हुतात्मा सैनिक ऋषिकेश जोंधळे अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार !
कोल्हापूर, १६ नोव्हेंबर (वार्ता.) – पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात बहिरेवाडी येथील सैनिक ऋषिकेश जोंधळे (वय २० वर्षे) हे ४ दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीर येथे हुतात्मा झाले. यानंतर १६ नोव्हेंबर या दिवशी सकाळी ६.४० वाजता ऋषिकेश यांचे पार्थिव गावात आणण्यात आले. घरी पार्थिवाचे दर्शन घेतल्यानंतर सजवलेल्या ट्रॅक्टरमधून मिरवणुकीने अंत्यसंस्कारासाठी भैरवनाथ हायस्कूलच्या मैदानावर पार्थिव नेण्यात आले. या ठिकाणी पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी श्रद्धांजली वाहिली. सैन्य आणि कोल्हापूर पोलीस यांनी बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. या ‘वेळी भारतमाता की जय’,च्या जयघोषाने आसमंत निनादून गेला. यानंतर शासकीय इतमामात ऋषिकेश यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
ऋषिकेश यांच्या अंत्यदर्शनासाठी पंचक्रोशीतील नागरिक पहाटेपासून उपस्थित होते. भाऊबीजेच्या दिवशी बहिण औक्षण करून भावाच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात; मात्र दुर्दैवाने ऋषिकेशची बहिण कल्याणी हिच्यावर ऋषिकेशच्या पार्थिवाचे औक्षण करण्याची वेळ आली. ऋषिकेश यांच्या पार्थिवाचे औक्षण करताच उपस्थितांच्या अश्रूंचा बांध फुटला.