गंगा नदीचे माहात्म्य
१. गंगा गौरवगान
‘भारतीय संस्कृतीत कलिमलनाशिनी गंगेचा महिमा अपार आहे. प्राचीन ऋषींनी यामुळे प्रभावित होऊन विविध स्वरूपांत भावपुष्पांजली अर्पण करून स्वतःला कृत्यकृत्य करून घेतले आहे.
‘श्रीमद्भागवत महापुराणा’त गंगा राजा भगीरथाला प्रश्न विचारते.
किं चाहं न भुवं यास्ये नरा मय्यामृजन्त्यघम् ।
मृजामि तदघं कुत्र राजंस्तत्र विचिन्त्यताम् ॥ – श्रीमद्भागवत, स्कन्ध ९, अध्याय ९, श्लोक ५
अर्थ : गंगा राजा भगीरथाला म्हणते, ‘‘लोक माझ्याकडे येऊन आपली पापे धुतील; म्हणून मी पृथ्वीवर येणार नाही; कारण मग माझ्याकडे आलेले पाप मी कुठे धुणार ? भगीरथा, तू या विषयावरविचार कर.’’
हा प्रश्न महत्त्वाचा होता; पण महाराज भगीरथानेही याचे गूढ भाषेत प्रत्युत्तर दिले.
साधवो न्यासिनः शान्ता ब्रह्मिष्ठा लोकपावनाः ।
हरन्त्यघं तेऽङ्गसङ्गात् तेष्वास्ते ह्यघभिद्धरिः ॥ – श्रीमद्भागवत, स्कन्ध ९, अध्याय ९, श्लोक ६
अर्थ : सदाचारसंपन्न, शांत चित्ताचे, ब्रह्मज्ञानी असे सत्पुरुष त्रैलोक्याला पवित्र करणारे असतात. ते (स्नान करतांना) आपल्या शरीरस्पर्शाने तुझ्यातील पाप नष्ट करतील; कारण त्यांच्या हृदयात नेहमीच पापांचा नाश करणारा भगवान विष्णु वास करतो.
श्रीरामचरितमानसमध्ये म्हटले आहे,
गंग सकल मुद मंगल मूला ।
सब सुख करनि हरनि सब सूला ॥ – रामचरितमानस, अयोध्याकाण्ड, श्लोक ८६
अर्थ : गंगा ही समस्त आनंद आणि मंगल यांचे मूळ आहे. ती सर्व सुखे देणारी आणि सगळ्या त्रासांचे हरण करणारी आहे.
धन्य देस सो जहँ सुरसरी । – रामचरितमानस, उत्तरकाण्ड, श्लोक १२६
अर्थ : हा भारत देश यासाठी धन्यवादास पात्र आहे की, या देशात गंगेसारख्या पावन देवनदीचानिवास आहे.
२. गंगा नदीच्या जलात जंतूंना मारण्याची शक्ती अधिक असणे
रुरकी विद्यापिठात गंगाजलावर काही प्रयोग करण्यात आले. त्यांतून हा निष्कर्ष निघाला की, गंगाजलात जंतूंना मारण्याची शक्ती इतर नद्यांच्या जलाहून अधिक आहे.
आपल्या वैद्यकशास्त्राने सुधातुल्य अशा गंगाजलाविषयी असे लिहिले आहे,
स्वादुपाकरसं शीतं द्विदोषशमनं तथा ।
पवित्रमपि पथ्यं च गङ्गावारि मनोहरम् ॥
अर्थ : गंगेचे पाणी हे चवीला गोड असते, तसेच पोटात जठराग्नीच्या संस्कारानेही ते गोडच रहाते. ते शीतल, तसेच शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही दोषांचे शमन करणारे आहे. असे हे मनोहर गंगाजल पवित्रही आहे आणि पथ्यकरही आहे.
३. भगवद्गीतेतील गंगा नदीचे माहात्म्य
ज्या गंगेविषयी भगवान श्रीकृष्णाने ‘स्रोतसामस्मि जान्हवी ।’ (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १०, श्लोक ३१) म्हणजे ‘सर्व प्रवाहांत मी गंगा आहे’, असे म्हणून तिची यशोगाथा सांगितली आहे, त्या महिमामयी माता गंगेविषयी आणखी काय सांगावे ?’
(संदर्भ : मासिक ‘ऋषीप्रसाद’ (मे २००७))