शैक्षणिक पदव्यांचा अहंकार नको !

प्राचीन काळी वीज, आधुनिक तंत्रज्ञान, संगणक आदी अस्तित्वात नव्हते; मात्र तरीही केवळ उपलब्ध बांधकाम साहित्याच्या आधारे तत्कालीन कारागिरांनी सर्वोत्तम नक्षीकाम केले. सहस्रो वर्षांपूर्वी बांधलेल्या मंदिरांच्या माध्यमातून ते पहाता येते. ‘विज्ञान म्हणजे अज्ञान’ असे विनोदाने म्हटले जाते. त्याच्या कुबड्यांचा उपयोग करून गगनचुंबी इमारती बांधल्या गेल्या; मात्र प्राचीन काळी त्यांचे अस्तित्वच नसल्याने जगाला आश्‍चर्यचकित करणारे स्थापत्यशास्त्र किती प्रगत होते, हे आजही ती शिल्पकला सांगते. प्रत्येक गोष्टीला अध्यात्माची जोड असल्यास निर्माण होणारी गोष्ट वर्षानुवर्षे टिकू शकते आणि ती इतरांनाही प्रेरणादायी ठरू शकते, हे लक्षात येते.

मेकॉलेप्रणीत शिक्षणाने गुरुकुल शिक्षणपद्धतीलाच सुरुंग लावला. त्या शिक्षणावर आधारित पदव्या प्राप्त करण्यासाठी चालू झालेल्या जीवघेण्या स्पर्धेत आपण ओढलो गेलो. आधुनिक वैद्य, अभियंता, पीएच्डी आदी पदव्या असलेल्या व्यक्तींकडे पहाण्याचा दृष्टीकोन निराळा झाला. ‘एखादी व्यक्ती पदवीधारक म्हणजे विशेष’ असा समज दृढ झाला. मी इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉम अभियंता आहे. एक अभियंता म्हणून सांगू इच्छितो की, प्राचीन काळातील कारागिरांनी सादर केलेली कला पुन्हा सादर करणे विज्ञाननिष्ठ अभियंत्यांना जमले नाही; कारण त्यांचा विचार विज्ञानाच्या कुंपणापर्यंतच धाव घेऊ शकतो. विश्‍वमन-विश्‍वबुद्धी यांतील विचार ग्रहण करण्यासाठी गुरुकुल शिक्षणपद्धतीच हवी. अध्यात्मावर आधारित शिक्षणपद्धतीत विविध विषयांचे ज्ञान ग्रहण करण्यासह अहंकाराचे उच्चाटन होते. ज्ञान दिल्याने ते वाढते; पण त्याला अहंकार अन् स्वार्थ यांचे कोंदण असल्यास त्या ज्ञानाचा काय उपयोग ? मी ‘विशेष’ असे वाटणार्‍या पदवीधारकांनी मागे वळून पहावे. सहस्रो वर्षांपूर्वी कारागिरांनी ग्रेनाईटसारख्या दगडावर बारीक कोरीव काम केले. ते कारागीर किती बुद्धीमान असतील ? त्यांच्या कामाची अचूकता, निरीक्षणक्षमता किती व्यापक असेल ? , याचा विचार करावा. या दृष्टीने आत्मचिंतन केल्यास प्रत्येक जण बाळगत असलेला मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीतील पदव्यांचा अहंकार किती व्यर्थ आहे, हे लक्षात येईल.

– श्री. जयेश राणे, भांडुप, मुंबई.