आधुनिकतेच्या नावाखाली बोकाळलेला स्वैराचार आणि ढासळलेली नैतिकता !
१. कारणे
१ अ. सध्याची दिशाहीन शिक्षणपद्धत : ‘सध्याची शिक्षणपद्धत अशी झाली आहे की, मुलांना थोर आध्यात्मिक व्यक्तींचे मोठेपण दाखवण्याची सोय राहिली नाही. जीवन मूल्यांविषयी सर्वत्र प्रचंड अज्ञान पसरलेले आहे. या तरुणांना मूलभूत मूल्यांचे शिक्षण देऊन उच्च आदर्श कोण प्रस्थापित करणार आहे ? आदर्श मिळाल्यानंतर त्यांच्या जीवनात सुख, शांती, आनंद येऊ शकेल. त्याची आवश्यकता मुलांना हवा पाण्याइतकीच अत्यावश्यक आहे. आज मुलांनी परीक्षेत उत्तीर्ण व्हावे, म्हणून असंख्य माहिती मुलांच्या डोक्यात कोंबण्यात येत असते. एकीकडे विज्ञानाचे नको इतके महत्त्व वाढवून ठेवले आहे आणि दुसरीकडे प्रसारमाध्यमे खालच्या दर्जाची भावविवशता, लैंगिकता, चोरी, दरोडे, हिंसा यांचे प्रक्षेपण करून निष्पाप भोळ्या मनांना पथभ्रष्ट करत असतात. शिक्षणक्षेत्रात कार्य करणार्या माणसांनाही आता याचे काही वाटेनासे झाले आहे. स्वतःला बुद्धीवादी म्हणवणारी माणसे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे हे सांगू इच्छितात का की, माणसाचा दुबळेपणा नैसर्गिक असतो आणि आदर्शाचा ध्यास हा मूर्खपणा असतो ?
१ आ. पाश्चात्त्य देशात स्वातंत्र्याचे रूपांतर स्वैराचारात होणे : एका सार्वजनिक सभेत एक मंत्री महोदय म्हणाले, ‘‘एका मर्यादेपर्यंत ‘रॅगिंग’ हानीकारक नसते.’’ त्यांच्या या वक्तव्यावर मुलांनी आनंदित होऊन टाळ्या वाजवल्या होत्या. पाश्चिमात्य देशात दिसून येणार्या स्वातंत्र्याच्या स्वच्छंद वृत्तीने भारतीय भावनाप्रधान तरुण भारावला गेला आहे; परंतु त्या तरुणांची देशभक्ती, उद्योगप्रियता, कर्तव्यतत्परता, परिश्रम करण्याचा स्वभाव या गुणांचे अनुकरण भारतीय तरुण करत नसतात. वर्ष १९६४ मध्ये लंडन विद्यापिठातून प्रसिद्ध इतिहासतज्ञ ए.एल्. बाशम भारतात आले होते. ते पत्रकार परिषदेत म्हणाले, ‘‘पाश्चिमात्य जगातील चित्रपट, साहित्य, नृत्य आणि संगीत इत्यादींमुळेे भारतीय युवक भारावलेला दिसतो. युरोपमधील तारुण्य सुलभ आणि मोकळे वातावरण आपणासही लाभावे, असे त्यांना वाटते; परंतु ही स्वच्छंद वृत्ती युरोपातील तरुणांना खरे सुख देऊ शकली नाही. भारतीय तरुण या सुखाची अपेक्षा करतो आहे. भारतीय तरुणांनी एक-दोन पिढ्यानंतर ही वृत्ती स्वीकारली आहे, असे घडू शकते. भारतीय समाजात स्त्री-पुरुष एकत्र मिसळत असतांना बंधने आहेत आणि इथे पारंपरिक विवाह पद्धती रूढ आहे; म्हणून इथे कुटुंबात स्थैर्य असते. पाश्चात्त्य देशात स्वातंत्र्याचे रूपांतर स्वैराचारात झाले आहे. आज तिथे कुटुंबे तुटत आहेत. मुलेही घरदार सोडून अनाथालयाचा आश्रय घेत आहेत.’’
