नक्षलवादाचे पाठीराखे !
तमिळनाडूतील तिरूनेलवेलीमधल्या एका विद्यापिठाच्या अभ्यासक्रमातून डाव्या विचारसरणीच्या लेखिका अरुंधती रॉय यांचे नक्षलवाद्यांवर आधारित एक पुस्तक नुकतेच हटवण्यात आले. ‘वॉकिंग विथ द कॉम्रेड्स’ या नावाचे हे पुस्तक होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विरोध केल्यामुळे हे पुस्तक अभ्यासक्रमातून काढण्यात आले. गत ३ वर्षांपासून पुस्तक अभ्यासक्रमात होते आणि याची कल्पनाही इतरांना आली नाही. अरुंधती रॉय यांनी वर्ष २०११ मध्ये नक्षलग्रस्त भागाचा दौरा केला होता आणि अनेक माओवाद्यांची भेट घेतली होती. त्या अनुभवांवर आधारित हे पुस्तक आहे. देशातील एका विद्यापिठामध्ये नक्षलवाद्यांवर आधारित एक पुस्तक एम्.ए.च्या इंग्रजीच्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना शिकवले जाते, हे पुष्कळ चीड आणणारे आहे.
देश स्वतंत्र झाल्यानंतर शिक्षणव्यवस्था डाव्यांच्या कह्यात गेली. भाजपची सत्ता केंद्रात येण्यापूर्वी शिक्षणाच्या दोर्या डाव्यांच्याच हातात होत्या. डावे म्हणजे हिंदुद्वेषी किंवा राष्ट्रद्वेषी असेच समीकरण सध्या आहे. एन्.सी.ई.आर्.टी.च्या अभ्यासक्रमातील क्रमिक पाठ्यपुस्तके पाहिली की, याचा अनुभव येतो. या पुस्तकांचे लेखक डाव्या विचारसरणीचे म्हणजे साम्यवादी, समाजवादी असतात. त्यांनी लेखन केलेल्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ५ ओळीत, महाराणा प्रताप यांचे कर्तृत्व छोटे दाखवणे आदी होत असतांना भारतावर आक्रमण करून भारतियांना गुलाम बनवणार्या मोगलांचा इतिहास पानेच्या पाने भरून आणि गौरवास्पदरित्या मांडला जातो. या पुस्तकांमध्ये भारतीय परंपरा, सभ्यता, संस्कृती यांविषयी माहिती नाही.
शहरी नक्षलवादी
अरुंधती रॉय यांच्या पुस्तकाला अमेरिकेतील ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने ‘आवश्यक पुस्तक’ अशा स्वरूपाची टीप्पणी दिली आहे. ‘माओवाद्यांना बंदुका का उचलाव्या लागल्या ?’ याविषयी माहिती त्यामध्ये दिली आहे. भारताला नक्षलवादाची समस्या पुष्कळ जुनी आहे. उत्तरेकडील ४ राज्ये नक्षलवादग्रस्त आहेत. छत्तीसगडला लागून असलेले दंडकारण्य तर या नक्षलवाद्यांचे तळ बनले आहे. महाराष्ट्रात गडचिरोलीच्या काही भागांत नक्षलवादाची समस्या भीषण आहे. समानता, साधनसंपत्तीचे समान वाटप, गरिबांवरील अन्याय दूर करणे, श्रीमंतांना धडा शिकवणे या नावाखाली क्रूर आणि कपटाने नक्षलवादी सरकारशी युद्धच करत असतात. यात निष्पाप लोक, सुरक्षादलाचे पोलीस, गावातील नक्षलविरोधी व्यक्ती यांच्या नृशंस हत्या केल्या जातात. पोलिसांचा खबर्या या एका कारणाखालीही थेट गोळ्या घालून लोकांना ठार केले जाते. एवढी वर्षे जंगलात राहून लपूनछपून हिंसक कारवाया करूनही सरकार नमत नाही, जनता नक्षल चळवळीशी जोडली जात नाही, हे पाहून शहरी भागांत सर्वसामान्यांप्रमाणे रहाणार्या मात्र उच्च विद्याविभूषित नक्षल समर्थकांनी त्यांचे काम चालू केले. त्यांनी नक्षलप्रेमींचे असे जाळे विणले आहे की, सरकारच्या प्रत्येक निर्णयाच्या वेळी, आपत्तीजनक घटनांच्या वेळी सरकारविरोधी असंतोष धुमसत राहील, असंतोषाचा वणवा पेटेल यांसाठी प्रयत्न होत असतो. या व्यवस्थेला ‘शहरी (अर्बन) नक्षलवाद’, असे म्हणतात. सुटाबुटात रहाणारे, डॉक्टर, प्राध्यापक अशी बिरुदे नावापुढे असणारे, विचारवंत म्हणून समाजात प्रसिद्धी पावलेले काही नक्षल समर्थक सर्वसामान्यांना तसे ओळखूही येणार नाहीत. ही सर्व मंडळी महाविद्यालये आणि विद्यापीठ येथे त्यांच्या ‘सेवा’ देत असतात, हे त्याहूनही भयावह आहे. त्यांनी घडवलेले नक्षल समर्थक विद्यार्थीच ‘भारत तेरे तुकडे होंगे’, ‘भारत की बरबादी तक जंग रहेगी जंग रहेगी’, ‘पाकिस्तान झिंदाबाद’ अशा भारतविरोधी घोषणा देतात. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालतात, काळे फासतात, आतंकवाद्यांचे समर्थन करतात, हिंदु देवतांवर अश्लील, अभद्र टीप्पणी करतात. नक्षल समर्थक वरवरा राव, गौतम नवलखा, आनंद तेलतुंबडे, सुधा भारद्वाज, अरुण परेरा, कन्हैया कुमार, उमर खालिद आदी ही त्यांची काही उदाहरणे आहेत.
