सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाजारपेठांत गर्दी : कोरोनाचे नियम धाब्यावर !
जनतेला स्वातंत्र्यानंतरच्या ७४ वर्षांत शिस्त न शिकवल्याचा हा परिणाम आहे. सरकारला अजूनही स्वच्छता अभियान राबवावे लागण्याचे कारणही हेच आहे.
सावंतवाडी – कोरोनाच्या संकटाची तीव्रता उणावली असली, तरी हे संकट पूर्णत: टळलेले नाही. त्यामुळे मोठ्या सणांच्या वेळी राज्य सरकार, तसेच स्थानिक प्रशासन यांनी जनतेला ‘कोरोनाशी संबंधित नियमांचे पालन करून सण साजरे करा’, असे आवाहन केले; मात्र अतीउत्साही लोकांकडून हे नियम धाब्यावर बसवून व्यवहार केले जात असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. सध्या चालू असलेल्या दिवाळी सणामध्येही जिल्ह्यातील मुख्य बाजारपेठांमध्ये हे चित्र दिसत आहे; तर काही जण हे नियम पाळण्याचा प्रयत्नही करत आहेत.
कोरोना विषाणूंचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क वापरणे, सामाजिक अंतर पाळणे, हस्तांदोलन न करणे आदी सुरक्षेचे नियम सांगितले गेले. याविषयी जनजागृतीही मोठ्या प्रमाणात केली गेली. त्याचा परिणाम म्हणून कोरोनाचा संसर्गही बर्याच प्रमाणात टाळता आला; मात्र सणांच्या वेळी सर्वसामान्य जनतेला याचा विसर पडत आहे. दिवाळीच्या कालावधीत सावंतवाडी शहराचा विचार करता शहरातील मोती तलाव आणि परिसर, बाजारपेठा येथे सर्रासपणे नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसते. बाजारपेठेतील गर्दी, काही जणांचे मास्क न लावता फिरणे, फटाके फोडण्यास बंदी असतांना मोठ्या प्रमाणात तलावाच्या काठावर फटाके फोडण्यात आले. भरधाव वाहन चालवून कर्णकर्कश आवाजात हॉर्न वाजवत काही तरुण मुले दुचाकी चालवत होते. हे सर्व होत असतांना स्थानिक प्रशासनाने किंवा पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे प्रशासनाची ही भूमिका अचंबित करणारी आहे, असे काहींनी मत व्यक्त केले, तसेच सर्वच गोष्टी नियम आणि प्रशासन अन् पोलीस यांच्याकडे बोट दाखवून होत नाहीत, तर त्यासाठी जनतेनेही जागृत असले पाहिजे, असे मत काहींनी व्यक्त केले.
सावंतवाडी शहरात भरधाव दुचाकी चालवणार्यांना रोखण्यासाठी शहरात पंचम खेमराज महाविद्यालय ते श्रीराम वाचन मंदिरपर्यंत तळ्याकाठच्या परिसरात गतीरोधक बसवावेत. त्यासाठी नगर विकासखात्याने वर्ष २०१७ मध्ये दिलेल्या आदेशाची कार्यवाही करावी, अशी मागणी सावंतवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक राजू मसुरकर यांनी सावंतवाडी नगरपालिकेच्या मुख्याधिकार्यांकडे केली आहे.