१ इ. स्वतःची संस्कृती सोडून पाश्चात्त्यांच्या अयोग्य जीवन पद्धतीचे भ्रष्ट अनुकरण करणारे भारतीय तरुण ! : पाश्चिमात्य देशांत ज्या लैंगिक स्वैराचाराने कुटुंबव्यवस्था मोडकळीस आणली आहे, ती पद्धत आपण स्वीकारली, तर देशाच्या होणार्या हानीची आपण कल्पना करू शकतो. पाश्चिमात्यांनासुद्धा त्यांची चूक आता लक्षात आली आहे. तेथील तरुणांमध्ये आध्यात्मिक विचार जागे होऊ लागले आहेत. आपले भारतीय तरुण देशाची संस्कृती सोडून पाश्चात्त्य देशांचे भ्रष्ट अनुकरण करण्यात गुंतले आहेत. यापेक्षा जास्त आत्मनिंदा आणखी कोणती असावी ?
२. विज्ञानाचा लाभ न घेता आल्याने झालेली अधोगती
२ अ. परमेश्वराची कृपा झाली, तरी त्या कृपेचा योग्य तो लाभ करून घेणे, हे सर्वस्वी आपल्याच हातात असणे : ‘ऑस्कर वाईल्ड’ची कथा आहे. एकदा येशू ख्रिस्त गावातून शहराकडे जात होते. त्यांना वाटेत एक मद्यपी नाल्याजवळ पडलेला दिसला. त्यांनी त्या माणसाला विचारले, ‘‘तू इतकी दारू पिऊन नाल्याकाठी का पडला आहेस ?’’ तरुण म्हणाला, ‘‘प्रभो, मी तर महारोगी होतो. तुमच्या कृपेने मी बरा झालो. मी आता दुसरे तरी काय करू शकतो ?’’ येशू ख्रिस्तांनी एक लांब निःश्वास सोडला. नंतर त्यांना एक माणूस वेश्येच्या मागोमाग जातांना दिसला. ते म्हणाले, ‘‘तू वेश्यागमन करून तुझ्या आत्म्याचे पतन का करतोस ?’’ माणूस उत्तरला, ‘‘महाराज, मी आंधळा होतो. तुमच्या कृपाप्रसादाने मला दृष्टी लाभली. मी आता अजून काय करावे ?’’ नंतर येशू ख्रिस्त शहरात आल्यावर त्यांना एक वृद्ध शारीरिक वेदनांनी कण्हतांना दिसला. त्यांंनी त्याला विचारले, ‘‘तुला काय झाले ?’’ वृद्ध म्हणाला, ‘‘मी तर मेलो होतो. आपणच मला जिवंत केले आहे. आता विव्हळण्यापलीकडे मी काय करणार ?’’ त्या सर्वांनी ख्रिस्ताच्या करुणेचा अयोग्य वापर केला होता.
२ आ. विज्ञान जगाला विनाशाच्या शोकांतिकेकडे घेऊन जात आहे, असे वाटणे ! : येशू ख्रिस्ताने त्यांच्या अतींद्रिय शक्तीचा वापर करून जे साधले होते, तेच आज विज्ञान साध्य करण्याचा प्रयत्न करत आहे. शल्यचिकित्सेच्या जादुई तंत्रज्ञानाने आणि आश्चर्यकारी औषधांनी विज्ञान रोगांवर मात करत आहे. वृद्धत्वाला थोपवण्याचा प्रयत्न करत आहे आणि काय सांगावे, मृत्यूवरसुद्धा विजय मिळवेल; परंतु माणूस या ज्ञानाचा उपयोग स्वतःसाठी किंवा समाजासाठी करतो आहे का ? कि तो ‘ऑस्कर वाईल्ड’च्या कथेप्रमाणे इंद्रियभोगांच्या तृप्तीसाठी पाठलाग करत आहे ? मूल्यांच्या आधारावर मानसिक बळ वाढवण्याचा प्रयत्न करत आहे ? कि स्वतःला विनाशाच्या शोकांतिकेकडे घेऊन जात आहे ?
