मालवण येथे आज श्री देव रामेश्वर आणि श्री देव नारायण यांचा ऐतिहासिक पालखी सोहळा
मालवण – मालवणचे ग्रामदैवत श्री देव नारायण आणि श्री देव रामेश्वर यांच्या वार्षिक पालखी सोहळ्याला सोमवार, १६ नोव्हेंबर २०२० या दिवशी दुपारी १२ वाजता देऊळवाडा येथील श्री देव रामेश्वर मंदिर येथून प्रारंभ होणार आहे.
श्री देव रामेश्वर आणि श्री देव नारायण यांच्या अधिपत्याखाली येणार्या भगिनींच्या भाऊबिजेकरिता काढण्यात येणारी ऐतिहासिक पालखी मिरवणूक हे मालवणच्या दिवाळी उत्सवाचे वेगळे वैशिष्ट्य आहे. शिवकालापूर्वीपासून चालू असलेली ही प्रथा आजही तेवढ्याच श्रद्धेने आणि भक्तीभावाने पाळली जाते. मालवण तालुक्यासमवेतच जिल्हाभरातील भाविक आणि माहेरवाशिणी या पालखी मिरवणुकीत सहभागी होतात.
श्री देव रामेश्वर-श्री देव नारायण मंदिर येथून सवाद्य मिरवणुकीने बाहेर पडलेली पालखी प्रथम श्री सातेरीदेवीच्या भेटीस जाते. या वेळी देवस्थानचे बारा-पाच पंचायतनातील मानकरी उपस्थित असतात. यानंतर वायरी-भूतनाथ येथील त्यांचा भाऊ श्री देव भूतनाथाची भेट घेतात. मार्गात पालखीचे विविध ठिकाणी स्वागत केले जाते, तर सुवासिनी स्त्रिया पंचारती ओवाळून पालखीचे पूजन करतात. श्री देव भूतनाथाची भेट घेतल्यानंतर पालखी दांडी समुद्रकिनारी जाते. येथे शिवकालीन ‘मोरयाचा धोंडा’ (छत्रपती शिवाजी महाराज यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचे भूमीपूजन केले ते स्थळ) या स्थानाची भेट घेण्यात येते. येथे मासेमार बांधव देवतांना गार्हाणे घालतात, तसेच तूप, तेल, साखर आदी वस्तूंचा नैवेद्य श्री देव रामेश्वर-श्री देव नारायण यांना अर्पण करतात. ‘मोरयाचा धोंडा’ येथे भेट घेतल्यानंतर पालखी दांडेश्वराला भेट देऊन श्री काळबादेवीच्या मंदिराकडे जाते. श्री काळबादेवी ही श्री देव रामेश्वर-श्री देव नारायण यांची बहीण असल्याने या ठिकाणी भाऊबिजेचा कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने पार पडतो.
त्यानंतर पालखी मिरवणूक बंदर जेटीमार्गे सोमवारपेठ येथील श्री रामेश्वर मांडावर भाविकांना दर्शनासाठी येऊन थांबते. मांडावर भाविक नवस करतात, तर मनोकामना पूर्ण झालेले नवस फेडतात. येथील दर्शन सोहळ्यानंतर ही पालखी बाजारपेठ, भरड नाकामार्गे पुन्हा श्री देव रामेश्वर-श्री देव नारायण मंदिरात पोेचते. ढोलताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि श्री देव रामेश्वर-श्री देव नारायण यांचा जयघोष यांमुळे अवघे मालवण शहर दुमदुमून जाते. कोरोना महामारीमुळे पालखी सोहळ्यावर काही निर्बंध आले असले, तरी भाविकांचा उत्साह मात्र कायम आहे.
कोरोनाविषयीचे नियम पाळण्याचे देवस्थान समितीचे आवाहन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने केलेल्या नियमांचे पालन करून हा सोहळा साजरा करण्यात येणार आहे. भाविकांनी या सोहळ्यात पालखीजवळ गर्दी करू नये. सामाजिक (शारीरिक) अंतर राखावे, दर्शन रांगेत घ्यावे, ‘मास्क’चा वापर करावा, तसेच या पालखी सोहळ्यानिमित्त घालण्यात आलेल्या नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थान समितीने केले आहे.