महानगरे आणि मोठी शहरे येथे रहाणार्‍या साधकांसाठी महत्त्वाची सूचना !

मोठ्या शहरांमधील असुरक्षित वातावरण, तसेच तेथे वाढत चाललेले रज-तमाचे प्राबल्य यांमुळे कुटुंबियांसह गावी किंवा तालुक्याच्या ठिकाणी स्थलांतरित होण्याचा विचार करा आणि तेथे रहाण्याची व्यवस्था करून ठेवा !

सध्या भारतातील महानगरे, तसेच अन्य मोठी शहरे येथील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तेथे मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली रोगराई हा सर्वांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. शहरांमधील बेसुमार गर्दी, स्वच्छतेचा अभाव, वाढते प्रदूषण, रज-तम यांचे अधिक प्राबल्य आदींमुळे तेथील नागरिक भीती आणि असुरक्षितता यांच्या सावटाखाली वावरतांना दिसत आहेत. युद्धजन्य परिस्थिती, दंगली, त्सुनामी, रोगराई आदी आपत्तींच्या वेळी ही शहरे गावापेक्षा अधिक संकटात असू शकतात. त्यामुळे तेथे रहाणे धोक्याचे ठरू शकते.

प्रतिकात्मक छायाचित्र

१. गाव अथवा तालुक्याचे ठिकाण येथील वातावरण तुलनेने सुरक्षित !

महानगरांंच्या तुलनेत गाव, तसेच तालुके यांमध्ये मोकळी हवा, नैसर्गिक साधनसंपत्तीची (सूर्यप्रकाश, झाडे आदींची) मुबलकता, अल्प प्रदूषण आदी असल्यामुळे वातावरण सुरक्षित आणि आरोग्यदायी असते, तसेच तेथील जीवनशैली स्वयंपूर्ण असते. गावात जीवनावश्यक वस्तूंची (पाणी, भाजीपाला, फळे आदींची) उपलब्धताही सहज होते. स्वतःची शेती असल्यास ती करून आपला उदरनिर्वाह करता येतो.

२. महानगरांमध्ये स्थलांतरित झालेल्या साधकांनी कुटुंबियांसह गावी अथवा तालुक्याच्या ठिकाणी रहाण्याचा विचार करावा, तसेच तेथे रहाण्याची व्यवस्था करून ठेवावी !

पूर्वी गावांत रहाणारे काही साधक शिक्षण, नोकरी, व्यवसाय आदींच्या निमित्ताने महानगरे, तसेच मोठी शहरे येथे स्थलांतरित झाले आहेत. आपत्काळात या शहरांची होऊ शकणारी अपरिमित हानी लक्षात घेऊन महानगरांत रहाणार्‍या साधकांनी कुटुंबियांसह गावी अथवा तालुक्याच्या ठिकाणी रहायला जाण्याचा विचार करावा. सुरक्षित ठिकाणी ‘फार्म हाऊस’ (शेतातील घर) असल्यास तेही निवडता येईल. आपले गाव असुरक्षित असल्यास, तसेच तेथे रहाण्याची व्यवस्था होऊ शकत नसल्यास सुरक्षित असलेले पर्यायी गाव अथवा तालुक्याचे ठिकाण निवडावे.

३. येणार्‍या आपत्काळात रहायला जाण्यासाठी गाव आणि घर निवडतांना पुढील महत्त्वाचे निकष लक्षात घ्या !

३ अ. गाव अथवा तालुका निवडतांना लक्षात घ्यायचे बारकावे

१. निवडणार असलेले गाव अथवा तालुका महानगरे आणि मोठी शहरे यांच्या अगदी जवळ नसावे.

२. ‘जवळपासची गावे सुरक्षित आहेत ना ?’, हे पहावे.

३. गाव पूरग्रस्त, ज्वालामुखीय, तसेच भूकंपप्रवण क्षेत्रात असू नये. धरणाचे अतिरिक्त पाणी सोडल्यामुळे येणार्‍या संभाव्य पूरक्षेत्रातील गाव निवडू नये.

४. समुद्र, तसेच नदी यांच्या किनार्‍याच्या आसपास असलेल्या गावांऐवजी पर्यायी गाव निवडण्यास प्राधान्य द्यावे. याचे कारण म्हणजे समुद्राच्या लाटा, तसेच नदीला आलेला पूर यांमुळे किनार्‍यावर पाण्याची उच्चतम पातळी गाठली जाते. या पाण्यामुळे किनार्‍याच्या जवळपास असलेली गावे पाण्याखाली जाऊ शकतात. हे टाळण्यासाठी पाण्याच्या उच्चतम पातळीपेक्षा ४ मीटर उंचीवर भूमीची पातळी (ग्राऊंड लेव्हल) असलेली गावे निवडावीत.

५. कोळशाच्या खाणी असलेल्या प्रदेशात खाणीखाली विस्तव असतो. विस्तवामुळे कोळसा जळून राख निर्माण होते आणि भूमीमध्ये पोकळी निर्माण होऊन ती खचते. त्यामुळे अशा प्रदेशातील गाव निवडू नये.

६. मोठमोठे कारखाने, औद्योगिक प्रकल्प (इंडस्ट्रियल प्लँट) आणि सिलिंडरचे गोदाम यांमध्ये सिद्ध होणार्‍या ज्वलनशील पदार्थांचा स्फोट होऊन आसपासच्या परिसराची मोठी हानी होऊ शकते. त्यामुळे जवळपासच्या परिसरात असे कारखाने वा प्रकल्प असू नयेत.