२ इ. संशोधनाचा उपयोग विश्वकल्याणाऐवजी काल्पनिक शत्रूच्या नायनाटासाठी केला जाणे : संयुक्त राष्ट्रांचे तज्ञ सांगतात, ‘‘या पृथ्वीवरील अर्धी लोकसंख्या ही कुपोषण आणि उपासमारीने ग्रस्त आहे. विश्वात सैन्यावर होणार्या व्ययाच्या एक टक्का जरी खाद्यान्नांच्या उत्पादनात व्यय झाला, तरी २० कोटी मुलांना जेवण मिळू शकते; पण कुणीही मुलांच्या आहारासाठी पैसे वाचवत नसतात. विश्वसंहारक शस्त्रास्त्रांच्या निर्मितीसाठी आणि त्यांचे जतन करण्यासाठी सर्व पैसा उधळला जात आहे. या मानसिकतेने विश्वाचे कल्याण होत नसते. आपले सर्व शोध, संशोधन, सर्व शक्ती मित्रांच्या कल्याणासाठी नसतात, तर ही संशोधने काल्पनिक शत्रूंचा नायनाटासाठी असतात.
२ ई. केवळ तंत्रज्ञान विकास हा मानवी विकासासाठी धोकादायक ! : केवळ यांत्रिक आणि तंत्रज्ञानाच्या विकासाने आपले भले होत नसते; कारण त्यासमवेत दयाळूपणा, सहानभूती, आत्मसंयम, निःस्वार्थता, सहकार्य करण्याची वृत्ती आदी गुणांचा विकास मानवी जीवनात झालेला नसतो. त्यामुळे नुसता तंत्रज्ञान विकास हा मानवी विकासासाठी धोकादायक असतो.
३. विज्ञानाचे भयावह स्वरूप
३ अ. वैज्ञानिकांनी निसर्गाच्या नानाविध शक्तींचा शोध घेऊन काढलेली रहस्ये अयोग्य माणसांच्या हातात पडल्याने विज्ञानाचे स्वरूप भयावह होणे : वैज्ञानिक आणि बुद्धीजीवी माणसे निरनिराळ्या क्षेत्रांत सत्याचा शोध घेण्यासाठी त्यांचे जीवन समर्पित करत असतात. निसर्गाच्या नानाविध शक्तींचा शोध घेऊन तंत्रज्ञानाद्वारे माणसासाठी त्याचा उपयोग होत असतो; परंतु वैज्ञानिकांच्या या श्रमाचा अपलाभ माणसातील वाईट प्रवृत्तींना मिळत आहे. वैज्ञानिकांनी अविश्रांत श्रमाने शोधून काढलेली ही रहस्ये अयोग्य माणसाच्या हातात पडल्याने त्याच्या विनाशाचा मार्ग आज सुलभ झाला आहे. त्यामुळे आज आपण विज्ञानाचे भयावह स्वरूप पहात आहोत.
३ आ. अमेरिकेने हिरोशिमावर टाकलेल्या अणूबॉम्बचे झालेले दुष्परिणाम : ६.८.१९४५ या दिवशी सकाळी ७.४५ वाजता अमेरिकेने हिरोशिमा शहरावर टाकलेल्या पहिल्या अणूबॉम्बमुळे ६० सहस्र स्त्री-पुरुष बघता बघता काळाच्या कुशीत नाहीसे, तर लाखो घायाळ झाले. एक मोठे बंदर उद्ध्वस्त आणि एक मोठे शहर जळून उजाड झाले होते. एका मिनिटात सर्वकाही आगीत भक्ष झाले होते.
