अधिक किंवा ‘पुरुषोत्तम मासा’चे महत्त्व, या काळात करावयाची व्रते आणि पुण्यकारक कृती अन् ती करण्यामागील शास्त्र !
या वर्षी १८.९.२०२० ते १६.१०.२०२० या काळात अधिक मास आहे. हा अधिक मास ‘अधिक आश्विन मास’ आहे. अधिक मासाला पुढच्या मासाचे नाव देतात, उदा. आश्विन मासापूर्वी येणार्या अधिक मासाला ‘आश्विन अधिक मास’ असे संबोधतात आणि नंतर येणार्या मासाला ‘निज आश्विन मास’ म्हणतात. अधिक मास एखाद्या मोठ्या पर्वाप्रमाणे असतो. त्यामुळे या मासात धार्मिक कृती करतात आणि ‘अधिक मास माहात्म्य’ ग्रंथाचे वाचन करतात.
१. अधिक मास म्हणजे काय ?
१ अ. चांद्रमास : सूर्य आणि चंद्र यांची एकदा युती होण्याच्या वेळेपासून, म्हणजे एका अमावास्येपासून पुन्हा अशी युती होईपर्यंत, म्हणजे पुढील मासाच्या अमावास्येपर्यंतचा काळ म्हणजे ‘चांद्रमास’ होय. सण, उत्सव, व्रते, उपासना, हवन, शांती, विवाह आदी हिंदु धर्मशास्त्रातील सर्व कृत्ये चांद्रमासाप्रमाणे (चंद्राच्या गतीवरून) ठरलेली आहेत. चांद्रमासांची नावे त्या मासात येणार्या पौर्णिमेच्या नक्षत्रांवरून पडली आहेत, उदा. चैत्र मासाच्या पौर्णिमेला चित्रा नक्षत्र असते.
१ आ. सौरवर्ष : ऋतू सौरमासाप्रमाणे (सूर्याच्या गतीवरून) ठरलेले आहेत. सूर्य अश्विनी नक्षत्रापासून भ्रमण करत पुन्हा त्याच ठिकाणी येतो. तेवढ्या काळाला ‘सौरवर्ष’ असे म्हणतात.
१ इ. ‘चांद्रवर्ष आणि सौरवर्ष यांचा मेळ बसावा’, यासाठी अधिक मासाचे प्रयोजन ! : चांद्रवर्षाचे ३५४ दिवस आणि सौरवर्षाचे ३६५ दिवस असतात, म्हणजेच या दोन वर्षांमध्ये ११ दिवसांचे अंतर असते. ‘हे अंतर भरून यावे’, तसेच चांद्रवर्ष आणि सौरवर्ष यांचा मेळ बसावा; म्हणून स्थूलमानाने सुमारे ३२॥ (साडेबत्तीस) मासांनी एक अधिक मास धरतात, म्हणजे २७ ते ३५ मासांनी १ अधिक मास येतो.
२. अधिक मासाची अन्य नावे
अधिक मासाला ‘मलमास’ किंवा ‘धोंड्याचा महिना’ असे म्हणतात. अधिक मासात मंगल कार्याऐवजी विशेष व्रते आणि पुण्यकारक कृत्ये केली जातात; म्हणून याला ‘पुरुषोत्तम मास’, असेही म्हणतात.
३. अधिक मास कोणत्या मासात येतो ?
अ. चैत्र ते आश्विन या सात मासांपैकी एक मास ‘अधिक मास’ म्हणून येतो.
आ. क्वचित् फाल्गुन मासही ‘अधिक मास’ म्हणून येतो.
इ. कार्तिक, मार्गशीर्ष आणि पौष या मासांना जोडून अधिक मास येत नाही. या तीन मासांपैकी कोणता तरी एक मास क्षय मास होऊ शकतो; कारण या तीन मासांत सूर्याची गती अधिक असल्यामुळे एका चांद्रमासात त्याची दोन संक्रमणे होऊ शकतात. क्षय मास येतो, तेव्हा एका वर्षात क्षय मासाच्या पूर्वी १ आणि नंतर १, असे २ अधिक मास जवळजवळ येतात.
ई. माघ मास मात्र अधिक किंवा क्षय मास होत नाही.
४. अधिक मासात व्रते आणि पुण्यकारक कृत्ये करण्यामागील शास्त्र
प्रत्येक मासात सूर्य एकेका राशीत संक्रमण करतो; परंतु अधिक मासात सूर्य कोणत्याही राशीत संक्रमण करत नाही, म्हणजेच अधिक मासात सूर्य संक्रात नसते. त्यामुळे चंद्र आणि सूर्य यांच्या गतीत फरक पडतो आणि वातावरणातही ग्रहणकालाप्रमाणे पालट होतात. ‘या पालटत्या अनिष्ट वातावरणाचा आपल्या प्रकृतीवर परिणाम होऊ नये; म्हणून या मासात व्रते आणि पुण्यकारक कृत्ये करावीत’, असे शास्त्रकारांनी सांगितले आहे.