७. आपत्काळातही गावामध्ये पाण्याचा मुबलक साठा, तसेच जीवनोपयोगी वस्तूंची (पाणी, भाजीपाला, फळे आदींची) उपलब्धता व्हायला हवी.

८. बर्‍याच गावांत ‘मोबाईल’ला नेटवर्क नसल्याने इतरांना संपर्क करणे कठीण होते. त्यामुळे ‘गावात संपर्क व्यवस्था चांगली आहे ना ?’, असे पहावे.

९. गावातील वातावरण साधना, तसेच वैयक्तिक जीवन यांसाठी अनुकूल असावे. आपले गावात घर असेल आणि तेथे रहाण्यायोग्य व्यवस्था असल्यास तेथेही रहाता येईल. गावातील घरी साधनेसाठी पूरक वातावरण नसल्यास पर्यायी ठिकाणाचा विचार करावा.

३ आ. घराच्या संदर्भात पुढील बारकावे अभ्यासणे आवश्यक !

१. आपले घर हिंदुबहुल सुरक्षित क्षेत्रात असावे.

२. झोपडपट्टीमुळे होणारे अनधिकृत बांधकाम, दाटीवाटीची वस्ती, तसेच कमालीची अस्वच्छता यांमुळे रोगराई लवकर पसरणे, सिलिंडरचे स्फोट, ‘शॉटसर्किट’ आदींमुळे आग लागणे, अशा दुर्घटना घडतात. त्यामुळे घराच्या जवळपास १ – २ कि.मी. अंतरापर्यंत झोपडपट्टी असू नये.

३. आसपास साधक, तसेच आपल्याला साहाय्य करू शकतील, असे लोक रहात असल्यास उत्तम !

४. ‘धर्मप्रसार करणे, वनौषधींची लागवड करणे, आदी सेवा तेथे करता येतील का ?’, असाही विचार करावा.

३ इ. ‘वरील सर्व निकष लागू होतील’, असे गाव अथवा तालुक्याचे ठिकाण मिळाल्यास उत्तम ! : रज-तम प्रधान गाव किंवा तालुका यांपेक्षा सात्त्विक गाव किंवा तालुका यांचे रक्षण होणार आहे. त्यामुळे आश्रय निवडतांना सात्त्विकतेचा, तसेच वरील अन्य निकष लावून पहावेत. ‘वरील सर्व निकष लागू होतील’, असे गाव आणि घर मिळण्यासाठी प्रयत्न करावेत. तसे शक्य न झाल्यास अधिकाधिक निकष लागू होतील, असे गाव आणि घर निवडावे.

आपत्काळाची पूर्वसिद्धता म्हणून गावी असलेल्या घरी पुढील व्यवस्था करा !

आपल्या गावी असलेल्या घराची डागडुजी करून ते रहाण्यायोग्य स्थितीत करावे. वरील निकषांनुसार गाव वा तालुका निवडायचा असल्यास तो लवकरात लवकर निवडून तेथे रहाण्यायोग्य सर्व व्यवस्था करून ठेवावी. घरी सौरऊर्जेची उपकरणेही घेऊन ठेवता येतील. तेथे अगोदरच सर्व व्यवस्था केली असल्यास आपत्काळाचा आरंभ होताच मोठी शहरे सोडून गावी आश्रय घेऊन स्वतःच्या प्राणांचे रक्षण करणे सोयीचे होईल.

साधकांनी गाव अथवा तालुक्याचे ठिकाण निवडण्याच्या, तसेच तेथे स्थलांतरित होण्याच्या संदर्भातील निर्णय स्वतःच्या मनाने न घेता त्यासाठी स्थानिक उत्तरदायी साधकांचे मार्गदर्शन घ्यावे. वरीलप्रकारे पूर्वसिद्धता केली, तरी सध्या गावात स्थलांतरित होऊ नये. या संदर्भात काही शंका असल्यास आपल्या उत्तरदायी साधकांना विचाराव्यात.

‘महानगरे आणि मोठी शहरे यांपेक्षा सुरक्षित असलेल्या गावी स्थलांतरित होण्याचा विचार करणे, म्हणजे एकप्रकारे आपत्काळाची पूर्वसिद्धता करणेच आहे’, हे लक्षात घ्या !

साधकांनो, महानगरे आणि शहरी भागांतून गावांत स्थलांतरित होतांना अन्य साधकांसमवेत आपली निवासव्यवस्था करा !

हा लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://sanatanprabhat.org/marathi/401154.html


साधकांसाठी सूचना

महानगरांमधून गावी स्थलांतरित होण्याच्या दृष्टीने काही मार्गदर्शक सूत्रे येथे दिली आहे. या विषयाच्या अनुषंगाने साधकांना काही सूत्रे सुचवायची असल्यास त्यांनी ती खालील संगणकीय किंवा टपाल पत्त्यावर पाठवावीत, ही विनंती ! वरील निकषांनुसार सुरक्षित असलेली गावे ठाऊक असल्यास त्या संदर्भातील विस्तृत माहितीही पाठवावी.

संगणकीय पत्ता : sanatan.sanstha2025@gmail.com

टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१