आरोग्यसंपन्न भारतासाठी आवश्यक आहारशास्त्र !
१. जिभेवर नियंत्रण नसणे, हेच रोगाचे कारण !
जनावरांना काय खावे, काय खाऊ नये, याची उपजत बुद्धी असते. गाय, बकरी इत्यादी प्राणी विषारी वनस्पतींची पाने खात नाहीत. मनुष्याला अन्नाविषयी उपजत बुद्धी अतिशय अल्प असते; पण मनुष्य बुद्धीमान प्राणी आहे. आधुनिक वैद्यकशास्त्राने प्रत्येक अन्नपदार्थात प्रथिने, स्निग्ध पदार्थ, कार्बोहायड्रेट्स, खनिज पदार्थ, मीठ, पाणी यांचे प्रमाण किती आहे, हे शोधून काढले आहे. आयुर्वेदाने प्रत्येक अन्नपदार्थाचे शरिरातील वात, पित्त आणि कफ हे दोष, धातू, मळ अन् अवयव यांच्यावर काय परिणाम होतात, हे सांगितले आहे. त्या शास्त्रांचा अभ्यास करून प्रत्येकाने आपली प्रकृती, वय, ऋतू, पचनशक्ती यांचा विचार करून किती प्रमाणात खावे, हा विचार करून आहार घेतल्यास तो निरोगी राहील; अर्थात् ‘कळते पण वळत नाही’, अशी माणसाची अवस्था आहे; कारण त्याचे जिभेवर नियंत्रण नाही. पोटातील आम्लता वाढली असतांना समोर आलेली भेळपुरी खाल्ल्यास पोट दुखेल, हे ज्ञात असूनही व्यक्ती ताव मारणे सोडत नाही. यालाच आयुर्वेदात प्रज्ञापराध (बुद्धीचा अपराध) आणि सर्व रोगांचे मूळ कारण असे म्हटले आहे.
२. नैसर्गिक अन्नापासून मानव दुरावला गेला !
आदिमानव निसर्गात मिळणारी कंदमुळे, फळे आणि प्राण्यांची शिकार करून त्यांचे मांस खात असे. निसर्गातील स्वच्छ हवा, झर्याचे पाणी आणि नुकतेच बनवलेले अन्न यांमुळे तो निरोगी असे. आता लोकसंख्या पुष्कळ वाढलेली आहे. जंगले आणि झाडे अल्प झाली आहेत. कारखान्यांचे धूर आणि रासायनिक पदार्थ, वाहनांचे नाद (आवाज) अन् माणसांची गर्दी यांमुळे वातावरण अन् पाणी प्रदूषित झाले आहे. व्यापारी अन्नात भेसळ करतात. फळे, धान्ये आणि भाज्या यांना कीड लागू नये; म्हणून कीटकनाशकांचा सर्रास वापर चालू आहे; म्हणून भाज्या अन् फळे स्वच्छ धुऊन न घेतल्यास कीटकनाशक विषारी द्रव्यांचे शरिरावर अनिष्ट परिणाम होत आहेत. प्राण्यांना त्यांची भूक आणि वजन वाढावे; म्हणून ‘कॉर्टिकोस्टिरॉइड’सारख्या हार्मोनच्या गोळ्या दिल्या जातात. अशा प्राण्यांचे मांस खाल्ल्याने त्या हार्मोनचे दुष्परिणाम मनुष्यालाही भोगावे लागतात. मिठाचा शोध लागण्याआधी अन्नपदार्थात मीठ वापरत नसत. त्यामुळे रक्तदाब, हृदयाचे विकार, सूज येणे असे विकार क्वचित् आढळत. अन्नपदार्थ चवदार करण्यासाठी मिठाचा वापर पुष्कळ वाढल्याने रक्तदाब, हृदयविकार यांचे प्रमाण पुष्कळ वाढले.
साखरेच्या शोधानंतर साखर घालून गोड केलेली जिलेबी, बासुंदी, श्रीखंड, मुरांबे, पेढे, बर्फी यांचा वापर अधिक प्रमाणात होऊ लागला. त्यामुळे स्थूलता, रक्तदाब, मधुमेह या रोगांचे प्रमाण वाढले. चहा-कॉफीसारखी उत्तेजक पेये, लोणची, मसाल्याचे पदार्थ यांच्या वाढत्या वापरामुळे अॅसिडिटी, अल्सर हे रोग वाढले. अन्नपदार्थ कुजू नयेत किंवा आंबू नयेत; म्हणून मिळणार्या टोमॅटो केचअप, शीतपेये आणि इतर अन्नपदार्थांतील रासायनिक परिरक्षकाचाही (प्रिझर्व्हेटिव्हज) शरिरावर अनिष्ट परिणाम होतो.
इतर देशांतील विविध अन्नपदार्थ, मसाल्याचे पदार्थ यांचाही आपल्या आहारात समावेश होत आहे. आता चायनीज डिश, मेक्सिकन डिश हे पदार्थही सर्वत्र मिळू लागले आहेत. पदार्थ चवदार आणि चमचमीत बनवल्याने जिभेवर नियंत्रण ठेवणे अशक्य होत आहे. यंत्राचा शोध लागल्यावर लोक ऊस आणि इतर फळांचे रस पिऊ लागले. आयुर्वेदाने फळे खावी, ऊस खावा; पण त्यांचे रस पिऊ नये, असे सांगितले आहे; कारण उसाचे करवे किंवा फळे खातांना ऊस किंवा फळे आत किडली असल्यास आपण फळे किंवा किडलेला भाग टाकून देतो; पण यंत्रात रस काढतांना किडलेल्या भागाचा रसही त्यात मिसळतो.
कृत्रिम चवीची सवय लागल्याने सफरचंदासारख्या चवदार फळांनाही मीठ किंवा मसाला लावून खाल्ले जाते. शीतकपाटामुळे रविवारी विकत घेऊन आठवड्याच्या भाज्या साठवल्या जातात आणि अन्नपदार्थही शीतकपाटामध्ये साठवले जातात. याउलट आयुर्वेदाने ‘एकदा थंड झालेले अन्नपदार्थ पुन्हा उष्ण करून खाऊ नये’, असा नियम सांगितला आहे. नैसर्गिक अन्नातून जीवनसत्त्वे आणि कॅल्शियम, लोह (आयर्न) इत्यादी मिळवण्यापेक्षा टॉनिकच्या गोळ्या घेण्याची प्रथा आली आहे. जीवनसत्त्वे आणि कॅल्शियम, लोह इत्यादी खनिज पदार्थ अधिक प्रमाणात घेतल्यास त्यांचे शरिरावर दुष्परिणाम होतात.
बर्याच वेळा काळ अन् परिस्थिती यांमुळे पालटणार्या सवयीने दुष्परिणाम लगेच लक्षात येत नसले, तरी कालांतराने लक्षात येतात; म्हणून नुकतेच बनवलेले खाल्ल्यास आणि आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवल्यास माणसाला आरोग्यसंपन्न जीवनाचा आनंद उपभोगता येईल.’
– वैद्याचार्य (सद्गुरु) वसंत बाळाजी आठवले