५. अधिक मासात करावयाची व्रते आणि पुण्यकारक कृत्ये
अ. अधिक मासात श्री पुरुषोत्तमप्रीत्यर्थ १ मास उपोषण, आयाचित भोजन (अकस्मात् एखाद्याच्या घरी भोजनासाठी जाणे), नक्त भोजन (दिवसा न जेवता केवळ रात्री पहिल्या प्रहरात एकदाच जेवणे) करावे अथवा एकभुक्त रहावे (दिवसभरात एकदाच जेवावे). अशक्त व्यक्तीने या चार प्रकारांतील एक प्रकार निदान तीन दिवस अथवा एक दिवस तरी आचरणात आणावा.
आ. प्रतिदिन एकच वेळ भोजन करावे. जेवतांना बोलू नये. त्यामुळे आत्मबळ वाढते. मौन राहून भोजन केल्याने पापक्षालन होते.
इ. तीर्थस्नान करावे. न्यूनतम एक दिवस गंगास्नान केल्यास सर्व पापांची निवृत्ती होते.
ई. ‘या संपूर्ण मासात दान करणे शक्य नसेल, त्याने शुक्ल आणि कृष्ण द्वादशी, पौर्णिमा, कृष्ण अष्टमी, नवमी, चतुर्दशी, अमावास्या या तिथींना अन् व्यतिपात, वैधृति या योगांवर विशेष दानधर्म करावा’, असे शास्त्रात सांगितले आहे.
उ. या मासात प्रतिदिन श्री पुरुषोत्तम कृष्णाची पूजा आणि नामजप करावा. अखंड अनुसंधानात रहाण्याचा प्रयत्न करावा.
ऊ. दीपदान करावे. देवापुढे अखंड दीप लावल्यास लक्ष्मीप्राप्ती होते.
ए. तीर्थयात्रा करावी. देवदर्शन करावे.
ऐ. तांबूलदान (विडा-दक्षिणा) करावे. एक मास तांबूलदान दिल्यास सौभाग्यप्राप्ती होते.
ओ. गोपूजन करावे. गोग्रास घालावा.
औ. अपूपदान (अनरशांचे दान) करावे.
६. अधिक मासात कोणती कामे करावीत ?
या मासात नित्य आणि नैमित्तिक कर्मे करावीत. जी केल्यावाचून गती नाही, अशी कर्मे करावीत. अधिक मासात सतत नामस्मरण केल्यास श्री पुरुषोत्तम कृष्ण प्रसन्न होतो.
अ. ज्वरशांती, पर्जन्येष्टी इत्यादी नेहमीची काम्य कर्मे करावीत.
आ. या मासात देवाची पुनःप्रतिष्ठा करता येते.
इ. ग्रहणश्राद्ध, जातकर्म, नामकर्म, अन्नप्राशन आदी संस्कार करावेत.
ई. मन्वादि आणि युगादि संबंधित श्राद्धादी कृत्ये करावीत. तीर्थश्राद्ध, दर्शश्राद्ध आणि नित्यश्राद्ध करावे.
७. अधिक मासात कोणती कामे करू नयेत ?
नेहमीच्या काम्य कर्मांच्या व्यतिरिक्त अन्य काम्य कर्मांचा आरंभ आणि समाप्ती करू नये. महादाने (पुष्कळ मोठी दाने), अपूर्व देवदर्शन (पूर्वी कधी न गेलेल्या ठिकाणी देवदर्शनाला जाणे), गृहारंभ, वास्तूशांती, संन्यासग्रहण, नूतनव्रत ग्रहणदीक्षा, विवाह, उपनयन, चौल, देवप्रतिष्ठा आदी करू नये.
८. अधिक मासात वाढदिवस आल्यास काय करावे ?
एखाद्या व्यक्तीचा जन्म ज्या मासात झाला असेल, तोच मास अधिक मास आल्यास त्या व्यक्तीचा वाढदिवस निज मासात करावा, उदा. वर्ष २०१९ मध्ये आश्विन मासात जन्मलेल्या बालकाचा वाढदिवस या वर्षी आश्विन मास अधिक असल्याने अधिक मासात न करता निज आश्विन मासात त्या तिथीला करावा.
या वर्षी अधिक आश्विन मासात ज्या बालकाचा जन्म होईल, त्या बालकाचा वाढदिवस प्रतिवर्षी आश्विन मासात त्या तिथीला करावा.
