सात्त्विक आहार आणि सात्त्विक पिंड
‘शरिराचा सत्त्वगुण वाढला, तर ईश्वरप्राप्तीचे ध्येय सुलभ होते. सत्त्वगुणाची वृद्धी करण्यात सात्त्विक आहार महत्त्वाची भूमिका पार पाडतो. अध्यात्म आहारातील सात्त्विकतेचा विचार करते, तसा विचार आधुनिक विज्ञान करूच शकत नाही. ज्या अन्नग्रहणामुळे व्यक्तीला सात्त्विकता मिळते, त्या अन्नाला ‘सात्त्विक आहार’ समजले जाते. सात्त्विक आहारातून सात्त्विक पिंडाची निर्मिती होते. हा पिंड आध्यात्मिक प्रगती साधून घेण्यास योग्य असतो.
सात्त्विक अन्नसेवनाने पंचप्राण कार्यरत होऊन ते शरीरभर संक्रमित होणे
आपले शरीर हे एक ईश्वरचलित यंत्र आहे. अन्नसेवनाने शरिरात निर्माण होणारी ऊर्जा ही यज्ञातून निर्माण होणार्या तेजतत्त्वाच्या ऊर्जेशी संबंधित आहे. अन्नसेवनातून प्रक्षेपित होणार्या सात्त्विक लहरींमुळे शरिरातील नाभीस्थित पंचप्राणांच्या कार्याला गती मिळते. जोपर्यंत आपण आध्यात्मिक उन्नतीसाठी साधना करत नाही, तोपर्यंत आपल्या शरिरात सुप्त असणार्या पंचप्राणांची शुद्धी होत नाही; परंतु सात्त्विक अन्नसेवनाने पंचप्राण कार्यरत होऊन ते शरीरभर संक्रमित केले जातात. म्हणूनच अन्नाला ‘पूर्णब्रह्म’ म्हणजेच पाचही प्राणांची शुद्धी करण्याची क्षमता असलेले असे म्हटले जाते.’
– एक विद्वान (श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या ‘एक विद्वान’ या नावाने भाष्य करतात. ३०.१.२००५)
सात्त्विक आहाराने पालट (बदल) होण्यातील टप्पे
१. वैराग्य : योग्य आहारातून तेजाच्या मार्गाने पेशींचे पोषण होऊ लागल्याने साधना करतांना त्या त्या स्तरावर निर्माण झालेली आध्यात्मिक ऊर्जा त्या त्या पेशीकेंद्राच्या स्तरावर घनीभूत होते. या ऊर्जेतूनच जिवाचा प्रवास वैराग्याकडे होऊन वासनारूपी आसक्ती त्यागण्यात होतो.
२. देहबुद्धी घटणे : आहारातून जीव विचारांच्या मार्गाने चैतन्यविश्वात प्रवेश करता झाल्याने या मार्गात असतांना त्याची देहबुद्धी घटू लागते.
३. आहाराचेही भान न रहाणे : देहबुद्धीचे जडत्व संपले की, आहाराचेही भान रहात नाही. तो आहारविषयक संवेदनांच्या तरंगांच्या पलीकडे जातो.
४. चैतन्याच्या पटलावरच विहार : आहारविधान जीवनातून नाहीसे झाले म्हणजे देह अंतर्यामी केवळ चैतन्याच्या पटलावरच विहार करू लागतो.
५. सात्त्विक विचारांचे संवर्धन : योग्य आणि सात्त्विक आहारातून सात्त्विक ऊर्जेची निर्मिती झाल्याने ही ऊर्जा मनात सात्त्विक विचारांचे संवर्धन करून चित्तावर त्यातून निर्माण झालेल्या पुण्यसंचयाचा संस्कार करते.
६. सिद्धी : हा पुण्यसंचय कालांतराने जिवाला आध्यात्मिक क्षेत्रात पुढच्या पुढच्या टप्प्याच्या सिद्ध अनुभूतींच्या विश्वात सोडतो.
७. संतत्व, ऋषित्व आणि देवत्व : सात्त्विक आहार संतत्व देऊ शकते. आहारत्याग ऋषित्व देते, तर आहारशून्यता म्हणजेच आहार घेणे, न घेणे या जाणिवांच्या पलीकडे जाणे, हे जिवाला देवत्व देते.
हिंदु धर्माने घालून दिलेली योग्य आणि सात्त्विक आहार बनवण्याची नियमपद्धती जिवाला सज्जन, साधक, संत, ऋषि अन् तद्नंतर देवधारणा यांपर्यंत सोडून नंतर मोक्षात विलीन करून देते.
– एक विद्वान (श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या ‘एक विद्वान’ या नावाने भाष्य करतात. ७.३.२००८)
संयत आहारपद्धतीने उन्नती होण्यातील टप्पे
हिंदु धर्मातील आहारपद्धतीला ‘संयत आहारपद्धती’ असे म्हणतात.
१. पिंडशुद्धी : ‘संयत आहारपद्धती’ ही पंचतत्त्वात्मक ऊर्जेच्या संतुलनावर आधारित आहे. यामुळे योग्य आहारातून त्या त्या प्रमाणात योग्य त्या पद्धतीने त्या त्या पंचतत्त्वात्मक स्तराचे देहात योग्य त्या प्रमाणात संचयन होते. हे संचयन जिवाला पिंडशुद्धीसाठी उपयुक्त ठरते.
२. सात्त्विक विचारांच्या निर्मितीचे महामंडल सिद्ध (तयार) होणे : पिंडशुद्धीतून जीव विश्वमंडलाकडे, म्हणजेच आपल्या पिंडाच्या परिकक्षा भेदून बाह्य वायूमंडलाचा विचार करू लागतो, म्हणजेच योग्य आणि सात्त्विक आहारातून सात्त्विक विचारांच्या निर्मितीचे महामंडल साधते.
३. मनोलय आणि बुद्धीलय : हे विचारांचे महामंडल शेवटी विचारत्यागातून मनोलयाकडे आणि चैतन्याच्या आकलनातून बुद्धीलयाकडे नेते.
४. चित्तशुद्धी (संतपद) : मनोलयाची आणि बुद्धीलयाची जाणीव जिवाची चित्तशुद्धी साधते.
५. देहबुद्धीलय (ऋषीपद) : चित्तशुद्धीच नित्यस्वरूपी जिवाला चैतन्याशी जोडून देते; म्हणून देहाची कुडी सात्त्विक आहाराने घडवून त्याची स्थूल स्तरावर शुद्धी साधून त्यानंतर सात्त्विकतेच्या संवर्धनातून जीव सूक्ष्मदेहांच्या शुद्धीकडे जातो, त्याच वेळी त्याचे आहारावरील लक्ष घटून तो अल्प कालावधीत देहबुद्धीलयाकडे जातो. म्हणजे सात्त्विक आहारच जिवाला कालांतराने आहाराला त्यागण्यास प्रवृत्त करून त्यागातून निवृत्तीकडे, म्हणजेच ऋषीपदाकडे नेतो. वैराग्यवर्धन, म्हणजेच ऋषीत्व. वासना संपल्या म्हणजे वैराग्यवर्धन साधते.
६. देवत्व : वैराग्यवर्धनाची जाणीव संपली म्हणजे देवत्व येते.
– एक विद्वान (श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या ‘एक विद्वान’ या नावाने भाष्य करतात. ७.३.२००८)