भारतात पातिव्रत्य हीच कुटुंबसंस्थेची भक्कम आधारशीला मानल्यामुळे समाजजीवन अबाधित रहाणे, तर पाश्चिमात्य देशांत उन्मत्त लैंगिकता असलेल्या समाजरचनेचा आग्रह धरल्यामुळे तेथील समाज आणि समाजजीवनच उद्ध्वस्त होणे !
१. ‘गुरुचरित्राच्या ३१ व्या अध्यायात पतिव्रता धर्माचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
१ अ. गुरुचरित्रात सतीची अबाधित महती सांगणार्या काही परमोदात्त सती-कथा असल्यामुळे गुरुचरित्राचे महत्त्व चिरंतन आणि शाश्वत असणे : पावित्र्याचा सतीचा महिमा सांगणार्या काही अद्भुत परमोदात्त सती-कथा गुरुचरित्रात आहेत. सतीची महती अबाधित आहे. अविच्छिन्न आहे, म्हणजेच गुरुचरित्राची गुरुता (गरिमा) ही चिरंतन आणि शाश्वत आहे.
१ आ. पातिव्रत्य हीच कुटुंबसंस्थेची भक्कम आधारशीला असल्याचे गुरुचरित्रात प्रतिपादन केलेले असणे : समाजाला आधारभूत अशी कुटुंबसंस्था भक्कम अशी हवी असेल, तर पातिव्रत्य हवेच. नव्हे; तर तीच कुटुंबाची आधारशीला (फाऊंडेशन स्टोन) आहे. त्याविना गतीच नाही.
१ इ. भारतात कुटुंबसंस्था आहे; म्हणूनच भारताचे भारतीयत्व आहे. वैदिकत्व आहे.
१ ई. एतद्देशप्रसूतस्य सकाशात् अग्रजन्मनः ।
स्वं स्वं चरित्रं शिक्षेरन् पृथिव्यां सर्वमानवाः ॥
– मनुस्मृति, अध्याय २, श्लोक २०
अर्थ : या भारत देशात जन्माला येणारे जे चारित्र्यसंपन्न आणि विद्वान लोक असतील, त्यांच्यापासून पृथ्वीवरील सर्व मानवांनी सदाचाराचे आणि सद्वर्तनाचे धडे घ्यावेत.
१ उ. भारतातील ब्राह्मण आणि सर्वसामान्य स्त्री-पुरुषांनी जीवनाच्या आचरणाचे पाठ घ्यावेत. वैदिक संस्कृतीची गुरुचरित्राची अशी प्रबळ (जबरदस्त) आत्मश्रद्धा आणि प्रतिज्ञा आहे.
१ ऊ. गुरुचरित्रातील पातिव्रत्याचा उत्तुंग आदर्श दाखवल्यानंतर त्या रोखाने काही अंतर तरी वाटचाल होऊन आदर्शाच्या रोखाने पावले पडण्यास शक्य होणे : गुरुचरित्रात पातिव्रत्याचा संपूर्ण तपशील आहे. क्वचित् कुठे काही अतिशयोक्ती वाटतही असेल. तो उत्तुंग आदर्श आहे. गौरीशंकर दाखवला की, त्या रोखाने वाटचाल होते. काही अंतर तर निश्चितच वर चढून जाता येईल. आदर्शाच्या रोखाने पावले पडतातच.
१ ए. गुरुचरित्रात मातृ-पितृ सेवेसमवेत पतीसेवेला प्रभुसेवा मानले असून त्यामुळे जिवाला देवत्व प्राप्त करता येत असल्याचे सांगितले असणे : पातिव्रत्याचे तत्त्व कुटुंबसंस्थेचा एकमेव आधार आहे. तेच आधारभूत तत्त्व आहे. तोवर ते आधारभूत तत्त्वही अबाधित राहिलच आणि राहिलेच पाहिजे. सती नसेल, तर घर, कुळ उद्ध्वस्त होते. धर्म घडतच नाही. सतीची महती मोठी आहे. गुरुचरित्र मातृ-पितृ सेवेला, पतीसेवेला ईश्वराचे अधिष्ठान देते. त्यामुळे पावित्र्याने ती सेवा उजळून निघाली आहे. ती सेवाच प्रभुसेवा आहे. भक्ती आणि मुक्ती देणारी आहे. भगवत्ता देणारी आहे.
