अधिक मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व (१८ ते २६ सप्टेंबर २०२०)
‘१८.९.२०२० या दिवसापासून अधिक आश्विन मासाला आरंभ झाला आहे. अधिक मासापासून सर्वांना हिंंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.
१. हिंदु धर्मानुसार ‘शार्वरी’ नाम संवत्सर, शालिवाहन शक – १९४२, दक्षिणायन, शरद ऋतू, अधिक आश्विन मास आणि शुक्ल पक्ष चालू आहे.
२. शास्त्रार्थ
२ अ. अधिक मास : अधिक मासाविषयी विस्तृत माहिती ‘https://www.sanatan.org/mr/a/6627.html’ या लिंकवर उपलब्ध आहे. अधिक मासाला ‘पुरुषोत्तम मास’ म्हणतात. या मासात अधिकाधिक नामजप, दान आणि पुण्यकर्मे करावी. याचे फळ पुढील अधिक मासापर्यंत प्राप्त होते.
२ आ. क्षय दिन : १९.९.२०२० या दिवशी ‘क्षय दिन’ आहे. ज्या तिथीच्या वेळी सूर्योदयाची वेळ नसते, ती ‘क्षय तिथी’ असते. क्षय तिथी शुभकार्यासाठी वर्ज्य असते.
२ इ. विनायक चतुर्थी : प्रत्येक मासाच्या अमावास्येनंतर येणार्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला ‘विनायक चतुर्थी’ म्हणतात. या दिवशी श्री विनायक (गणेश) व्रत करतात. या दिवशी श्री विनायकी चतुर्थी माहात्म्य, व्रतकथा आणि श्री विनायक अष्टोत्तरशत नामस्तोत्र वाचतात. या उपासनेने सर्व कार्ये सिद्ध होतात.
२ ई. दुर्गाष्टमी : प्रत्येक मासाच्या अमावास्येनंतर येणार्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला ‘दुर्गाष्टमी’ म्हणतात. या दिवशी श्री दुर्गादेवीचे व्रत करतात. असुर शक्तींचा नाश होऊन भयमुक्त होण्यासाठी हे व्रत करतात. या दिवशी दुर्गासप्तशती स्तोत्र, कवच, अर्गला स्तोत्र आदी देवी स्तोत्रांचे वाचन करतात.
२ उ. यमघंट योग : रविवारी मघा, सोमवारी विशाखा, मंगळवारी आर्द्रा, बुधवारी मूळ, गुरुवारी कृत्तिका, शुक्रवारी रोहिणी आणि शनिवारी हस्त नक्षत्र एकत्र आल्यास ‘यमघंट योग’ होतो. हा अनिष्ट योग आहे. या योगावर कधीही प्रवास करू नये.
३. अधिक मासात करायच्या उपासनेसह या सप्ताहातील काही तिथींचे महत्त्व जाणून उपासना करणे लाभदायक आहे. सत्सेवेला प्राधान्य देऊन सतत ईश्वरी अनुसंधानात राहिल्यास मनुष्य जन्माचे सार्थक होते.’
– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, वास्तु विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाईड डाऊजर, रमल पंडित, हस्ताक्षर मनोविश्लेषणशास्त्र विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा.(१५.९.२०२०)