मालवण येथील ऐतिहासिक पालखी सोहळा उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात साजरा !
मालवण – येथील ग्रामदैवत श्री देव रामेश्वर आणि श्री देव नारायण यांचा ऐतिहासिक पालखी मिरवणूक सोहळा १६ नोव्हेंबर या बलीप्रतिपदेच्या (पाडव्याच्या) दिवशी मोठ्या उत्साहात अन् भावपूर्ण वातावरणात साजरा झाला. शिवकालीन चालू असलेली ही प्रथा आजही तेवढ्याच श्रद्धेने आणि भक्तीभावाने पाळली जाते. ढोलताशांचा गजर आणि श्री देव रामेश्वर अन् श्री देव नारायण यांचा जयघोष यांमुळे अवघे मालवण शहर दुमदुमून गेले होते.
पालखी मिरवणुकीला दुपारी १२ वाजता प्रारंभ झाला. श्री देव रामेश्वर आणि श्री देव नारायण यांची सवाद्य मिरवणुकीने निघालेली पालखी शहरातील श्री सातेरीदेवी, वायरी-भूतनाथ येथील श्री देव भूतनाथ यांच्या भेटीस गेली. श्री देव भूतनाथाची भेट घेतल्यानंतर पालखी दांडी समुद्रकिनारी असलेल्या ऐतिहासिक शिवकालीन ‘मोरयाचा धोंडा’ (छत्रपती शिवाजी महाराज यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचे भूमीपूजन केले ते स्थळ) या स्थानी आली. या ठिकाणी स्थानिक मासेमार बांधवांनी श्री देव रामेश्वर आणि श्री देव नारायण यांच्या चरणी प्रार्थना (गार्हाणे) केली. तेथून दांडेश्वराला भेट देऊन श्री काळबादेवीच्या मंदिरात आली. श्री काळबादेवी ही श्री देव रामेश्वर आणि श्री देव नारायण यांची बहीण असल्याने येथे भेटीचा कार्यक्रम झाला. त्यानंतर पालखी मिरवणूक बंदर जेटीमार्गे सोमवार पेठ येथील श्री रामेश्वर मांडावर आल्यावर तेथे भाविकांनी दर्शन घेतले. येथे दर्शनसोहळा झाल्यावर पालखी बाजारपेठ, भरडनाका येथून रात्री पुन्हा श्री देव रामेश्वर आणि
श्री देव नारायण मंदिरात पोचली अन् या पालखी सोहळ्याची सांगता झाली.
या सोहळ्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील नियमांचे पालन करत भाविक सहभागी झाले होते.
१. पालखीच्या मार्गात दुतर्फा रांगोळ्या घातल्या होत्या.
२. विद्युत रोषणाईने शहर उजळून निघाले होते.
३. देवाचे दर्शन होणार म्हणून मार्गातील घरासमोर सडासंमार्जन करून रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.
४. पालखीच्या मार्गात लहान मुलांनी काही ठिकाणी वाळूचे गडकिल्ले बनवले होते.
५. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीने पालखीचे दर्शन घेणार्यांसाठी निर्जंतुकीकरणाची सोय केली होती.
६. या सोहळ्यासाठी पोलीस बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला होता.