प्रसारमाध्यमांनी गोव्याची प्रतिमा जगासमोर सकारात्मक मांडावी ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन
माहिती आणि प्रसिद्धी खात्याच्या वतीने पणजी येथे राष्ट्रीय पत्रकारिता दिन
पणजी, १६ नोव्हेंबर (वार्ता.) – प्रसारमाध्यमांनी गोव्यातील पर्यटन, व्यवसाय आणि पर्यावरण याविषयांवर लिखाण करतांना ते सकारात्मकदृष्ट्या केले पाहिजे अन्यथा गोव्याची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर मलीन होऊ शकते. ही तिन्ही क्षेत्रे गोव्याच्या विकासासाठी महत्त्वाची आहेत, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. राष्ट्रीय पत्रकारिता दिनाच्या निमित्ताने माहिती आणि प्रसिद्धी खात्याने पणजी येथील मिनेझीस ब्रागांझा सभागृहात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘पर्यटनक्षेत्राच्या दृष्टीने गोवा ही देशाची राजधानी मानली जाते. गोव्यात देशी आणि विदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत असतात. प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध होत असलेल्या तथ्यहीन आणि संदर्भहीन बातम्यांमुळे गोव्यातील पर्यटन आणि इतर व्यवसाय यांवर विपरीत परिणाम होत आहे. प्रसारमाध्यमांनी गोव्यातील पायाभूत विकास आदींविषयी वृत्ते प्रसारित करून गोव्याची चांगली प्रतिमा सर्वत्र उभी करावी. गोवा शासन पत्रकारांच्या हितासाठी कटीबद्ध आहे.’’
कार्यक्रमाच्या प्रारंभी माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे संचालक सुधीर केरकर यांनी स्वागतपर भाषणात पत्रकारितेमध्ये विश्वासार्हता संपादन करण्याचे महत्त्व विशद् केले. या कार्यक्रमाला माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे सचिव संजय कुमार आणि गोवा पत्रकार संघटनेचे (गोवा युनियन ऑफ जर्नालिस्टचे – ‘गुज’चे) अध्यक्ष राजतिलक नाईक यांचीही उपस्थिती होती.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार
ज्येष्ठ पत्रकार सीताराम टेंगसे यांना या वेळी वर्ष २०२० साठीच्या ‘जीवनगौरव पुरस्कारा’ने, तसेच ज्येष्ठ पत्रकार सर्वश्री विल्फ्रेड परेरा, सुरेश नाईक, अनंत साळकर, सुरेश वडावडेकर आणि सोयरू कोमरपंत यांना पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावल्याविषयी सन्मानित करण्यात आले. ‘राष्ट्रीय एकात्मता आणि धार्मिक सलोखा राखणे’ या विषयाला अनुसरून ‘उत्कृष्ट संपादक पुरस्कार’ या विभागात संपादक श्री. परेश प्रभु यांना ‘गोवा राज्य पत्रकार पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. पत्रकार सर्वश्री महेश गावकर, प्रसाद शेट काणकोणकर, सिद्धार्थ कांबळे, मार्कुस मरगुल्हो, गणेश शेटकर आणि राजतिलक नाईक यांना विविध क्षेत्रांत उल्लेखनीय पत्रकारिता केल्याविषयी सन्मानित करण्यात आले.