‘स्टँड अप कॉमेडियन’ कुणाल कामरावर प्रविष्ट केलेल्या खटल्यातून देशातील सडक्या मनोवृत्तीच्या लोकांना एक कडक संदेश आणि चपराक ! – हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता सत्येंद्र मुळे
पुणे – देशात सध्या काही लोक अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली वाटेल ते बोलतात आणि करतात. आपण सर्वांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, राज्यघटनेत अभिव्यक्ती स्वातंत्र्य सर्वांना आहे; मात्र त्याच्या काही मर्यादा आहेत. हिंदु धर्म, देवता, देश, भारतीय सण, संस्कृती, परंपरा, संविधानिक संस्था, महापुरुष यांच्याविषयी ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ अशा प्रकारच्या मानसिकतेच्या लोकांचे सध्या पेव फुटले आहे. हे वेळीच रोखले पाहिजे. कुणाल कामराच्या खटल्यातून आपल्याला हे दाखवून द्यायचे आहे की, समाज एका विशिष्ट मर्यादेनंतर सहन करणार नाही. कुणाल कामराच्या खटल्यातून आपल्या देशातील सडक्या मनोवृत्तीच्या लोकांना एक कडक संदेश आणि चपराक जाईल याचा प्रयत्न आहे. अशा सडक्या मनोवृत्तीच्या लोकांना मला हेच सांगायचे की, जाणूनबुजून कोणाचा अपमान करणे योग्य नाही. नाहीतर कायद्याला समोरे जावे लागेल, अशी प्रतिक्रिया हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता सत्येंद्र मुळे यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’ला दिली आहे.
वास्तूविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात ‘रिपब्लिक टीव्ही’चे संपादक अर्णव गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर तातडीने निर्णय घेऊन त्यांना जामीन संमत करणारे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आणि इंदिरा बॅनर्जी यांच्या निकाल पद्धतीवर ‘स्टँड अप कॉमेडियन’ कुणाल कामरा यांनी ट्विटरवरून टीका केली होती. कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या विरोधात न्यायालयाच्या अवमान प्रकरणाचा खटला चालवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. याचिका प्रविष्ट झाल्यावर त्यावर अॅटर्नी जनरल के.सी. वेणुगोपाळ यांच्याकडे न्यायालयाच्या अवमान प्रकरणात खटला चालवण्यासाठी अनुमती मागण्यात आली होती. वेणुगोपाळ यांनी त्याला हिरवा कंदील दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात खटला प्रविष्ट करण्यात आला आहे.
इतके झाल्यानंतरही कामरा हे त्यांच्या विधानांवर ठाम असून, क्षमा मागणार नाही आणि दंडही भरणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.