नक्षल समर्थकांना आवरा !
जे.एन्.यू.मध्ये राष्ट्रद्वेषी, हिंदुत्वविरोधी विचारसरणी जोपासणारे शिक्षक, वातावरण आहे. परिणामी तेथे शिक्षण घेणारे विद्यार्थी भारतीय परंपरा, राष्ट्रहितैषी निर्णय यांचा कडवा विरोध करतात, तर आतंकवादी, नक्षलवादी यांचे समर्थन करतात. २ दिवसांपूर्वीच स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ऑनलाईन’ पद्धतीने केले. याला अपेक्षेप्रमाणे जे.एन्.यू.च्या विद्यार्थ्यांनी विरोधच केला. या आंदोलनाच्या वेळी विद्यार्थ्यांनी ‘नरेंद्र मोदी मुर्दाबाद’च्या घोषणा दिल्या. लोकशाही पद्धतीने देशाच्या सर्वोच्च पदावर निवडून आलेल्या व्यक्तीला विद्यार्थ्यांकडून विरोध होणे, हे अशा विद्यापिठांमधून शिकवल्या जाणार्या अभ्यासक्रमाचे फलित आहे.
विश्वविद्यालयाने नक्षलवादाच्या समर्थनाचे पुस्तक अभ्यासक्रमात समाविष्ट करणे, हा उघड उघड देशद्रोहच आहे. जर अभाविपने या पुस्तकाविषयी तक्रार केली नसती, तर आणखी किती वर्षे ते पुस्तक अभ्यासक्रमात राहिले असते ? आणि देशद्रोही कन्हैया कुमारसारखे आणखी किती विद्यार्थी तयार झाले असते ?, याचा मागमूसही लागला नसता. तमिळनाडूमध्ये नक्षलवादाचे समर्थन करणारी पुस्तके महाविद्यालयांमध्ये उपलब्ध होतात आणि विद्यापिठासह स्थानिक प्रशासनाला लक्षात येत नाही, यात आश्चर्य ते काय ? यातून स्थानिक प्रशासनही यामध्ये सहभागी आहे कि काय ? अशीही शंका येते. द्रमुक आणि माकप यांनी या पुस्तकाचे समर्थन केले आहे, म्हणजे राजकारणीही यात सहभागी आहेत. हे पुस्तक ज्यांनी अभ्यासक्रमात सहभागी करण्यास सांगितले, त्यांची चौकशी केल्यास याचे मूळ कुठे आहे, हे लक्षात येऊ शकते. त्यामुळे या प्रकरणातील संबंधितांना तात्काळ बडतर्फ करून अटक करणे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे.
शाळा-महाविद्यालये यांमध्ये क्रमिक अभ्यासक्रम पालटण्याची, तसेच शिक्षणाच्या टप्प्यांच्या रचनेत पालट करण्याचीही केंद्रातील सरकारने घोषणा केली आहे आणि त्या दिशेने त्यांनी पावलेही टाकली आहेत. केंद्रातील सरकारने त्यांचे हे प्रयत्न गतीमानतेने करावेतच; मात्र नक्षलवादाच्या समर्थकांना शोधून काढून तात्काळ कठोर शिक्षा करण्याची चळवळच हाती घ्यावी, जेणेकरून असे प्रयत्न भविष्यात कुणी करण्यास धजावणार नाही.