३ इ. अण्वस्त्र निर्मितीसाठी देशांमध्ये लागलेली आत्मघातकी चढाओढ : विज्ञानाने गेल्या काही वर्षांत प्रचंड प्रगती केली आहे; पण त्याच मानवी वंशाच्या विनाशाचे परिपूर्ण कौशल्यसुद्धा प्राप्त केले आहे. वृत्तपत्रात आलेला अहवाल सांगतो, ‘जगात ५ शक्तीशाली देशांनी वेगवेगळ्या क्षमतेची ५० सहस्र शक्तीशाली अण्वस्त्रे सिद्ध केली आहेत. हिरोशिमावर जो बॉम्ब टाकण्यात आला होता, त्यापेक्षाही ही अण्वस्त्रे १० लाख पटींनी जास्त संहारक आहेत. या अण्वस्त्रांपैकी ९५ ते ९७ टक्के अण्वस्त्रेे दोन देशांजवळ आहेत आणि उर्वरित चीन, इंग्लंड अन् फ्रान्स यांच्याजवळ आहेत. या दोन महाशक्तींनी अण्वस्त्र विकासासाठी प्रतिदिन १० दशलक्ष डॉलर्स व्यय केले आहेत आणि त्यांची निर्यात, संशोधन अन् योग्य जतन करण्यासाठी १०० दशलक्ष डॉलर्स व्यय केलेले आहेत. आजसुद्धा ही निर्मिती थांबण्याची काही लक्षणे दिसत नाहीत. अण्वस्त्र निर्मितीवर बंधने घालणारे अथवा बंदी घालणार्या करारांवर स्वाक्षर्या झाल्या आहेत; पण निःशस्त्रीकरणाविषयी कुणीही गंभीर नाही.’
३ ई. विध्वंसकांच्या दाहकतेची लागलेली झळ : १९ व्या शतकाच्या आधीच्या १ सहस्र वर्षांत युरोपमधील वेगवेगळ्या युद्धांत मरणार्यांची संख्या २० कोटी होती; परंतु केवळ १९ व्या शतकात ७० कोटी लोक मारले गेले आहेत. हा आकडा दुसर्या जागतिक युद्धापर्यंत मारल्या गेलेल्या माणसांचा आहे. त्यानंतरही जगातील अनेक युद्धांत १ कोटीपेक्षा जास्त माणसे मारली गेलेली आहेत.
४. विज्ञानामुळे झालेली अपरिमित हानी
४ अ. मनुष्यहानी : विज्ञानामुळे माणसाला आराम आणि सुख-सुविधा मिळाल्या आहेत. माणसावरील विज्ञानाची पकड वाढत चालली आहे. इंग्लंडमध्ये प्रतिवर्षी ७ सहस्र माणसे अपघातात मरतात, तर अमेरिकेत ४५ सहस्र माणसे प्राणांतिक अपघातात सापडतात आणि लाखो घायाळ होतात.
४ आ. व्यसनाधीनता वाढणे : विज्ञानामुळे माणसाला आरामदायक जीवन मिळाले आहे, हे खरे आहे; पण मद्याचे व्यसन वाढले आहे. वर्ष १९८२ मध्ये ‘लंडन टाइम्स’मध्ये जे लेख छापून आले होते, त्याचा हा सारांश आहे.
‘सभ्यतेत झालेली प्रगती हा खरोखर अभिमानाचा विषय आहे; पण मद्यपान केल्यावर उन्मत्त होऊन जनावरांपेक्षाही खालच्या दर्जाचे आचरण दुर्दैंवी आहे. अशा माणसांची संख्या आज वाढते आहे. वर्ष १९६१ मध्ये मद्य आणि सिगारेट यांसाठी १ सहस्र ५०० कोटी रुपये व्यय झाले आहेत. मद्यपान करून कार चालवतांना होणार्या अपघातांची संख्या प्रत्येक वर्षी वाढते आहे. ब्रिटनमध्ये प्रतिवर्षी ४०० कोटी रुपयांच्या मद्याची विक्री होत असते. तिथे मद्य आणि सिगारेटवर शासनाला प्रतिवर्षी १ सहस्र १७० कोटी रुपयांचे उत्पन्न होत असते.’
