभ्यास करतांना अकस्मात् त्या दिशेला जाऊन नमस्कार करत होते; परंतु त्यांना ‘हे कसे झाले ?’, हे कळत नव्हते. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘श्रीकृष्णाने त्याच्या अस्तित्वाची जाणीव सर्वांना करवून दिली आणि आश्वस्त केले की, ‘मीच तुमच्याकडून सेवा करवून घेणार आहे.’
५. सेवेला आरंभ केल्यावर ‘व्यासपिठावर स्वतः नसून सद्गुरु बिंदाताई आहेत आणि त्यांच्या अस्तित्वाने सर्व सेवा होत आहेत’, असे वाटणे
प्रत्यक्षातही अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून प्रत्येक क्षणी ‘शेषशायी श्रीविष्णु व्यासपिठावर आहे’, हेच अनुभवायला येत होते आणि श्री गुरूंचे अस्तित्वसुद्धा अनुभवता येत होते. मी सूत्रसंचालनाच्या सेवेला आरंभ केल्यावर माझ्या लक्षात आले, ‘व्यासपिठावर मी नसून तेथे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई आहेत आणि त्यांच्या अस्तित्वाने सर्व सेवा होत आहेत.’ एका धर्माभिमानी व्यक्तीला मी बोलत असतांना माझ्या जागी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ दिसत होत्या. आणखी एका साधकाने सांगितले की, त्यांना माझ्या जागी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई दिसत होत्या. तेव्हा श्री गुरूंच्या कृपेने लक्षात आले, ‘प्रत्येक सेवा संतच करवून घेत आहेत, मग ती वक्ता म्हणून करायची सेवा असोे, सूत्रसंचालन असो, प्रसार किंवा अन्य कोणतीही सेवा असो, प्रत्येक सेवा सूक्ष्मातून तेच करतात; मात्र समोर आम्हाला उभे करतात. आम्हाला माध्यम बनवतात. यासाठी ‘कर्तेपणा घेणे किती मूर्खपणाचे आहे आणि आमचे कर्तृत्व शून्यच आहे’, याची मला जाणीव झाली.
६. श्री गुरुकृपेने सर्व संतांमध्ये देवतांचे दर्शन होणे
या अधिवेशनाविषयी महर्षींनी सांगितले होते, ‘ईश्वराची शक्ती सगुण रूपाने कार्यरत होईल.’ सर्व संतांकडे पाहिल्यावर असेच वाटत होते, ‘श्री महालक्ष्मीदेवी सद्गुरु बिंदाताईंच्या रूपात, श्री भवानीदेवी सद्गुरु स्वातीताईंच्या रूपात, श्री दुर्गादेवी सद्गुरु अनुताईंच्या रूपात, तर श्री पार्वतीदेवी पू. जाधवकाकूंच्या रूपात उपस्थित आहे.’ श्री गुरुकृपेने सर्व संतांमध्ये मला देवतांचे दर्शन झाले.’
श्री गुरूंनी ही सूत्रे लिहून घेतली. ती श्री गुरूंच्याच चरणी अर्पण करते !’
– सौ. क्षिप्रा जुवेकर, जळगाव (१९.६.२०१९)
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |