साधकांकडून सहजपणे साधना करवून घेणारे सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या चरणी साधिकेने केलेले आत्मनिवेदन !
व्यष्टी साधनेच्या आढाव्याद्वारे साधकांकडून सहजपणे साधना करवून घेणारे सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या चरणी देवद आश्रमातील वैद्या (कु.) माया पाटील यांनी कृतज्ञताभावे केलेले आत्मनिवेदन !
१. सद्गुरु दादा, तुम्हीच माझ्या मनाची स्थिती जाणून मला टप्प्याटप्प्याने मनाच्या प्रत्येक स्थितीतून बाहेर काढले !
‘आता मागे वळून पाहिल्यानंतर लक्षात येते की, मी काहीच केले नाही. ‘मला तुमच्या आढाव्याचा लाभ कसा करून घ्यायचा आहे’, हेही कळत नव्हते; परंतु गुरुदेवांनीच तुमच्या माध्यमातून भरभरून दिले आणि मला साधनेच्या एका टप्प्यावर आणले. मला ‘माझ्या मनाची स्थिती काय आहे’, हे कळत नव्हते; परंतु सद्गुरु दादा, तुम्ही ते जाणले आणि मला टप्प्याटप्प्याने माझ्या मनाच्या प्रत्येक स्थितीतून बाहेर काढले.
अ. आढाव्याच्या आरंभी ‘गुरुदेवांना अपेक्षित अशी साधना झाली नाही’, या विचाराने माझे मन निरुत्साही होते. ‘त्यातून बाहेर कसे पडायचे आणि गुरुदेवांना अपेक्षित असे प्रयत्न कसे करायचे’, हे मनाला कळत नव्हते, तसेच ‘हे मांडताही येत नव्हते’, अशी माझी स्थिती होती. त्या वेळी ते ओळखून तुम्ही ‘गुरुदेवांनी आपल्यासाठी काय काय केले आहे’, हे लिहून काढून त्यानुसार कृतज्ञता व्यक्त करण्यास सांगितली. त्यामुळे काही दिवसांतच चमत्कार झाल्याप्रमाणे माझ्या मनावरील मरगळ दूर झाली. त्या वेळी तुम्ही मला कोणताच दृष्टीकोन किंवा शब्दांतून काहीही न सांगता मला माझ्या त्या स्थितीतून बाहेर काढले.
आ. माझे मन सकारात्मक झाल्यानंतर स्वभावदोष दूर करण्यासाठी माझ्याकडून चुकांचा अभ्यास करून घेतला. स्वभावदोषांची तीव्रता मनावर बिंबवली आणि प्रयत्नांमध्ये गती वाढवण्यासाठी विविध प्रकारची उदाहरणे देऊन प्रसंगी कठोर शब्दांचा वापर करून मला स्वभावदोषांची जाणीव करून देऊन प्रयत्न करवून घेतले.
इ. आपणच माझ्या मनातील चुकांची भीती काढली. ‘चुका साधनेतील मार्गदर्शक आहेत, त्यांच्याकडे सकारात्मक पद्धतीने कसे पहायचे ?’ हे आपणच मला शिकवले.
ई. मला ‘पातळी वाढत नाही’, या विचारामध्ये न अडकता ‘निरपेक्षपणे आणि झोकून देऊन गुरुदेवांना अपेक्षित असे प्रयत्न करण्यावर भर देण्यास सांगितले.’ यासाठी वेगवेगळे दृष्टीकोन दिले. ‘साधनेमध्ये फळाची अपेक्षा न करता केवळ प्रयत्न करणे, हे ध्येय आहे’, हे माझ्या मनावर बिंबवले आणि त्यातील आनंद अनुभवण्यास शिकवले.
उ. प्रयत्न करतांना कर्तेपणा यायला नको किंवा अहं डोकावायला नको, यासाठीची सतर्कता वाढवण्याची जाणीव आपणच करून दिली.
ऊ. केवळ आणि केवळ देवाच्या कृपेनेच आपण ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवणे, म्हणजे मनातील स्वभावदोष आणि अहं यांचे संस्कार पूर्णपणे नष्ट करण्याचे ध्येय ठेवून प्रयत्न करायचे’, हे माझ्या मनावर बिंबवले. यासाठी ‘सातत्य आणि चिकाटी या गुणांसमवेत देवाचे साहाय्य घेणे’, यावर भर द्यायला शिकवले.
