विरुद्ध (विषम) आहाराचे प्रकार
काही अन्नपदार्थ काही व्यक्तींना देश, काल, अग्नी, प्रकृती, दोष, वय इत्यादींचा विचार करता हानीकारक ठरतात. अशा अन्नपदार्थांचा विरुद्ध आहारात समावेश होतो. विरुद्ध आहाराचे प्रकार पुढे दिले आहेत.
१. निसर्गतः विरुद्ध : मेंढीचे दूध आणि मोहरीच्या पाल्याची भाजी पचावयास जड असते अन् पचल्यानंतर शरिरात दोष वाढवते.
२. देशविरुद्ध : दमट वायूमान (हवामान) असलेल्या समुद्राकाठच्या किंवा दलदलीच्या प्रदेशात स्निग्ध किंवा शीत पदार्थ अधिक प्रमाणात खाणे; त्यामुळे शरिरात कफदोष वाढतो. कोरड्या वायूमानात रुक्ष आणि तिखट पदार्थ खाणे.
३. कालविरुद्ध : वसंतऋतूत किंवा रात्रीच्या वेळी दही खाल्ल्याने कफदोष वाढतो. हिवाळ्यात थंड पदार्थ आणि उन्हाळ्यात उष्ण (गरम) पदार्थ खाणे.
४. अग्नीविरुद्ध : शरिरातील अग्नी म्हणजे पचनशक्ती. ती अल्प (कमी) असतांना पचावयास जड किंवा थंड पदार्थ खाल्ल्यास अपचन होते.
५. प्रकृतीविरुद्ध : पित्तप्रकृतीच्या व्यक्तीस तिखट, आंबट किंवा खारट आणि उष्ण (गरम) पदार्थ दिल्याने तिच्या शरिरातील पित्त वाढते.
६. सात्म्यविरुद्ध (ॲलर्जी) : एखाद्या व्यक्तीस एखाद्या अन्नपदार्थाची ॲलर्जी असल्यास रेच (जुलाब) होणे, पोटात दुखणे, पित्त उठणे इत्यादी लक्षणे होतात.
७. दोषवृद्धीमुळे विरुद्ध : दूध आणि मासे दोन्ही कफवर्धक असल्याने शरिरात कफ वाढतो.
८. अन्न शिजवण्याच्या भांड्याच्या गुणाच्या विरुद्ध : तांबे किंवा पितळ यांच्या भांड्यात आंबट पदार्थ ठेवल्यास निळसर रंग येतो.
९. वीर्यविरुद्ध : शीत आणि उष्ण अन्नपदार्थांचे एकत्र सेवन करणे, उदा. मासे अन् दूध. मासे उष्ण, तर दूध थंड आहे. त्यामुळे रक्तविकार, अपचन होते.
१०. दिनचर्याविरुद्ध : अधिक झोप घेणार्या व्यक्तीस कफवर्धक अन्न दिल्याने कफ वाढतो.
११. क्रमविरुद्ध : शौचास किंवा लघवी लागली असता ते न करता आधी जेवण करणे.
१२. पाकविरुद्ध : कच्चे किंवा जळलेले अन्नपदार्थ खाणे. दोन वेळा तापवलेले किंवा शिजवलेले अन्नपदार्थ थंड झाल्यावर किंवा शिळे झाल्यावर परत उष्ण (गरम) करून खाऊ नयेत.
१३. प्रमाणविरुद्ध : मध, तूप, तेल, प्राण्यांची चरबी समप्रमाणात घेऊ नये. तूप-मध समप्रमाणात घेऊ नये.
१४. मनाविरुद्ध : नावडते अन्नपदार्थ खाणे.
१५. संयोगविरुद्ध : दोन किंवा अनेक अन्नपदार्थ एकत्र खाल्ल्यास शरिरास हानीकारक होऊ शकतात.
अ. दुधासमवेत फळे खाऊ नयेत, म्हणजेच मिल्कशेक, फ्रूट सॅलेड खाऊ नये.
आ. दुधासमवेत कुळीथ, वरी, वाल, मटकी, गूळ, दही, चिंच, जांभूळ आणि आंबट पदार्थ खाऊ नये.
इ. दुधासमवेत लसूण, पालेभाज्या किंवा मुळा खाऊ नये. बरेच दिवस खाल्ल्याने त्वचेचे रोग होतात.
ई. पालेभाज्या किंवा मसाल्याचे पदार्थ खाल्ल्यानंतर दूध पिऊ नये.
उ. खिचडीत दूध घालू नये.
ऊ. दह्यासह उष्ण पदार्थ, फणस, ताडगोळा, दूध, तेल, केळे, मासे, मांस, चिकन, गूळ खाऊ नये.
ए. दूध, ताक किंवा दह्यासह केळे खाऊ नये.
ऐ. चिकन किंवा हरणाचे मांस दह्यासह खाऊ नये.
ओ. विविध प्राण्यांचे मांस एकत्र शिजवून खाऊ नये.
औ. उडदाच्या डाळीसह मुळा खाऊ नये.
अं. मधासह तूप, चरबी, तेल आणि पाणी यांतील दोन, तीन किंवा चार पदार्थ एकत्र, समप्रमाणात घेऊ नयेत.
क. मधासह कमळबीज खाऊ नये.
ख. जलचर प्राण्यांचे मांस, मध, गूळ, दूध, मुळा, भात, मोड आलेले धान्य, उडीद किंवा तीळ यांच्यासह खाऊ नये. बरेच दिवस खाल्ल्यास दृष्टीवर परिणाम होतो. तसेच शरिरास कंप सुटणे, ऐकू न येणे, अस्पष्ट उच्चार होणे, मानसिक अस्वस्थता आणि मृत्यू ही लक्षणे होतात.
ग. पालक तिळाच्या तेलात तळून खाऊ नये. त्यामुळे रेच (जुलाब) होतात.
घ. फणसाचे गरे खाल्ल्यावर विडा खाऊ नये.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ अन्नं ब्रह्म । : खंड १’ आणि सनातनचा ग्रंथ सात्त्विक आहाराचे महत्त्व’)