१ ऐ. गुरुचरित्राचे पारायण कसे कराल ? : कोणतेही गाणे नुसत्या वाणीने न म्हणता अंतःकरणापासून म्हटल्यास श्रोत्याची भावसमाधी लागू शकते, तसे गुरुचरित्र वाचतांना चित्तात संसाराची पुसटती छायाही येऊ न देता वाचले, तरच भगवंताची अनुभूती येणे शक्य होणे विवेकानंदांची कथा आहे. नरेंद्र (विवेकानंद होण्याआधी) रामकृष्णांजवळ असतो. अनेक भक्त असतात. नरेंद्र नेहमीप्रमाणे गाणे म्हणतो. नरेंद्राचे गाणे ऐकता सतत लीन होणारे, भावसमाधीत जाणारे रामकृष्ण आज मधूनच उठून दुसर्या खोलीत जातात. सर्वांना धक्का बसतो. नरेंद्र तर रामकृष्णांचा परमप्रिय शिष्य ! नेहमीच तो गातो. बहुधा रामकृष्ण भावसमाधीत जातातच. ‘‘आज असे का ?’’ रामकृष्णांनाच ते विचारतात. रामकृष्ण सांगतात, ‘‘नरेंद्र गात होता. वाणीने गात होता, मनाने नव्हे. त्याचे चित्त नोकरीच्या शोधात कलकत्यात (आताच्या कोलकात्यात) फिरत होते. त्याचे मन भगवंतात नव्हते. उकीरडे धुंडाळणार्या मनाचे गाणे काय ऐकायचे ?’’
गुरुचरित्र वाचतांना चित्तात संसाराची यत्किंचितही पुसटती छायासुद्धा येऊ देऊ नका.’
२. पाश्चिमात्य देशात कुटुंबसंस्था नष्ट होण्याची कारणे
२ अ. कुटुंबसंस्थाच नामशेष करायची असेल, तसेच नियोजन असेल, तर पूर्ण अप्रासंगिक आहे. ‘ग्लास वॉटर थेअरी’च्या आधारावर ‘कम्युन’ (याचा अर्थ तादात्म्य पावणे) बनवायचे असतील, तर पूर्ण योग्य आहे.
२ आ. फ्राईड आणि त्याचे पश्चिमेतील भक्त यांनी उन्मत्त लैंगिकता (सेक्स) असलेल्या समाजरचनेचा आग्रह धरल्यामुळे तेथील समाज आणि समाजजीवनच उद्ध्वस्त होणे
२ आ १. फ्राईड आणि त्याचे पश्चिमेतील भक्त, उन्मत्त लैंगिकतेला (सेक्स) वाव देणारी समाजरचना हवी, असे आग्रहाने प्रतिपादतात.
२ आ २. समाज आणि समाजजीवनच जर उद्ध्वस्त करायचे (बनवायचे) असेल, नष्ट करायचे असेल, तर उन्मत्त लैंगिकता ते कार्य निश्चित यशस्वी करू शकेल.
२ इ. पाश्चिमात्य देशांत उन्मत्त लैंगिकतेला उत्तेजना देणे आणि अर्थशास्त्र अन् कारखानदारी यांचा विकास एवढेच मर्यादित ध्येय ठेवल्यामुळे मानवाचे हित जपणारी अनेक शास्त्रे अन् कुटुंबसंस्था यांची पार वाट लागल्याचे दिसून येणे
पंख्यासमोर डोके फिरवून पंखा चालू करायचा. त्याप्रमाणे उन्मुक्त लैगिंकतेने, ‘कम्युन’ने समाज उन्नतीला, ऐश्वर्याला पोचवायचा ? अर्थशास्त्र आणि इंडस्ट्रिलयजेशनचाच केवळ विचार करायचा ? आणि शरीरशास्त्र, अनुवांशिकता, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, मानसशास्त्र, मनोविज्ञान, कुटुंबसंस्था यांची वाट लावायची.
२ ई. आज रशियामध्ये स्त्रियांचे पुरुषीकरण झाले असून तिच्यावर दुहेरी ओझे टाकल्यामुळे रशियन स्त्री शरीर आणि मन यांनी खंगून जाऊन तेथील कुटुंबसंस्था नष्ट झाल्याचे दिसून येणे : आज रशियात स्त्रियांचे पुरुषीकरण झालेले आहे. तेथे कुटुंबसंस्थाच नाही. रशियन स्त्री शरिराने खंगली आहे आणि मनानेही खंगते आहे. पुरुषाच्या बरोबरीने तिला काम दिले आहे. अन्य दुहेरी ओझे तिच्यावर टाकले आहे. ती उत्पादनातही प्राण ओतू शकत नाही. घरातही तिला तिचे स्थान नाही. तिची प्रजननशक्ती क्षीण होत आहे. स्त्रीला सपाटून वंध्यत्व येत आहे. शासन कुटुंबविस्तारासाठी प्रलोभने देत आहे. इतकेच नव्हे, तर मातृत्वाचे दायित्व स्वीकारण्यासाठी शासन स्त्रियांना आवाहन करते आहे. ‘पॉप्युलेशन पॉलिसी इन यू.एस्.एस्.आर्.’ संदर्भात बरेच उतारे प्रचारात आहेत.’
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
(संदर्भ : मासिक ‘घनगर्जित’, जानेवारी २०१४)