प्रतिदिन ३ सहस्र भाविकांना श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन मिळणार ! – महेश जाधव, अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती
कोल्हापूर, १५ नोव्हेंबर (वार्ता.) – गेल्या ७ मासांपासून मंदिरे बंद होती, त्यामुळे प्रतिदिन ३ सहस्र भाविकांना श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन देण्यात येणार आहे. मंदिर दर्शनासाठीची सर्व सिद्धता पूर्ण झाली आहे. प्रत्येक भाविकाची मंदिराच्या द्वारावरच पडताळणी केली जाणार असून त्यानंतरच त्यांना प्रवेश दिला जाणार आहे, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. महेश जाधव यांनी दिली.
कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी प्रार्थनास्थळांच्या दर्शनासाठी घोषित केलेल्या नियमावलीतील काही सूत्रे
१. ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, इतर आजाराने त्रस्त नागरिक, गरोदर महिला आणि १० वर्षांखालील मुले यांनी घरीच रहावे.
२. सर्व प्रार्थनास्थळांच्या ठिकाणी दर्शन घेतांना, रांग, कर्मचारी, सेवक यांनी न्यूनतम ६ फूट अंतर ठेवावे. ‘मास्क’ यांचा वापर बंधनकारक आहे. हात अस्वच्छ नसले तरी साबणाने वारंवार धुवावे.
३. पुतळे/मूर्ती/पवित्र पुस्तके यांना स्पर्श करण्यास अनुमती नाही.
४. ध्वनीमुद्रित केलेली गाणी वाजवली जावीत. कोणत्याही परिस्थितीत गाण्यासाठी एकत्र येण्यास अनुमती देण्यात येऊ नये.
५. धार्मिक/प्रार्थनास्थळांच्या आत प्रसाद वितरण किंवा पवित्र जल शिंपडणे यांसारख्या कृतींना अनुमती नाही.
६. धार्मिक/प्रार्थनास्थळांच्या ठिकाणी प्रवेश देण्याविषयी निश्चित धोरण ठरवावे. त्या ठिकाणी निश्चित केलेल्या वेळेतच लोकांना प्रवेश द्यावा.
७. धार्मिक प्रार्थनेसाठी एकत्र येऊन एकच चटई/जमखाना वापरण्यास अनुमती नाही. भाविकांनी त्यांची स्वतंत्र चटई/जमखाना आणावा आणि प्रार्थनेनंतर तो परत घेऊन जावा.
(सौजन्य : लोकमत)
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अंतर्गत मंदिरांसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे
कोल्हापूर – पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अंतर्गत येणार्या श्री महालक्ष्मी मंदिर, जोतिबा मंदिर यांसह सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांतील ३ सहस्र ४२ मंदिरे १६ नोव्हेंबरपासून चालू होत आहेत. यासाठी नियमावली सिद्ध करण्यात आली असून त्यातील काही मार्गदर्शक तत्त्वे खालीलप्रमाणे आहेत.
१. भाविकांना सकाळी ९ ते १२ आणि सायंकाळी ४ ते ७ या वेळेत दर्शन घेता येणार असून दिवसभरात ३ सहस्र भाविकांनाच दर्शन मिळणार आहे.
२. मंदिराच्या आतील आवारातील दुकाने बंद रहाणार आहेत.
३. भाविकांना कासव चौक-पितळी उंबर्या पासूनच देवीचे दर्शन घ्यावे लागणार आहे.
४. भाविकांना मंदिर परिसरात फिरता येणार नाही.
५. आठवड्यात श्री महालक्ष्मीदेवीचे ‘ऑनलाईन बुकींग’द्वारे दर्शन चालू करण्यात येणार आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपति मंदिरात भाविकांकडे ‘मास्क’ असेल, तरच प्रवेश
पुणे – श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपति मंदिरात भाविकांकडे ‘मास्क’ असेल, तरच मंदिरात प्रवेश मिळणार आहे. भाविकांना सभा मंडपात बसता येणार नाही. गर्दी टाळण्यासाठी आणि भाविक लवकर दर्शन घेऊन बाहेर पडण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपति ट्रस्ट’च्या वतीने देण्यात आली.
मंदिरात जातांना लोकांनी स्वयंशिस्त पाळावी ! – गुलाबराव पाटील, शिवसेना
जळगाव – कोरोनाच्या संभाव्य दुसर्या लाटेच्या अनुषंगाने लोकांनी स्वयंशिस्त पाळणे आवश्यक आहे, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री अन् शिवसेनेचे आमदार श्री. गुलाबराव पाटील यांनी केले आहे. ते पाळधी येथे त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते.
सिद्धीविनायक मंदिरात पहिल्या दिवशीच्या दर्शनासाठी १ सहस्र भाविकांना क्यूआर् कोड
मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात सकाळी ७ वाजल्यापासून भाविक दर्शनाला येऊ शकतात. यासाठी भाविकांना मंदिराच्या अॅपवर प्रथम नोंदणी करावी लागणार आहे. पहिल्या दिवशी दर्शनासाठी १ सहस्र भाविकांना क्यूआर् कोड देण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील मंदिरे उघडण्याच्या सरकारच्या निर्णयाचे स्वागतहिंदु जनजागृती समितीसह विविध संघटना आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी केलेल्या मागणीस यश ! – सुनील घनवट, संघटक, हिंदु जनजागृती समिती, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य मुंबई – गेल्या ७ मासांपासून बंद असलेली मंदिरे उघडण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाचे हिंदु जनजागृती समितीने स्वागत केले आहे. समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हणाले, ‘‘ही मंदिरे उघडण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने विविध संघटना, भाविक, गुरव समाज, पुजारी, मंदिर विश्वस्त यांच्या देशव्यापी बैठका घेऊन सातत्याने मंदिरे उघडण्याची मागणी लावून धरली. ‘जर सामाजिक अंतराचे नियम पाळून मद्याची दुकाने, मॉल, चित्रपटगृहे उघडली जाऊ शकतात, तर मंदिरे का नाही ?’, असा प्रश्न हिंदु जनजागृती समितीने सातत्याने उपस्थित केला. ‘मंदिरे उघडल्यानंतर शासनाने जे नियम घालून दिले आहेत, त्याचे भक्तांनी पालन करावे’, असे आवाहन आम्ही समितीच्या वतीने करत आहोत; कारण कोरोना महामारी अजून संपलेली नाही. भाविक आणि भक्तगण जेव्हा दर्शनासाठी मंदिरात जातील, तेव्हा त्यांनी कोरोना महामारी केवळ देशभरातून नव्हे, तर जगभरातून नाहीशी होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करावी.’’
|