चहा पिणे आरोग्याला हानीकारक !
चहा चवीला तुरट असल्यामुळे तो बद्धकोष्ठता निर्माण करतो. काहींना चहा न प्यायल्यास शौचाला होत नाही. हे सवयीमुळे होते. शौचाचा वेग निर्माण करणे, हे चहाचे काम नव्हे. चहा रक्ताची आम्लता वाढवतो. नियमित चहा पिण्याने हाडे ठिसूळ होतात, रक्तवाहिन्या आकुंचन पावून रक्तदाब वाढतो आणि आम्लपित्ताचा त्रास वाढतो. चहासमवेत आपण काही पदार्थ खातो. त्या पदार्थांमध्ये मीठ असल्यास मिठाचा चहातील दुधाशी संपर्क आल्यामुळे चहा शरिराला मारक होतो. चहामुळे शरिराची अधिक हानी होते; पण चहाचे व्यसन जडल्यामुळे सामान्य माणसाला चहा सोडता येत नाही.
चहाला पर्याय काय…?
धने-जिर्याचा कशाय : चहापेक्षा धने-जिर्याचा कशाय पिणे चांगले असते.
बडिशेप इत्यादींचा कशाय : प.पू. गोंदवलेकर महाराजांच्या संप्रदायात पुढील औषधी घटक वापरून कशाय करण्याचा प्रघात आहे. बडिशेप, धने, जिरे, ओवा, बाळंतशेप, गोखरू, वावडिंग, सुंठ आणि ज्येष्ठमध या वस्तू सम प्रमाणात घेऊन थोड्या भाजून मग दळून घ्याव्यात. प्रतिदिन काढा करण्यासाठी कपभर पाण्यात पाऊण चमचा दळलेली भुकटी घालून उकळून घ्यावे आणि कशाय गाळून उष्ण असतांना घ्यावा. त्यात साखर, मीठ, दूध इत्यादी काही घालावे लागत नाही.
हा काढा पोटाला पुष्कळ चांगला असतो. यातील बडिशेप आणि धने पोट स्वच्छ ठेवण्यास उपयुक्त आहेत, जिरे शरिरातील उष्णता न्यून करते, ओव्यामुळे पोटात वायू (गॅसेस्) होत नाही, वावडिंगामुळे जंत होत नाहीत, सुंठीमुळे कफ होत नाही आणि ज्येष्ठमधाने काढ्याला गोडी येते अन् घसा स्वच्छ रहातो.
तुळशीचा काढा : प्रत्येक ऋतूनुसार ठराविक औषधी वनस्पतींचा काढा घेणे आरोग्याला अतिशय उपयुक्त ठरते. पावसाळ्यात आणि थंडीच्या दिवसांत तुळशीचा काढा आवश्यकतेनुसार साखर घालून घेऊ शकतो. या काढ्यात दूध घालू नये. पावसाळ्यात आणि थंडीच्या दिवसांत तुळशीचा काढा घेतल्याने सर्दी, खोकला, ताप येणे इत्यादी विकार होत नाहीत. तुळस विषघ्न असल्याने शरिरातील विषारी द्रव्यांचा नाश होतो, तसेच पचन सुधारून भूक चांगली लागू लागते.