पश्चिम आफ्रिकेत हिंदु धर्माची ज्योत जागवणारे पहिले धर्मप्रचारक स्वामी घनानंद !
पश्चिम आफ्रिकेतील घाना देश, ज्याचा अर्थ ‘एक लढाऊ राजा’, असा होतो. तेथील नागरिक केवळ हिंदु धर्मच मानत नाहीत, तर भारतियांसारखे ते देवीदेवतांची विधीवत् पूजाअर्चाही करतात ! घानामध्ये मागील ५० वर्षांपासून श्री गणेशाचे पूजन आणि मूर्तीविसर्जन यांची परंपरा चालत आली आहे. आफ्रिकेत गणेशोत्सवाची परंपरा कशी चालू झाली ? ते कोण होते, ज्यांनी भारतापासून ८ सहस्र ६५५ किलोमीटर लांब असलेल्या आफ्रिकेत हिंदु धर्माची ज्योत जागवली ? याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
१. स्वामी घनानंद यांचा जन्म आणि आध्यात्मिक जिज्ञासा
आफ्रिकेतील प्रथम हिंदु धर्मप्रचारक स्वामी घनानंद सरस्वती होते, जे मूळत: हिंदु नसतांनाही हिंदु धर्माचे स्वामी म्हणून ओळखले जातात. त्यांनी हिंदु धर्माची ज्योत पश्चिम आफ्रिकेतील घाना देशात प्रज्वलित आणि प्रकाशित केली. घनानंद यांचा जन्म १२ सप्टेंबर १९३७ या दिवशी घानाच्या मध्यक्षेत्रातील सेन्या बराकू गावामध्ये झाला. ते एका देशी घानावासी कुटुंबातील सदस्य होते आणि त्यांचे आईवडील धर्मांतरित ख्रिस्ती होते. घनानंद मात्र अतिशय कोवळ्या वयात ब्रह्मांडातील रहस्ये जाणून घेण्यास इच्छुक होते. त्यासाठी त्यांनी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे धार्मिक ग्रंथांमध्ये शोधण्याचा प्रयत्न केला.
२. फाळणीच्या वेळी सिंधी कुटुंबीय आफ्रिकेत जाणे आणि त्यांच्याकडून घनानंदांना हिंदु धर्माविषयी समजणे
आध्यात्मिक प्रश्नांचा शोध घेत असतांना घनानंद सिंधी लोकांच्या संपर्कात आले. जे वर्ष १९४७ मध्येे भारताच्या फाळणीच्या वेळी घानामध्ये स्थायिक झाले होते. फाळणीच्या वेळी लोकांना सांगण्यात आले होते की, ‘ते भारत आणि पाकिस्तान यांपैकी कोणत्याही देशात राहू शकतात’; परंतु त्या वेळची भयानक परिस्थिती पहाता हिंदु धर्माशी संबंध ठेवणार्या काही सिंधी कुटुंबांनी पाकिस्तानातून भारतात येण्यापेक्षा आफ्रिकेतील घानामध्ये निघून जाणे पसंत केले आणि तेथेच जाऊन राहिले.
३. सिंधी लोकांमुळे आफ्रिकी लोकांमध्ये हिंदु धर्माचे प्रचलन वाढणे आणि घनानंदांना हिंदु धर्माची ओढ लागणे
घाना देश भारताच्या स्वातंत्र्याच्या ५ मासांपूर्वी, म्हणजे ६ मार्च १९४७ या दिवशी इंग्रजांच्या दास्यातून मुक्त झाला. आफ्रिकी लोकांनी सिंधी कुटुंबांचे मनपूर्वक स्वागत केले आणि त्यांना घाना देशात रहाण्याची अनुमती दिली. तेव्हा प्रथमच आफ्रिकी नागरिकांना हिंदुु धर्माचा परिचय झाला. हळूहळू हिंदु धर्म घानाच्या लोकांमध्ये प्रचलित होऊ लागला. घनानंद तेव्हा १० वर्षांचे होते. ते लहान वयातच हिंदु धर्मामध्ये रुची घेऊ लागले. हिंदु धर्माकडे आकर्षित झाल्यानंतर घनानंद ईश्वराची पूजाअर्चा करू लागले. येथूनच आफ्रिकेत पूजेचे प्रचलन चालू झाले. हळूहळू घानामध्ये सर्व देव श्री गणेश, शिवपार्वती, श्रीकृष्ण आदींचे पूजन चालू झाले.
