मंडप संघटनेच्या मागण्यांचा शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा ! – आमदार सुधीर गाडगीळ
‘मंडप, लाईट, फ्लॉवर डेकोरेटर्स असोसिएशन’चे राज्यव्यापी आंदोलन
सांगली, ३ नोव्हेंबर (वार्ता.) – कोरोनामुळे पुकारलेल्या दळणवळण बंदीमुळे कार्यक्रमांवर बंदी घातल्याने टेंट, मंडप, केटरर्स, लाईटिंग, सभागृह, सांस्कृतिक कार्यालय यांचे काम बंद राहिले होते. मंडप व्यावसायिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली. तरी विविध मागण्यांसाठी मंडप असोसिएशनच्या वतीने २ नोव्हेंबर या दिवशी स्टेशन चौक येथे धरणे आंदोलन करण्यात आले. यास भाजप आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांनी भेट दिली आणि ‘मंडप संघटनेच्या मागण्यांचा शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा’, असे प्रतिपादन केले. सर्व प्रकारच्या सामाजिक कार्यक्रमात मंडप, लॉन, मंगल कार्यालयांच्या क्षमतेपेक्षा अर्ध्या क्षमतेची अथवा ५०० व्यक्तींच्या उपस्थितीची अनुमती द्यावी. मंडप व्यवसायाशी संबंधित जी.एस्.टी. १८ टक्के ऐवजी ५ टक्के पर्यंत करावा यांसह अन्य मागण्या करण्यात आल्या.
सातारा येथे धरणे आंदोलन
सातारा – ‘मंडप, लाईट, फ्लॉवर डेकोरेटर्स असोसिएशन’च्या सदस्यांनी २ नोव्हेंबर या दिवशी राज्यव्यापी धरणे आंदोलन केले. या वेळी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला निवेदने देण्यात आली. या व्यवसायांवर अवलंबून असणार्या सातारा जिल्ह्यातील लोकांची संख्या १ लाखांहून अधिक असून सर्वांना आर्थिक हानीला सामोरे जावे लागले आहे, असे निवेदनात म्हटले आहे.