ए. साधनेमध्ये ‘बुद्धी अडथळा असून भावच महत्त्वाचा आहे ! बुद्धी हा साधनेचा घटक नाही !’, हे माझ्या मनावर बिंबवले. ‘गुरूंप्रती किंवा भगवंताप्रती अखंड कृतज्ञता व्यक्त करत भावावस्था अथवा आनंदावस्था अनुभवणे’, हेच साधनेचे ध्येय असून हाच स्थायीभाव व्हायला पाहिजे’, हे शिकवले आणि ‘ते साध्य करण्यासाठीच सर्व प्रयत्न करायचे आहेत’, या टप्प्यापर्यंत मला आणले.
२. सद्गुरु दादा, आपणच माझ्यातील अल्पसंतुष्टता, बहिर्मुखता आणि अपेक्षा हे स्वभावदोष दूर करून अंतर्मुख अन् व्यापक बनवण्यासाठी साहाय्य केले !
मला सहसाधकांच्या चुका सांगता येत नाहीत. तेव्हा ‘या स्थितीत ‘माझ्यातील कोणत्या स्वभावदोषांचा अडथळा येतो’, ते शोधून आपणच मला ‘त्यावर मात करण्यासाठी कसे प्रयत्न करायचे’, हे शिकवले. सहसाधकांना चुका सांगून त्यांना साधनेत साहाय्य करण्याचे महत्त्व आपणच माझ्या मनावर बिंबवले.
‘माझ्यातील ‘अल्पसंतुष्टता’ या स्वभावदोषामुळे माझ्या प्रयत्नांची गती अल्प होत आहे’, हे लक्षात आल्यानंतर आपण सहसाधकांना मला माझ्या चुका सांगायला सांगितल्या आणि ‘अजून किती गतीने प्रयत्न वाढवायला हवेत’, याची जाणीव मला करून देऊन प्रयत्नांची दिशा दिली. तसेच ‘मी सेवेचे दायित्व सांभाळण्यात कोणकोणत्या स्तरावर अल्प पडते’, हे आपणच मला सहसाधकांकडून होणार्या चुकांमधून दाखवून दिले. बहिर्मुखता आणि अपेक्षा या स्वभावदोषांमुळे मला त्याची जाणीव नव्हती किंवा मी तेथपर्यंत पोचू शकत नव्हते. आपणच मला त्या प्रत्येक प्रसंगातून मनाच्या त्या भागापर्यंत नेण्यासाठी आणि व्यापक करण्यासाठी साहाय्य केले.
३. सद्गुरु दादा, तुम्ही जे काही केले आहे, त्याविषयी कृतज्ञतेसाठी शब्दच नाहीत !
सेवेतील सहसाधकांच्या समस्या न सोडवल्यामुळे निर्माण झालेल्या अडचणीही तुम्ही सोडवल्या. तो अडथळाही तुम्ही काढून टाकला. आम्हा साधकांच्या स्वभावदोषांमुळे सेवेमध्ये पुष्कळ अडचणी येत होत्या. गुरुदेवांनी दिलेली चैतन्यदायी सेवा परिपूर्ण न होता चुकांसहित होत होती. मला वेगवेगळ्या प्रकृतींना हाताळायला येत नव्हते. त्याचा परिणाम सेवेवर होत होता. त्या वेळी आपणच मला ‘त्यांना कसे हाताळायचे’, हे शिकवले. ‘वेगवेगळे प्रसंग गुरुदेवांना अपेक्षित असे कसे हाताळायचे आणि गुरुकार्य परिपूर्ण करण्याची तळमळ कशी वाढवायची’, हे शिकवले.
मला सेवेच्या माध्यमातून गुरुदेवांनी दिलेले दायित्व त्यांना अपेक्षित असे करण्यातील अडथळे आपणच दाखवून देत आहात आणि त्यावर मात कशी करायची, हेसुद्धा शिकवत आहात. परिणामस्वरूप आता सेवेच्या ठिकाणी वातावरण पालटले आहे. आम्हा साधकांची मने जुळत आहेत. सेवा झोकून देऊन आणि परिपूर्ण करण्यासाठीची तळमळ वाढत आहे. सर्व जण आनंदी होत आहेत. खरंच ! सद्गुरु दादा, तुम्ही जे काही केले आहे, त्याविषयी कृतज्ञतेसाठी शब्द नाहीत. ‘आम्हा सर्व साधकांकडून गुरुदेवांना अपेक्षित अशी साधना होऊ दे’, हेच मागणे श्रीकृष्णाच्या चरणी करत आहे.
४. सद्गुरु दादा, परात्पर गुरु डॉक्टरांच्या ‘संतच सर्वांना मार्गदर्शन करू शकतात’, या सुवचनाची प्रचीती आपण घेत असलेल्या व्यष्टी साधनेच्या आढाव्यातून येते !
