कोल्हापूर येथे श्री महालक्ष्मीदेवीच्या दर्शनासाठी पहाटे ४ वाजल्यापासून भाविक रांगेत
कोरोना महामारी लवकर नष्ट होण्यासाठी भाविकांकडून साकडे
कोल्हापूर, १६ नोव्हेंबर (वार्ता.) – तब्बल ८ मासांनी मंदिरे उघडल्याचा अपार उत्साह भाविकांमध्ये दिसून येत आहे. १६ नोव्हेंबर या दिवशी भाविक श्री महालक्ष्मीदेवीच्या दर्शनासाठी पहाटे ४ वाजल्यापासून रांगेत थांबले होते. देवीच्या दर्शनासाठी अवघ्या महाराष्ट्रातून भाविक कोल्हापुरात दाखल होत आहेत. सकाळी ९ वाजता दर्शन चालू झाले. तेथील कासव चौकातूनच दर्शन दिले जात आहे. ‘कोरोना महामारी लवकर नष्ट होऊ दे’, असेच साकडे भाविकांनी देवीला घातले. याचप्रकारे श्री जोतिबा देवस्थानातही भाविकांमध्ये दर्शनाची ओढ दिसून आली. श्री महालक्ष्मी मंदिरात स्वागतासाठी कमानी उभ्या केल्या होत्या, तर श्री जोतिबाचे मंदिर फुले, रांगोळी यांनी सजवण्यात आले होते.
मुंबईतील सर्व मंदिरांत भाविकांची गर्दी
मुंबई – सरकारने मंदिर उघडण्यास अनुमती दिल्याने १६ नोव्हेंबरला पहाटेपासूनच मुंबईतील सर्व मंदिरांतही भाविकांची उत्स्फूर्त गर्दी होती. भाविकांनी स्वयंशिस्तीने मास्क घालून सामाजिक अंतराचे पालन करत दर्शन घेतले. सर्व मंदिरे फुलांनी सजवण्यात आली होती. मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिर पहाटे ४ वाजल्यापासून उघडण्यात आले. ‘क्यूआर् कोड’ असलेल्या भाविकांनाच मंदिरात प्रवेश देण्यात आला. कोरोनाच्या नियमांचे पालन करूनच भाविकांना प्रवेश दिला जात आहे. सरकारने मंदिरे उघडण्यास अनुमती दिल्याने भाजपने श्री सिद्धिविनायक मंदिराबाहेर जल्लोष केला.
मुंबईत भाविकांना शांततेत दर्शन मिळण्यासाठी पदाधिकार्यांकडून विशेष परिश्रम
बाबुलनाथ मंदिरातील गाभार्यात एका वेळेस ५ जणांनाच सोडले जात होते. सोमवार असल्याने मंदिरात भाविकांची पुष्कळ गर्दी होती. मुंबादेवी आणि वडाळा येथील श्री विठ्ठल मंदिरातही पहाटेपासून भाविक भगवंताच्या दर्शनासाठी आतुर झाले होते. भाविकांना शांततेत दर्शन मिळावे, यासाठी सर्वच मंदिरांच्या पदाधिकार्यांनी विशेष परिश्रम घेतले. अनेक मंदिरांत स्वयंसेवक आणि खासगी सुरक्षारक्षक नेमण्यात आले होते.
भाजपच्या वतीने कोल्हापुरातील महाद्वार चौक येथे, तर सांगलीत श्री गणपति मंदिरासमोर आनंदोत्सव !
मंदिरे उघडल्याच्या निर्णयाविषयी भाजपच्या वतीने कोल्हापुरातील महाद्वार चौक येथे, तर सांगलीत श्री गणपति मंदिरासमोर पेढे-साखर वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. कोल्हापूर येथे ढोल-ताशांच्या गजरात ‘अंबा माता की जय’, ‘उद गं आई उद’, जोतिबाच्या नावानं चांगभलं, गणपति बाप्पा मोरया अशा घोषणा देण्यात आल्या.
सज्जनगड (जिल्हा सातारा) येथील समाधी मंदिर दर्शनाखाली खुले !
सातारा – सज्जनगड (जिल्हा सातारा) येथील समर्थ रामदासस्वामी यांचे समाधी मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले असून भाविकांना येथील महाद्वार येथून दर्शन न देता दिंडी द्वारातून दर्शन देण्यात येत आहे. वरच्या बाजूला असलेल्या श्रीरामाचे दर्शन घेऊन खाली समाधी मंदिराचे दर्शन घेऊन दुसर्या बाजूने भाविकांना बाहेर सोडण्यात येत आहे. दिवसभरात ३ वेळा मंदिर ‘सॅनिटाईझ’ करण्यात येत आहे. दिवसभरात अनुमाने ५०० भाविक दर्शन घेतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांना द्रोणामध्ये खीर आणि खिचडी यांचा प्रसाद देण्यात येत आहे, अशी माहिती समर्थ रामदासस्वामी संस्थानचे विश्वस्त तथा अधिकारी स्वामी सु.ग. तथा बाळासाहेब स्वामी यांनी दिली. याचसमवेत गोंदवले येथील प.पू. गोंदवलेकर महाराज यांचे श्री समाधी मंदिर भाविकांसाठी चालू झाले आहे.