९. अधिक मास असता श्राद्ध केव्हा करावे ?
‘ज्या मासात व्यक्तीचे निधन झाले असेल, त्याचे वर्षश्राद्ध तोच मास अधिक मास येतो, तेव्हा त्या अधिक मासातच करावे, उदा. वर्ष २०१९ च्या आश्विन मासात व्यक्तीचे निधन झाले असेल, त्या व्यक्तीचे वर्षश्राद्ध या वर्षी अधिक आश्विन मासात त्या तिथीला करावे.
अ. शके १९४१ च्या (म्हणजे गेल्या वर्षीच्या) आश्विन मासात मृत्यू झाला असेल, तर त्यांचे प्रथम वर्षश्राद्ध शके १९४२ च्या (या वर्षीच्या) अधिक आश्विन मासात त्या तिथीला करावे.
आ. प्रतिवर्षीचे आश्विन मासातील प्रतिसांवत्सरिक श्राद्ध या वर्षी निज आश्विन मासात करावे; मात्र पूर्वीच्या अधिक आश्विन मासात मृत्यू झालेल्यांचे प्रतिसांवत्सरिक श्राद्ध या वर्षी अधिक आश्विन मासात करावे.
इ. गेल्या वर्षी (शके १९४१ मध्ये) कार्तिक, मार्गशीर्ष, पौष इत्यादी मासांत मृत्यू झालेल्यांचे प्रथम वर्षश्राद्ध त्या त्या मासातील त्यांच्या तिथीस करावे. १३ मास होतात; म्हणून १ मास आधी करू नये.
ई. या वर्षी अधिक आश्विन किंवा निज आश्विन मासात मृत्यू झाल्यास त्यांचे प्रथम वर्षश्राद्ध पुढील वर्षी आश्विन मासात त्या तिथीला करावे. (संदर्भ : धर्मसिंधु – मलमास निर्णय, वर्जावर्ज्य कर्मे विभाग)’
(संदर्भ : दाते पंचांग)
१०. अधिक मास काढण्याची पद्धत
अ. ज्या मासाच्या कृष्ण पंचमीस सूर्याची संक्रांत येईल, तोच मास प्रायः पुढील वर्षी अधिक मास होतो; परंतु हे स्थूलमान (सर्वसाधारण) आहे.
आ. शालिवाहन शकास १२ ने गुणावे आणि त्या गुणाकारास १९ ने भागावे. जी बाकी राहील, ती ९ किंवा त्यापेक्षा न्यून असेल, तर त्या वर्षी अधिक मास येईल, असे समजावे.
इ. आणखी एक पद्धत (अधिक विश्वसनीय) : विक्रम संवत् संख्येत २४ मिळवून त्या बेरजेला १६० ने भागावे.
१. बाकी ३०, ४९, ६८, ८७, १०६, १२५ यांच्यापैकी एखादी उरली तर चैत्र,
२. बाकी ११, ७६, ९५, ११४, १३३, १५२ यांच्यापैकी एखादी उरली तर वैशाख,
३. बाकी ०, ८, १९, २७, ३८, ४६, ५७, ६५, ८४, १०३, १२२, १४१, १४९ यांच्यापैकी एखादी उरली तर ज्येष्ठ,
४. बाकी १६, ३५, ५४, ७३, ९२, १११, १३०, १५७ यांच्यापैकी एखादी उरल्यास आषाढ,
५. बाकी ५, २४, ४६, ६२, ७०, ८१, ८२, ८९, १००, १०८, ११९, १२७, १३८, १४६ यांच्यापैकी एखादी उरल्यास श्रावण,
६. बाकी १३, ३२, ५१ यांच्यापैकी एखादी उरल्यास भाद्रपद आणि
७. बाकी २, २१, ४०, ५९, ७८, ९७, १३५, १४३, १४५ यांच्यापैकी एखादी उरल्यास आश्विन मास हा अधिक मास असतो.
८. अन्य संख्या बाकी उरल्यास अधिक मास येत नाही.
उदा. या वर्षी विक्रम संवत् २०७७ आहे. २०७७ + २४ = २१०१ २१०१ ला १६० ने भागल्यावर बाकी २१ उरते. बाकी २१ आल्याने आश्विन मास हा अधिक मास आहे.
११. येणार्या अधिक मासांचे कोष्टक
संकलक : सौ. प्राजक्ता जोशी (ज्योतिष फलित विशारद आणि अंकशास्त्र विशारद), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, ज्योतिष विभाग प्रमुख, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.७.२०२०)
(कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक कृती करतांना शासनाच्या नियमांचे पालन करावे. – संपादक)