४ इ. अपराधी वृत्तीत वाढ होणे : विशेषज्ञ सांगतात, ‘तांत्रिकदृष्ट्या अमेरिका राष्ट्र सगळ्यात विकसित आहे. तिथे प्रति अर्ध्या घंट्याला एक हत्या आणि एक बलात्कार होत असतो. प्रत्येक घंट्याला १० दरोडे पडत असतात. प्रति घंटा ४० मोटारी चोरीला जात असतात. या घटनांची वार्षिक संख्या २० लाखांच्यावर असते. अपराध करतांना अपराधी अद्ययावत् तंत्रांचा वापर करत असतो. त्या कामात गुन्हेगार इतके हुशार असतात की, उत्तम पोलीस अधिकारीसुद्धा हतबल असतात. चार दरोड्यांपैकी एकाचाच सुगावा लागतो. वर्ष १९०० पासून ८ लाख माणसे बंदुकीच्या गोळ्यांनी मेली आहेत. यातून माणसातील हिंसक वृत्ती दिसून येते. १० सहस्रांहून अधिक माणसांनी स्वतःला गोळ्या घालून आत्महत्या केल्या आहेत.’
४ ई. वेदनाशामक आणि झोपेच्या गोळ्यांचा वापर प्रचंड प्रमाणात होणे : तज्ञांनी सादर केलेल्या अहवालातून त्यांच्या संघर्षाची तीव्रता आणि भयावहता लक्षात येईल. अमेरिकेत प्रतिवर्षी २८ सहस्र टन ‘अॅस्पिरीन’ आणि इतर वेदनाशामक औषधे लागतात. स्नायूंचा ताण शिथिल करण्यासाठी शेकडो कोटी रुपयांच्या औषधांची विक्री होत असते. असंख्य माणसे निद्रारोगाने हैराण असतात. त्यांना प्रतिदिन झोपेची गोळी घ्यावी लागते. महाविद्यालयातील तरुण-तरुणी मन शांत ठेवायला प्रतिदिन ‘टँ्रक्विलायझर’ गोळ्या घेत असतात.
४ ई १. एका पालकांना आलेला विदारक अनुभव : वर्ष १९७० मधील ‘रिडर्स डायजेस्ट’मध्ये मनाला हेलावून सोडणारा पुढील लेख आला. ‘एका माणसाच्या २० वर्षांच्या मुलीने ‘एल्.एस्.डी’ (मादक औषध) खाऊन इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून जीव दिला. मुलीच्या वडिलांनी अमेरिकेतील पालकांना आवाहन केले की, आमच्या कुटुंबावर आलेले शोकांतिकेचे दारुण सावट प्रत्येक कुटुंबात पसरत आहे. मुलांच्या शिक्षणाचा दर्जा, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक दर्जा यांपैकी एकही घटक मादक पदार्थाचे भक्ष्य होण्यापासून त्यांना परावृत्त करू शकत नसतो. तुमचा मुलगा शाळा, विद्यालय वा महाविद्यालयात शिकत असेल, तो आज याक्षणी मादक गोळ्यांच्या संपर्कात येत आहे ! तुम्हाला जर ते अशक्य वाटत असेल किंवा पटत नसेल, तर तुम्ही सगळयात मोठा अंधविश्वास जोपासत आहात.’
४ उ. वैज्ञानिक तंत्रज्ञानाने निर्माण झालेली भयावह परिस्थिती : सुखोपभोगाची आणि स्वैराचाराची साथ घेऊन वैज्ञानिक तंत्रज्ञानाने काय भयावह परिस्थिती माणसासाठी निर्माण केली आहे ! व्हिएतनामच्या लढ्यात ४५ सहस्र माणसे जहाल मादक सेवनाने मेलेली आहेत. मादक औषधांचा व्यापार करणारी अतीविशाल १३ आस्थापने जगात आहेत. ती त्या २ सहस्र कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल करत असतात.
(पूर्वार्ध)
– स्वामी जगदात्मानंद
अनुवाद – डॉ. विनय वैद्य, नागपूर
(संदर्भ : जगण्याची हातोटी (भाग २) आणि ‘जीवन-विकास’, फेब्रुवारी २०१३)
संपादकीय भूमिकापाश्चात्त्य देशात कुटुंबव्यवस्था मोडकळीस येण्याला स्वातंत्र्याचे स्वैराचारात रूपांतर होणे कारणीभूत ! |