साधकांनो, पर्यायी ठिकाणी घर किंवा जागा विकत घेतांना किंवा घर भाड्याने घेतांना होणारी फसवणूक टाळण्यासाठी सतर्क रहा !
आपत्काळाच्या पूर्वसिद्धतेच्या दृष्टीने सध्या काही साधक पर्यायी ठिकाणी घर किंवा जागा विकत घेण्याच्या प्रयत्नात आहेत, तसेच काही साधक घर भाड्याने घेत आहेत. काही साधक त्यांना अपरिचित असलेल्या ठिकाणी घर किंवा जागा खरेदी करत असतांना मालमत्ता खरेदीच्या प्रक्रियेतील काही लोक अव्वाच्या सव्वा दर सांगून साधकांची फसवणूक करत आहेत, असे लक्षात आले आहे. अशाच प्रकारे घरभाड्यासाठीही अवाजवी रक्कम आकारली जात आहे. अनोळखी ठिकाणी घर किंवा जागा खरेदी करतांना साधक ओळखीतील स्थानिक साधकांचे परस्पर साहाय्य घेतात; पण साहाय्य करणारे साधकही या क्षेत्रात अननुभवी असल्यास त्यांचीही फसवणूक होते, असे लक्षात आले आहे.
घर किंवा जागा यांची खरेदी किंवा घर भाड्याने घेतांना होणारी फसवणूक टाळण्यासाठी साधकांनी स्वत:ला कोणत्या क्षेत्रात स्थलांतरित व्हायचे आहे, याविषयी स्वतःच्या उत्तरदायी साधकांना कळवावे. उत्तरदायी साधकांनी अशा साधकांची प्राप्त झालेली माहिती, ते साधक ज्या जिल्ह्यात स्थलांतरित होण्यास इच्छुक आहेत, त्या जिल्ह्यातील उत्तरदायी साधकांना कळवावी.
साधक स्थलांतरित होतांना वेगवेगळ्या गावांत अथवा तालुक्यात एकएकटे न रहाता साधनेच्या दृष्टीने परस्परांना पूरक होण्यासाठी सोयीस्कर अशा एखाद्या गावात अथवा तालुक्यात जवळपास घरे घेऊन रहाण्याचे नियोजन करत आहेत. अशा प्रकारे एकत्रित रहाण्याचे नियोजन करणार्या साधकांच्या समुहात वरील इच्छुक साधकांना समाविष्ट करण्याचे नियोजन उत्तरदायी साधकाने करावे.
अ. स्थलांतर होत असलेल्या जिल्ह्यातील उत्तरदायी साधकांचे दायित्व
१. जिल्ह्यात कोणकोणत्या भागांत साधक समुहाने रहाणार आहेत, याची माहिती स्थलांतर करण्यास इच्छुक असलेल्या साधकाला द्यावी. तसेच अशा समुहाच्या ठिकाणी त्याने निवडलेले घर किंवा जमीन यांचा दर स्थानिक भावानुसार योग्य आहे कि नाही, हे ठरवण्यासाठी जिल्ह्यातील या क्षेत्रातील अनुभवी साधक किंवा हितचिंतक यांना त्या साधकाशी जोडून देणे.
२. स्थलांतरित होण्यास इच्छुक असलेल्या साधकाला भाड्याने घर हवे असल्यास त्यालाही वरीलप्रमाणे साहाय्य करावे.
आ. स्थलांतरित होण्यास इच्छुक असलेल्या साधकांसाठी सूचना
१. स्थलांतरित होण्यास इच्छुक असलेल्या जिल्ह्यात किती ठिकाणी साधक समुहाने रहाणार आहेत, याची माहिती त्या जिल्ह्याच्या उत्तरदायी साधकाकडून घ्यावी. त्या जिल्ह्यात एकापेक्षा अधिक ठिकाणी साधक समुहाने रहाणार असल्यास त्यांपैकी कोणत्या ठिकाणी स्थायिक व्हायचे आहे, हे स्वत: ठरवावे. त्या जिल्ह्यातील उत्तरदायी साधक केवळ स्थानिक भावानुसार त्या मालमत्तेचा दर योग्य आहे कि नाही, हे ठरवण्यासाठी या क्षेत्रातील अनुभवी साधक किंवा हितचिंतक यांना जोडून देतील.
२. साधकांनी स्थलांतरित होत असलेल्या जिल्ह्यातील उत्तरदायी साधकांच्या व्यतिरिक्त अन्य साधकांशी परस्पर संपर्क करून कोणताही व्यवहार करणे टाळावे, तरीही असे केल्यास ते साधकाचे वैयक्तिक दायित्व असेल.
३. घर किंवा जमीन यांची खरेदी किंवा भाडेतत्त्वावर घेण्यासाठी आवश्यक असणार्या सर्व कायदेशीर बाजूंची खातरजमा स्वत: करावी.
४. स्थलांतरित होत असलेल्या जिल्ह्यातील उत्तरदायी साधकांनी साहाय्यासाठी जोडून दिलेल्या साधकांच्या किंवा अन्य कोणाच्या माहितीवर विसंबून राहू नये. त्या माहितीची स्वत: खातरजमा करावी. खरेदीच्या संपूर्ण प्रक्रियेच्या निर्णयाचे दायित्व साधकाचे स्वत:चे असेल.
५. घर भाड्याने घेण्याच्या संपूर्ण प्रक्रियेच्या निर्णयाचे दायित्व साधकाचे स्वत:चे राहील.
– श्री. वीरेंद्र मराठे, व्यवस्थापकीय विश्वस्त, सनातन संस्था. (३१.१०.२०२०)
घर आणि जागा यांची खरेदी किंवा घर भाड्याने घेण्याच्या प्रक्रियेत फसवणूक करणार्या किंवा तसे करत असल्याचा संशय असलेल्या व्यक्तींची माहिती कळवा !१. बाजारभावापेक्षा अधिक भावाने घर किंवा जमिनीचे दर आकारणे २. कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता न करणे किंवात्याविषयी संदिग्धता ठेवणे ३. साधकांना विक्रीसाठी दाखवल्या जाणार्या जमिनीत घर बांधण्यासाठी कायदेशीर सोपस्कार पूर्ण केलेले नसणे ४. विविध सोयीसुविधांसाठी अधिक प्रमाणात रक्कम आकारणे ५. घर बांधत असतांना प्रचलित नियमानुसार टप्प्याटप्प्याने पैसे न घेता आगाऊ मोठीरक्कम घेणे आणि घर कह्यात देण्यापूर्वीच सर्व पैसे घेणे ६. इमारत किंवा बंगले बांधण्यासाठी दाखवलेल्या जागेची नोंदणी नसतांना व्यवहार करायला सांगणे ७. जागा किंवा सदनिका खरेदी करतांना ते रोखीने करण्यास सांगणे आणि त्याची, तसेच वस्तू व सेवा कराची (‘जीएस्टी’ची) पावती देणार नसल्याचे सांगणे ८. ‘तुम्ही दुसर्यांना जागा घेण्यास प्रवृत्त केल्यास तुम्हाला खरेदीत सवलत देऊ’, असे सांगणे ९. ‘माझे सनातनशी जवळचे संबंध आहेत’, ‘मी सनातनचा अर्पणदाता अथवा वाचक आहे’, ‘मी तुमच्या कार्यक्रमांना उद्बोधित करतो’, ‘मी तुमचे कार्यक्रम आयोजित करतो’ आदी खोटी माहिती सांगणे १०. स्वतःकडील सर्व प्लॉट किंवा सदनिका संपत असल्याचे खोटे सांगून साधकांना घाईघाईने व्यवहार करण्यास उद्युक्त करणे अशा विविध प्रकारे साधकांची फसवणूक केली जात आहे. असे किंवा अन्य कोणत्या माध्यमातून फसवणूक झाली असल्यास किंवा तसा प्रयत्न कुणी केला असल्यास साधकांनी त्याची सविस्तर माहिती खालील पत्त्यावर लेखी कळवावी. त्या माहितीच्या आधारे अन्य साधकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी प्रयत्न करता येईल. नाव आणि संपर्क क्रमांक : सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१० टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१ संगणकीय पत्ता : sanatan.sanstha2025@gmail.com |