सदनिका (फ्लॅट) खरेदी करतांना कोणती काळजी घ्यावी ?
आपत्काळाच्या दृष्टीने सदनिका निवडत असतांना सर्व निकषांनुसार पडताळून घेणे आवश्यक आहे. सध्या अनेक ठिकाणी मोठे रहिवासी प्रकल्प उभारले जातात. त्या प्रकल्पामध्ये सदनिका खरेदी करतांना किंवा अन्य सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये (को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी) सदनिका खरेदी करण्यापूर्वी अनेक कागदपत्रे पडताळून घेणे महत्त्वाचे असते. आपल्याला सदनिका खरेदी करतांना करायचे करार, कागदपत्रांची पडताळणी, बांधकामाचा दर्जा, सोयी-सुविधा इत्यादींविषयी बारकावे ठाऊक नसल्याने त्यात आपली फसवणूक होण्याचीही दाट शक्यता असते. अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, ते या लेखातून जाणून घेऊया.
१. बांधकाम व्यावसायिकाच्या संदर्भात कोणती काळजी घ्यावी ?
बांधकाम व्यावसायिक (बिल्डर) शक्यतो स्थापत्य अभियंता आहे आणि त्याचा या व्यवसायातील अभ्यास अन् अनुभव चांगला असल्याची निश्चिती त्याची कामे पाहून करून घ्यावी. तसेच ते प्रतिकूल परिस्थितीत स्वत:ची गुंतवणूक करून बांधकाम पूर्ण करून देण्यास सक्षम आहेत आणि सदनिकाधारकांचे काम वेळेत पूर्ण करून देण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सबळ आहेत (ज्यांची समाजात पत, विश्वासार्हता आणि व्यवहाराची पद्धत योग्य आहे) अशा बांधकाम व्यावसायिकाकडे आपण सदनिकेसाठी नोंदणी करावी. काही वेळा जाहिरातींच्या माध्यमातून ग्राहकांना सोयी-सुविधांचे आमीष दाखवले जाते आणि सदनिका खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी करून घेतली जाते. प्रत्यक्षात त्या ग्राहकांना पुढे जाऊन जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे गुणात्मक काम नसल्याचे आढळून येते आणि तेव्हा त्यांची फसवणूक झाल्याचे त्यांना समजते; पण तोपर्यंत त्यांची बरीच हानी झालेली असते.
प्रत्येक वेळेस वरीलप्रमाणे बांधकाम व्यावसायिक भेटतील, असे नसल्याने त्या ठिकाणी वरील निकषांप्रमाणे व्यवहार पूर्ण करून देणारे बिल्डर असल्यास त्यांच्याकडे नोंदणी करू शकतो.
२. जागा आणि जागेच्या परवान्यासंदर्भात काय पहावे ?
अ. आपण ज्या भागात सदनिका घेणार आहोत, तेथील परिसर आणि सर्व पायाभूत सुविधा, उदा. रस्ता, पाणी, वीज असल्याची निश्चिती करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी जागेच्या ले-आऊटमधील आपल्या प्लॉटची वरीलप्रमाणे निश्चिती करावी.
आ. मंजूर ले-आऊट नकाशाची मूळ प्रत पहावी. त्यासोबत काही अटी-शर्ती असतील त्यांचे व्यवस्थित वाचन करावे.
इ. जागा बिगर शेती (N.A.) असल्याची निश्चिती करावी. ग्रामपंचायतीने संमत केलेले ले-आऊटमधील प्लॉट्स घेऊ नयेत. ग्रामपंचायतीला ले-आऊट संमतीचे अधिकार नाहीत. ग्रामीण भागातील ले-आऊटसाठी ग्रामीण टाऊन प्लॅनिंग विभाग असतो.
३. कायदेशीर गोष्टींच्या संदर्भात कोणती काळजी घ्यावी ?
अ. सातबारा किंवा पीआर् कार्डच्या नोंदी पहाव्यात. गोवा राज्यात यालाच फॉर्म I-XIV (Form One and Fourteen) असे म्हणतात.
आ. सातबारावर उजव्या बाजूस असणार्या रकान्यात (कॉलम) इतर हक्काची, वारसाची, बँक बोजाची (जमीन गहाण ठेवून कर्ज काढले आहे का ?) किंवा अन्य नोंद आहे का, याची निश्चिती करावी. शक्यतो संगणकीकृत सातबारा उतारा घ्यावा. सात-बारा उतार्यावर आधी झालेल्या व्यवहारांच्या नोंदी असतात. त्यामध्ये त्या जागेचे क्षेत्रफळ नमूद असते आणि त्या जागेचा सध्याचा मालक कोण आहे, हेदेखील नमूद असते. यासाठी सातबारा उतारा आवश्यक असतो.
इ. मागील किमान ३० वर्षांचा सर्च रिपोर्ट आपल्या अधिवक्त्यांकडून पडताळून घ्यावा.
ई. तेथील सर्वाधिक खप असलेल्या स्थानिक वर्तमानपत्रात आपल्या अधिवक्त्यांकडून खरेदीपूर्व जाहीर नोटीस प्रसिद्ध करावी. त्या सूचनेत सदनिकेचा पूर्ण तपशील देऊन ‘ही सदनिका आम्ही खरेदी करत आहोत. याविषयी कुणाची तक्रार असल्यास सदनिकेची मूळ कागदपत्रे घेऊन ८ ते १५ दिवसांत आमच्या अधिवक्त्यांना कळवावे आणि कागदपत्रांची निश्चिती पटवून द्यावी’, असे लिखाण देऊन त्यात आपल्या अधिवक्त्यांच्या संपर्काचा तपशील द्यावा. याविषयी कुणी तक्रार केली नाही किंवा हरकत घेतली नाही, तरच ती सदनिका खरेदी करावी. या सदनिकेचे अतिक्रमणविरहित (नॉन एन्कंबरन्स) प्रमाणपत्र संबंधित कार्यालयातून घ्यावे.
उ. जागेचे बिल्डरने सर्व प्रकारचे कर भरून ती जागा निर्वेध केल्याची कागदपत्रे पडताळावी.
ऊ. सातबारावर सामूहिक क्षेत्रास लागलेली नावेे विकणार्यांच्या भावंडांची असतील, तर त्या सर्वांची मालकी असल्याने जमिनीच्या खरेदीखतावर सर्वांच्या स्वाक्षर्या असल्याची खात्री करावी. अन्यथा खरेदीखतासोबत संबंधित नातेवाइकाचे ना हरकत पत्र असावे. असे पत्र नोंदणीकृत असावे.
ए. सद्यस्थितीत बांधकाम व्यावसायिकाचे आस्थापन कुठल्या प्रकारातील (प्रोप्रायटर, पार्टनरशिप, कंपनी अथवा अन्य) आहे, हे पाहून त्याच्या नोंदणीपत्राची मागणी करावी आणि त्याचा उल्लेख करारपत्रात करावा.
ऐ. घोषणापत्र (डीड ऑफ डिक्लेरेशन) खूप महत्त्वाचे आहे. त्यात एकूण क्षेत्रफळ, बांधीव क्षेत्रफळ, सामूहिक मालमत्तेचा तपशील, सर्वांना समान हक्क रहातील, अशी नोंद, एफ्.एस्.आय. किंवा टी.डी.आर्.चे हक्क सोसायटीच्या नावे असल्याच्या नोंदी असतात. त्यामुळे घोषणापत्राची (डीड ऑफ डिक्लेरेशन) मागणी करावी.
ओ. बिल्डर तोंडी किंवा प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून सुविधांविषयी देत असलेल्या आश्वासनांची नोंद घोषणापत्रात आहे का, याची निश्चिती करावी.
४. सदनिका (फ्लॅट) खरेदी करतांना कोणत्या गोष्टी पडताळायला हव्यात ?
अ. गृहनिर्माण प्रकल्प हा रहिवासी झोनमध्ये नोंदणीकृत असल्याची निश्चिती करावी. (ग्रीन झोनमध्ये नसावा.)
आ. ज्या जागेवर या सदनिका बांधल्या आहेत, ती जागा बांधकाम करण्यास कायदेशीररित्या अधिकृत आहे. सद्यस्थितीत या मालमत्तेवर कोणत्याही प्रकारचा दावा, खटला किंवा अन्य कायदेशीर विवाद नाहीत, तसेच रहायला गेल्यावर कुणाचाही विरोध होणार नाही, याची निश्चिती अन्य सदनिकाधारक आणि शासकीय कार्यालयात करावी.
इ. आपण ज्या व्यक्तीकडून सदनिका खरेदी करत आहोत, तिच्याकडेच त्याची मालकी असल्याची निश्चिती करावी.
ई. सदर सदनिका तारण ठेवून त्यावर कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतलेले नाही, हे पहावे. जर ही सदनिका अधिकोषाकडे गहाण असेल, तर त्या अधिकोषाचे सदर सदनिका विकण्यास ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (NOC) असल्याची निश्चिती करावी.
उ. यापूर्वी या सदनिकेच्या संदर्भात कुणाशीही विक्री व्यवहार झाला नसल्याची निश्चिती करावी. दाखवलेली सदनिकाच आपल्याला विकणार आहेत, त्या सदनिकेच्या संदर्भात कोणतेही वादविवाद नाहीत, याची निश्चिती करावी.
ऊ. संबंधित मालमत्तेवर कोणतेही प्रलंबित कायदेशीर देय किंवा तारण नसल्याचे सिद्ध करणारे एक त्रुटी प्रमाणपत्र घ्यावे. (त्यात काही कालावधीत झालेल्या व्यवहारांशी संबंधित सर्व तपशील दिला जातो)
ए. बांधकाम व्यावसायिकाने जागेच्या मालकाकडून जागेच्या विकसनाचे (Development) अधिकारपत्र (power of attorney) नोंदणी करून घेतले असल्याचे पहावे. जागेचे प्रॉपर्टी कार्ड, वीज, गॅस यांचे देयक आणि सोसायटीचे ‘ना हरकत प्रमाणपत्र (NOC)’ ही सारी कागदपत्रे पडताळून घ्यावीत. कागदपत्रे उपलब्ध नसल्यास, त्याचे कुलमुखत्यारपत्र (power of attorney) दिले आहे का, हे पहावे. (मालमत्तेची विक्री किंवा खरेदी विक्री करतांना ‘मालमत्ता मालकाच्या वतीने अधिकृत आहे’, हे सिद्ध करण्यासाठी हे आवश्यक आहे), जागेचे NIL Encumbrance तसेच विकासकास क्षेत्र विकास प्राधिकरण, पाणीपुरवठा व मलनिःस्सारण मंडळे, वीज मंडळे आणि महानगरपालिका यांच्याकडून मान्यता अन् ना हरकत प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
ऐ. जर बांधकाम प्रकल्प स्थावर संपदा नियामक प्राधिकरण (Real-Estate Regulatory Authority) अंतर्गत येत असेल, तर बांधकाम व्यावसायिकाने तशी नोंदणी केल्याची कागदपत्रे पडताळावीत..
५. सदनिका गृहनिर्माण संस्थेत असल्यास काय पहावे ?
अ. विक्री करणारा व्यक्ती सोसायटीचा सभासद असल्याचे प्रमाणपत्र पहावे.
आ. एकूण सदनिकांपैकी किमान ६० टक्के सदनिकांची विक्री झाल्यावर सर्व सभासदांची बैठक घेऊन सोसायटी, कंपनी किंवा अपार्टमेंट असोसिएशन या तीनपैकी ज्या बाजूने बहुमत असेल, त्याची नोंदणी बांधकाम व्यावसायिकाकडून करून घ्यावी.
इ. सोसायटी, कंपनी किंवा अपार्टमेंट असोसिएशन स्थापन करण्यापूर्वी त्याचे नियम सर्व सदनिकाधारक सभासदांना वाचून दाखवावे, तसेच ते सभेमध्ये संमत करावे.
ई. सभासदांकडून घेतलेले वनटाइम मेंटेनन्स चार्ज किंवा कॉर्पस फंड सोसायटीच्या नावाने अधिकोषात जमा केल्याची निश्चिती करावी.
उ. विक्री करणार्याकडे सदनिका वर्ग झाल्याचे अधिकृत पत्र (अलॉटमेंट लेटर)असल्याची निश्चिती करावी.
ऊ. सदनिका विक्रेत्याकडे गृहनिर्माण संस्थेने दिलेले भागधारण प्रमाणपत्र (शेअर सर्टिफिकेट) पहावे.
ए. संस्थेची कोणत्याही प्रकारची देयके प्रलंबित नाहीत, याची कागदपत्रानुसार खात्री करावी.
ऐ. मूळ ‘डीड ऑफ कन्व्हेअन्स दस्त’ (गृहनिर्माण संस्थेस लागू असतो) पडताळावा.
ओ. मूळ मालकाने कर्ज घेतलेले असेल, तर अधिकोषाच्या संमतीविना खरेदीखत किंवा हस्तांतरण करू नये.
औ. सोसायटीने खरेदी केलेल्या जमिनीची सत्यप्रत पहावी.
अं. बिगरशेती (NA) संमती असल्याची निश्चिती करावी.
क. सोसायटीचे ‘No dues’ प्रमाणपत्र पाहून घ्यावे.
ख. अलिकडच्या ३ मासांतील सातबारा किंवा पीआर् कार्डवरील नोंद पाहावी.
ग. मूळ मालकाने त्या सदनिकेवर अधिकोषाकडून कर्ज घेऊन त्याची पूर्ण परतफेड केलेली असेल, तर त्या मालकाकडे अधिकोषाचे ‘No dues’ प्रमाणपत्र आणि ‘हक्क-सोड’ प्रमाणपत्र असल्याची खात्री करावी.
घ. व्यवहार केलेली मालमत्ता संयुक्त मालमत्ता असेल आणि मालकांपैकी एखाद्याचा मृत्यू झाला असेल, तर वारसाहक्क प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच व्यवहार करावेत.
च. जर बांधकाम व्यावसायिक सोसायटीच्या माध्यमातून हस्तांतरण करणार नसेल, तर कोणत्या पर्यायी व्यवस्थेने तो हस्तांतरण करणार आहे, हे पडताळून घ्यावे आणि ती पद्धत योग्य असल्याची अधिवक्त्यांकडून निश्चिती करून घ्यावी.
६. बांधकामाच्या नकाशाविषयी कोणती काळजी घ्यावी ?
अ. (*) आपली जागा ग्रामपंचायत अथवा नगरपालिका क्षेत्रात असली, तरीही बांधकामाला मान्यता घेण्यासाठी त्या बांधकामाचा संकल्पित नकाशा सादर करावा लागतो. हा नकाशा संबंधित विभागाकडे मान्यतेसाठी सादर करतांना त्यावर संबंधित विभागांकडे चार्टर्ड अभियंता किंवा आर्किटेक्ट म्हणून नोंदणीकृत असलेल्या स्थापत्य अभियंत्याची (सिव्हील इंजिनिअर) किंवा गृहशिल्पीची (आर्किटेक्ट) स्वाक्षरी असावी लागते, तरच तो नकाशा संमत होतो अन्यथा होत नाही.
आ. (*) बर्याचदा या नकाशावर बांधकाम व्यावसायिकाची स्वाक्षरी असते; पण तो व्यावसायिक स्थापत्य अभियंता (सिव्हिल इंजिनिअर) असतोच, असे नाही. त्यामुळे जागेचा सातबारा उतारा आणि संकल्पित नकाशा तज्ञांकडून पडताळून घ्यावा.
इ. (*) नगरपालिकेच्या किंवा ग्रामपंचायतीच्या नियमानुसार त्या जागेवर बांधकामाचा नकाशा बसतो आहे का, याची निश्चिती करावी. बांधकामाचे क्षेत्रफळ हे नियमानुसार बसते (मान्य एफ्.एस्.आय्.), याची निश्चिती करावी.
ई. (*) संमत नकाशावर स्थापत्य अभियंता किंवा आर्किटेक्टची स्वाक्षरी असल्याची निश्चिती करावी.
* टीप – सर्व कागदपत्रे माहितगार तज्ञ स्थापत्य अभियंता आणि अधिवक्ता यांना दाखवावी.
७. बांधकामाच्या अन्य गोष्टींविषयी कोणती माहिती घ्यावी ?
अ. बांधकाम संमत नकाशाप्रमाणे आहे का, हे पहावे.
आ. प्रकल्पांतर्गत सदनिकेचे बांधकाम करण्यापूर्वी किंवा चालू असतांना आपल्याला त्या बांधकाम व्यावसायिकाशी किंवा कंत्राटदाराशी त्या तालुक्यातील दुय्यम निबंधकाकडे नोंदणीकृत लेखी करार करावा लागतो. जेणेकरून काही तक्रार झाल्यास आपल्याला न्यायालयात दाद मागता येते. (काही बिल्डर लेखी करार करणे टाळतात.) हा करार करतांना त्यात पुढील सूत्रे असणे आवश्यक असते.
इ. बांधकाम व्यावसायिक बांधकामाचे जे दर सांगत आहे, त्या दरामध्ये बांधकाम क्षेत्र कसे मोजले जाईल, (कार्पेट एरिया, बिल्टअप एरिया, सुपर बिल्टअप एरिया यांपैकी कोणते आहे) त्याचा उल्लेख असणे आवश्यक आहे. ठरवलेला दर हा वस्तू आणि सेवा करांसह (जीएस्टी) असावा आणि करारात तशी नोंद असावी.
८. करारपत्र करतांना पुढील कागदपत्रे आणि नोंदी करारपत्रात येणे आवश्यक आहे.
काही बांधकाम व्यावसायिक सदनिका विकली जाण्यासाठी तोंडी आश्वासने देण्याचा प्रयत्न करतात. लेखी करारात नमूद करण्यास टाळाटाळ करतात. तोंडी बोलण्यावर विश्वास न ठेवता अथवा त्याला बळी न पडता ती सर्व सूत्रे करारपत्रात घेणे महत्त्वाचे आहे. काही वेळा बांधकामात काही पालट झाल्यास त्याचे अंदाजपत्रक बांधकाम व्यावसायिकाकडून घ्यावे आणि त्यानंतरच ते पालट करून घ्यावेत. याविषयी तोंडी न बोलता ते बांधकाम व्यावसायिकाकडून लिखित स्वरूपात घ्यावे आणि आपल्या माहितीतील स्थापत्य अभियंता अन् अधिवक्ते यांना ते दाखवून घ्यावे.
अ. प्रकल्पाचे नाव, प्रकल्पातील कोणत्या मजल्यावर आणि कोणत्या दिशेला सदनिका आहे, त्याचे वर्णन, सदनिकेच्या षष्ठ्यसीमा, सदनिकेचे क्षेत्र (कार्पेट, बिल्टअप, सुपर बिल्टअप यांनुसार), संमत नकाशाच्या छायांकित प्रतीवर आपण घेत असलेल्या सदनिकेच्या मजल्याचे ‘डीमार्केशन’ करणे आणि बांधकाम व्यावसायिकाने त्या सदनिकेला दिलेला क्रमांक त्या सदनिकेच्या पार्किंग जागेला देऊन निश्चिती करणे.
आ. बांधकाम व्यावसायिक देत असलेल्या दर्जात्मक सोयी-सुविधा असलेला तक्ता (स्पेसिफिकेशन) करारपत्रात जोडावा.
इ. आपल्याला पार्किंगसाठी वर्ग करून दिलेले क्षेत्र नकाशावर अधोरेखित करून त्यावर बिल्डरची आणि आपली स्वाक्षरी करावी.
ई. बिल्डर सदनिकेचे पाणी आणि वीज जोडणीसह, मीटरसह चालू करून देईल आणि त्यासाठीची अनामत रक्कम, संमत करून घेण्यासाठी येणारा व्यय खरेदीदार करेल.
उ. बांधकाम करारासाठी साक्षीदार कुणाला करावे, याचा सल्ला अधिवक्त्यांकडून घ्यावा. बांधकाम व्यावसायिकाने करारपत्र दिल्यानंतर ते अधिवक्त्यांकडून पडताळून घेऊन मगच अंतिम करार करावा. शक्य असल्यास, कराराची बोलणी अथवा करार करतांना आपल्या माहितगार स्थापत्य अभियंत्यास समवेत घेऊन जावे, जेणेकरून फसवणूक होणार नाही.
ऊ. सदनिकेचे बांधकाम चालू असतांना बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला काही रक्कम त्या बांधकाम व्यावसायिकाला द्यावी लागते. ती सर्व रक्कम केवळ धनादेशाद्वारेे (चेक) द्यावी, तसेच त्याची पक्की पावती त्याच वेळेस घ्यावी. जेणेकरून त्याची नोंद राहील. रोख रक्कम देऊ नये. (ही रक्कम ठरलेल्या बांधकाम दराप्रमाणे ठरलेल्या क्षेत्राला गुणून येईल त्याप्रमाणे असेल.) ही रक्कम देतांना दोघांच्या सामायिक परिचयातील व्यक्तीच्या मध्यस्थीने द्यावी. बांधकामाची रक्कम देण्याचे टप्पे पुढीलप्रमाणे आहेत.
सदनिकेचे दर आणि देयक टप्पे हे ती कोणत्या मजल्यावर आहे, त्यानुसार ठरतात. जर बांधकाम प्रकल्प स्थावर संपदा नियामक प्राधिकरण (Real-Estate Regulatory Authority) अंतर्गत येत असेल, तर बांधकामाच्या कोणत्या टप्प्यावर किती देयक द्यायचे, हे या कायद्याच्या अंतर्गत निश्चित आहे. त्यानुसार देयक द्यावे. ज्या ठिकाणी वरील कायदा लागू नाही, तेथे पुढे नमूद केलेल्या उदाहरणानुसार देयक द्यावे. प्रत्येक टप्प्यावर याप्रमाणे द्यायच्या रकमेचा उल्लेख लेखी नोंदणीकृत करारात होणे आवश्यक आहे.
सदर देयकाचे टप्पे कसे असावेत, याचे उदाहरण सदनिका दुसर्या मजल्यावर असल्याचे ग्राह्य धरून बनवले आहे.
अशा पद्धतीने व्यवहार करणे ही आदर्श पद्धत आहे. तारतम्याने यात थोडा-फार पालट होऊ शकतो. अगदीच एकरकमी व्यवहार केल्यास पैसे गुंतून पडण्याची अथवा फसवले जाण्याची शक्यता असते.
९. बांधकाम दर्जा आणि पूर्तता इत्यांदीविषयी काय करावे ?
प्रकल्पाचे बांधकाम चालू असतांना बांधकाम व्यावसायिक वापरत असलेले साहित्य आणि त्याची काम करायची पद्धत आपण तज्ञ स्थापत्य अभियंत्याला दाखवून निश्चिती करून घ्यावी. त्यात काही त्रुटी वाटल्यास बांधकाम व्यावसायिकाशी समक्ष बोलून घ्यावे.
१०. सदनिकेचा ताबा घेतांना काय करावे ?
बांधकाम व्यावसायिकाने सदनिकेचा ताबा घेण्यासाठी कळवल्यानंतर आपण आपल्या माहितगार तज्ञ स्थापत्य अभियंता आणि अधिवक्ता यांच्याकडून प्रत्यक्ष सदनिका अन् कागदपत्रांची पडताळणी करावी. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर करारपत्रानुसार स्लॅब-भिंतींना चिरा नाहीत, बांधकाम लिकेजविरहीत आहे, पाण्याचा उतार योग्य आहे, दरवाजे, खिडक्या व्यवस्थित आहेत, लादी, स्कर्टिंग पोकळ नाही, गिलावा एका लेवलमध्ये आहे, पाणी-वीज योग्य रितीने चालू आहे, यांची प्रत्यक्ष पडताळणी करून ते समाधानपूर्वक झाल्याची निश्चिती पटल्यावरच खरेदीपत्र / कन्व्हेअन्स डीड करावे. सर्व देवाणघेवाण हिशोब, पावत्या, कागदपत्रे पूर्ण करून बांधकाम व्यावसायिकाकडून पझेशन दिल्याचे प्रमाणपत्र घ्यावे.
बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्यामधील पालटांसह सुधारित नकाशा करून त्याप्रमाणे भोगवटा (कम्प्लिशन) प्रमाणपत्र घ्यावे. बांधकाम व्यावसायिकाकडून खरेदीपत्र आणि भोगवटापत्र एकत्रित घेऊन मगच सदनिकेचा ताबा घ्यावा.
सदनिका खरेदी करतांना शक्यतो तयार सदनिका (रेडी) घेण्यास प्राधान्य द्यावे.
– श्री. मधुसूदन कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.१०.२०२०)
घर आणि जागा यांची खरेदी किंवा घर भाड्याने घेण्याच्या प्रक्रियेत फसवणूक करणार्या किंवा तसे करत असल्याचा संशय असलेल्या व्यक्तींची माहिती कळवा !१. बाजारभावापेक्षा अधिक भावाने घर किंवा जमिनीचे दर आकारणे २. कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता न करणे किंवा त्याविषयी संदिग्धता ठेवणे ३. साधकांना विक्रीसाठी दाखवल्या जाणार्या जमिनीत घर बांधण्यासाठी कायदेशीर सोपस्कार पूर्ण केलेले नसणे ४. विविध सोयीसुविधांसाठी अधिक प्रमाणात रक्कम आकारणे ५. घर बांधत असतांना प्रचलित नियमानुसार टप्प्याटप्प्याने पैसे न घेता आगाऊ मोठी रक्कम घेणे आणि घर कह्यात देण्यापूर्वीच सर्व पैसे घेणे ६. इमारत किंवा बंगले बांधण्यासाठी दाखवलेल्या जागेची नोंदणी नसतांना व्यवहार करायला सांगणे ७. जागा किंवा सदनिका खरेदी करतांना ते रोखीने करण्यास सांगणे आणि त्याची, तसेच वस्तू व सेवा कराची (‘जीएस्टी’ची) पावती देणार नसल्याचे सांगणे ८. ‘तुम्ही दुसर्यांना जागा घेण्यास प्रवृत्त केल्यास तुम्हाला खरेदीत सवलत देऊ’, असे सांगणे ९. ‘माझे सनातनशी जवळचे संबंध आहेत’, ‘मी सनातनचा अर्पणदाता अथवा वाचक आहे’, ‘मी तुमच्या कार्यक्रमांना उद्बोधित करतो’, ‘मी तुमचे कार्यक्रम आयोजित करतो’ आदी खोटी माहिती सांगणे १०. स्वतःकडील सर्व प्लॉट किंवा सदनिका संपत असल्याचे खोटे सांगून साधकांना घाईघाईने व्यवहार करण्यास उद्युक्त करणे अशा विविध प्रकारे साधकांची फसवणूक केली जात आहे. असे किंवा अन्य कोणत्या माध्यमातून फसवणूक झाली असल्यास किंवा तसा प्रयत्न कुणी केला असल्यास साधकांनी त्याची सविस्तर माहिती खालील पत्त्यावर लेखी कळवावी. त्या माहितीच्या आधारे अन्य साधकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी प्रयत्न करता येईल. नाव आणि संपर्क क्रमांक : सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१० टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१ संगणकीय पत्ता : sanatan.sanstha2025@gmail.com – श्री. वीरेंद्र मराठे, व्यवस्थापकीय विश्वस्त, सनातन संस्था. |
वाचकांना विनंती ! : साधक आणि वाचक यांनी हा लेख संग्रही ठेवावा.