४. हिंदु धर्मातील रहस्यांच्या शोधात त्यांनी भारत गाठणे आणि स्वामी कृष्णानंदांचे शिष्यत्व पत्करणे
स्वामी घनानंद वर्ष १९६२ मध्ये २५ वर्षांचे असतांना घानाची राजधानी अकरा येथे गेले. तेथे २४ नोव्हेंबर या दिवशी स्वामी घनानंद यांनी ‘डिव्हाईन मिस्टिक पाथ सोसायटी’ची स्थापना केली आणि भक्तीमध्ये लीन झाले; परंतु त्यांचे मन सदैव हिंदु धर्मातील सखोलपणा जाणून घेण्यासाठी व्याकुळ होते. स्वामी घनानंद नेहमी हिंदु धर्माच्या रहस्यांच्या शोधात मग्न रहात. याच जिज्ञासेतून एक दिवस ते हिंदु धर्माशी संबंधित प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी उत्तर भारतात गेले. त्यानंतर वर्ष १९७५ मध्ये त्यांनी ऋषिकेश येथील ‘डिव्हाईन लाईफ सोसायटी’च्या साहाय्याने हिंंदु जीवन पद्धतीचा (सनातन धर्माचा) अभ्यास चालू केला. या काळात त्यांची प्रथमच स्वामी कृष्णानंद यांच्याशी भेट झाली. स्वामी कृष्णानंदांमुळे घनानंद एवढे प्रभावित झाले की, ते त्यांचे शिष्य बनले. स्वामी कृष्णानंद यांनी स्वामी म्हणून घनानंदांना दीक्षा दिली.
५. स्वामी घनानंदांमुळे १० सहस्रांहून अधिक घानावासियांनी हिंदु धर्मानुसार आचरण करणे
दीक्षा घेतल्यानंतर स्वामी घनानंद घानाला परत गेले. घानामध्ये स्वामी घनानंद सरस्वती यांनी ५ नवीन मंदिरांची स्थापना केली, जे ‘एएच्एम्’चे आधारशिला बनले. याखेरीज त्यांनी वर्ष १९७५ मध्ये आफ्रिकेतील घानामध्ये पहिल्या आफ्रिकी हिंदु मठाची स्थापना केली. हिंदु धर्माचे महान प्रचारक आणि धर्मगुरु स्वामी घनानंद यांनी १८ जानेवारी २०१६ या दिवशी जगाचा निरोप घेतला. ७८ वर्षीय स्वामी घनानंद यांनी प्रचार केलेल्या हिंदु मान्यता आजही घानामध्ये प्रचलित आहेत. सध्या १० सहस्रांहून अधिक घानावासीय हिंदु धर्माचे पालन करतात. त्यामध्ये बहुतांश जणांनी स्वेच्छेने हिंदु धर्म स्वीकारला आहे. घानाची राजधानी अकरा येथे सर्वार्ंत मोठे शिव मंदिर आहेे. जेथे प्रतिवर्षी गणेशचतुर्थी, रथयात्रा, तसेच हिंदु सण साजरे केले जातात. प्रतिवर्षी गणेशचतुर्थीच्या काळात घानाचे नागरिक आणि घानातील हिंदू श्री गणेशाची स्थापना करतात. त्यानंतर ३ दिवस श्री गणेशाचे पूजन केले जाते आणि त्यानंतर श्री गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते. येथील लोकांची मान्यता आहे की, ‘प्रत्येक ठिकाणी समुद्र असतो आणि श्री गणेश समुद्राच्या माध्यमातून सर्वांवर कृपा ठेवेल.’