सद्गुरु दादा, ‘परात्पर गुरु डॉक्टर अनेकदा सांगतात, ‘संतच सर्वांना मार्गदर्शन करू शकतात !’ त्यांच्या या सुवचनाची प्रचीती आपल्या आढाव्यातून येत आहे. आढावा चालू होण्यापूर्वीची माझी स्थिती आणि तुम्ही वेळोवेळी केलेले साहाय्य यांतून हे प्रकर्षाने जाणवले. आपण केलेल्या साहाय्यातून ‘प्रीती कशी असावी’, हे मी अनुभवले. तुम्ही सर्व ओळखून शब्दांतून काहीही न सांगताही साहाय्य करत आहात.
५. सद्गुरु दादा, आढाव्यातून आपण ईश्वरप्राप्तीसाठीचा एक अभ्यासक्रमच सिद्ध करत आहात आणि ‘आपणच सर्वांकडून व्यष्टी साधनेचे प्रयत्न करून घेत आहात’, अशी अनुभूती अनेक साधक घेत आहेत !
आपणच आम्हाला ‘ईश्वरप्राप्ती करण्यासाठी अभ्यासपूर्ण आणि एका विशिष्ट पद्धतीने प्रयत्न कसे करायचे’, हे शिकवत आहात. यातून ‘आपण आम्हाला व्यष्टी साधना करण्यासाठी एकप्रकारे स्वयंपूर्णच करत आहात’, असे जाणवते. ‘जसे व्यवहारातील पदवी घ्यायची असेल, तर त्या त्या पदवीसाठी एक अभ्यासक्रम असतो. त्या अभ्यासक्रमाप्रमाणे प्रयत्न केल्यास ती पदवी निश्चित मिळते; त्याप्रमाणेच सद्गुरु दादा, ‘आपणच सर्वांकडून साधनेचे प्रयत्न करून घेत आहात आणि ईश्वरप्राप्तीसाठीचा एक अभ्यासक्रमच सिद्ध करत आहात’, असे मला वाटते. या अभ्यासक्रमातील सर्व सूत्रे सर्वांसाठी समान आहेत; परंतु ‘त्याचा उपयोग वय, स्थिती आणि प्रकृती यांनुसार कधी अन् कसा करायचा’, हे तुम्ही शिकवत आहात. सद्गुरु दादा, तुमच्या आढाव्यातून माझ्यासारखी अनुभूती अनेक साधक घेत आहेत.
६. प्रार्थना आणि कृतज्ञता
सद्गुरु दादा, ‘गुरुदेवच तुमच्या माध्यमातून सर्व करत आहेत’, याची जाणीव पदोपदी होते. ‘गुरुदेव सर्वत्र आहेत’, हे अनुभवायला येत आहे. ‘माझ्या आतही गुरुदेवच आणि बाहेरही गुरुदेवच आहेत. दोन्ही वेगळे नाहीतच ! या स्थितीपर्यंत सद्गुरु दादा, आपणच मला घेऊन जात आहात. या स्थितीमध्ये तुम्हीच आम्हा सर्व साधकांना शीघ्रतेने न्यावे आणि साधनेतील परमानंद सातत्याने अनुभवायला द्यावा’, हीच तुमच्या कोमल चरणी कळकळीची प्रार्थना !! सद्गुरु दादा, तुमच्या कोमल चरणी भावपूर्ण साष्टांग नमस्कार !! आणि पुनःपुन्हा कोटीशः कृतज्ञता !!’
७. सद्गुरु राजेंद्रदादा घेत असलेल्या व्यष्टी साधनेच्या आढाव्याला बसण्याची संधी दिल्याने गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता !
‘परात्पर गुरु डॉक्टर, तुम्ही माझ्या जीवनात आल्यापासून मला जे काही दिले आहे, ते लिहिता येणेही अशक्य आहे; कारण तुम्ही प्रत्येक क्षणाला भरभरून देत आहात. ते घेण्यासाठी मी अल्प पडत आहे. आपल्याकडून घेण्यासाठीही क्षमता पाहिजे, तीही तुम्हीच देत आहात ! तुम्ही दिलेल्या अनेक गोष्टींमधील सर्वांत अनमोल गोष्ट, म्हणजे सद्गुरु राजेंद्रदादा घेत असलेला व्यष्टी साधनेचा आढावा ! व्यष्टी आढाव्याच्या माध्यमातून त्यांनी केलेले साहाय्य आणि दिलेले ज्ञानामृत शब्दांत मांडणे अशक्य आहे; परंतु त्यांनी केलेल्या फूलरूपी साहाय्यातील ही लेखरूपी एक पाकळी तुमच्या चरणी अर्पण करत आहे.
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥’
– गुरुदेवांच्या चरणांपर्यंत लवकरात लवकर पोचण्याची तळमळ लागलेली,
वैद्या (कु.) माया पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२४.८.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |