आश्विन मासातील शरद पौर्णिमेचे महत्त्व
३० ऑक्टोबर २०२० या दिवशी असलेल्या ‘शरद पौर्णिमे’च्या निमित्ताने…
१. ‘वर्षभरात एक दिवस असा असतो, ज्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ असतो. तो दिवस आहे शरद पौर्णिमेचा दिवस !
२. श्रीमद्भगवद्गीतेत सांगितलेले चंद्राचे महत्त्व
‘नक्षत्राणामहं शशी’ (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १०, श्लोक २१) म्हणजे ‘मी नक्षत्रांचा अधिपती चंद्र आहे.’
पुष्णामि चौषधीः सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः ।
श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १५, श्लोक १३
अर्थ : रसरूप अर्थात् अमृतमय चंद्र होऊन मी सर्व वनस्पतींचे पोषण करतो.
सोम अर्थात चंद्र बनून औषधींना (वनस्पती) मी पुष्ट करतो आणि सर्वांच्या हृदयाचे ठोके चालवणारा आत्मारामसुद्धा मीच आहे.
३. लक्ष्मीप्राप्तीचा सुंदर उपाय !
स्कंद पुराणात सांगितले आहे की, शरद पौर्णिमेच्या मध्यरात्री वर देणारी लक्ष्मीदेवी विचरण (फिरत) करत असते. लक्ष्मीदेवी म्हणते, ‘त्या रात्री जो जागरण आणि लक्ष्मीपूजन करतो, लक्ष्मीनारायणाचे तेज चंद्रात न्याहाळतो आणि आपले हृदय हृदयेश्वराने शीतल करतो (अर्थात् अंतर्यामी परमात्म्यात विश्रांती मिळवतो), तसेच त्याच्या चांदण्यात आपले चित्त प्रसन्न करतो अन् भगवंताचे स्मरण-चिंतन करतो, त्याच्या घरी मी निवास करते.’
४. अशांत माणसानेही पौर्णिमेच्या चंद्राचे दर्शन केले अथवा चंद्रप्रकाशात थोडा फेरफटका मारला, तर त्याची अशांती न्यून होते.
५. आरोग्य चांगले राहून वर्षभर निरोगी रहाता यावे, यासाठी हे करून पहावे !
पौर्णिमेचा चंद्र आणि त्यातही आश्विन शुक्ल पौर्णिमेचा चंद्र औषधींना पुष्ट करणे, मनुष्याच्या मनाची प्रसन्नता वाढवणे आणि वर्षभराच्या आरोग्यात साहाय्य करणे, यांसाठी प्रसिद्ध आहे. शरद पौर्णिमेच्या रात्री दुधात पोहे अथवा भात टाकून खीर बनवावी आणि सुती कापडाने झाकून ती चंद्राच्या प्रकाशात ठेवावी. रात्री १० ते १२ या वेळेत त्यात चंद्राची जी किरणे पडतात, ती अत्यंत हितकारी असतात. त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती आणि जीवनशक्ती वाढते. चंद्रकिरणांमध्ये ठेवलेली ही खीर भगवंताला मानस नैवेद्य दाखवून ग्रहण करावी. वर्षभर निरोगी रहाता यावे अथवा एखाद्या कारणाने रोग आला, तर त्याला सहजच पळवून लावता यावे, यासाठी हा प्रयोग अवश्य केला पाहिजे.
६. या दिवशी नृत्य-गायनाच्या समवेत ध्यान-भजनाचा सुंदर समन्वय असला पाहिजे. यामुळे चित्त पवित्र होते.’
(संदर्भ : मासिक ‘लोक कल्याण सेतू’, सप्टेंबर २०१९)