संभाव्य आपत्काळाची तीव्रता लक्षात घेऊन इमारतीत तिसर्या माळ्याच्या वर असलेली सदनिका विकून तळ ते तिसर्या माळ्यावरील सदनिका घ्या !
साधकांसाठी महत्त्वाची सूचना !
संभाव्य आपत्काळाची तीव्रता लक्षात घेऊन इमारतीत तिसर्या माळ्याच्या वर (चौथा माळा आणि वरील) असलेली सदनिका विकून तळ ते तिसर्या माळ्यावरील सदनिका घ्या !
‘संभाव्य आपत्काळात भूकंप, भूस्खलन, त्सुनामी, वादळ, अतीवृष्टी इत्यादी नैसर्गिक आपत्तींचा कधी सामना करावा लागेल ?’, हे सांगता येत नाही. अशा आपत्तींमुळे अपरिमित वित्त आणि जीवित हानी होते. आपत्कालीन परिस्थितीत वीज, पाणी आदींची उपलब्धता होत नाही. त्यामुळे इमारतीला उद्वाहन यंत्राची (लिफ्टची) सुविधा असली, तरी त्याचा वापर करता येत नाही. अशा वेळी घराबाहेर पडणे, कुटुंबियांना सुरक्षित ठिकाणी हालवणे, आदी करतांना अडचणी येऊ शकतात. आपत्काळात होऊ शकणारी असुविधा लक्षात घेऊन साधकांनी तिसर्या माळ्याच्या वर असलेल्या सदनिका विकून तळ ते तिसरा या माळ्यांतील सदनिका घेण्याचा विचार करावा.
वर दिल्याप्रमाणे वास्तू विक्री आणि खरेदी यांची प्रक्रिया करतांना आयकर (इन्कम टॅक्स), भांडवली नफा कर (कॅपिटल गेन टॅक्स) आदींच्या संदर्भात स्थानिक सनदी लेखापालाचे (सी.ए.चे (चार्टर्ड अकाऊंटन्टचे)) मार्गदर्शन घ्यावे. सदनिका विकत घेतांना पुढील बारकावे लक्षात घ्यावेत.
१. ‘इमारतीचे बांधकाम चांगल्या गुणवत्तेचे असावे’, यासाठी ते चांगला बांधकाम व्यावसायिक (बिल्डर) आणि स्थापत्य विशारद (आर्किटेक्ट) यांनी केले आहे का ?’, हे पडताळावे.
२. ‘इमारत, तसेच सदनिका अनधिकृत नाही ना ? सदनिकेच्या मालकी हक्कामध्ये वादविवाद नाहीत ना ?’, असे पाहून त्या वास्तूच्या मालकीची कायदेशीर तपासणी करून घ्यावी.
३. आपत्तीजनक स्थितीत टोलेजंग इमारतीचे वरचे काही माळे जमीनदोस्त होऊन इमारतीला मोठा धोका उद्भवू शकतो. त्यामुळे उंच इमारतींमध्ये सदनिका न घेता ३ – ४ माळे असलेल्या इमारतींमध्ये सदनिका घ्यावी.
४. ‘भूकंप, अतीवृष्टी, वादळ या नैसर्गिक आपत्तींचा विचार करून इमारतीचे बांधकाम आणि ‘आर.सी.सी. (रीएनफोर्सड् सिमेंट काँक्रीट (RCC) डिझाईन’ केले आहे ना ?’, असे पहावे. ‘भूकंपाचा परिणाम होऊ नये’, यासाठी इमारतीचे ‘आर.सी.सी. डिझाईन’ भूकंपरोधक असणे आवश्यक आहे.
५. ‘इमारतीची पडझड होऊ नये, तिला मोठ्या भेगा पडू नयेत’, यासाठी तिचे बांधकाम मजबूत आणि एकसंध (होमोजिनीयस) असावे.
६. इमारतीच्या उंचीमुळे निर्माण होणार्या वार्याचा दाब सहन करणारी तिच्या बाहेरील बाजूची भिंत (आऊटर वॉल) नसेल, तर भविष्यात जोराचे वादळ आल्यास ती भिंत कोसळण्याची शक्यता असते. त्यामुळे ‘इमारतीच्या बाहेरील बाजूच्या भिंती वादळी वारा, अतीवृष्टी आदींमध्ये टिकाव धरू शकतील ना ?’, असे पहावे.
७. ‘वार्याचे संतुलन (क्रॉस व्हेंटिलेशन) व्यवस्थित रहावे’, या दृष्टीने इमारतीची रचना (डिझाईन) केली असणे आवश्यक आहे. ‘इमारत, तसेच सदनिका यांमध्ये हवा खेळती रहाण्याच्या दृष्टीने (व्हेंटिलेशनसाठी) पुरेशा खिडक्या आहेत का ?’, याची निश्चिती करावी.
८. ‘सदनिकेचे छत, भिंत, लाद्या आदींमधून पाण्याची गळती (लीकेज) होऊ नये’, यासाठी ‘इमारतीला ‘वॉटर ट्रिटमेन्ट’ दिली असणे आवश्यक आहे.
वरीलपैकी बहुतांश सूत्रे तांत्रिकदृष्ट्या जाणकार व्यक्तीला समजू शकतात. त्यामुळे आवश्यक असल्यास जाणकार व्यक्तीचे साहाय्य घ्यावे. या संदर्भात काही अडचण असल्यास उत्तरदायी साधकांना विचारावे.
साधकांनो, संभाव्य आपत्काळातून तरून जाण्यासाठी वरीलप्रमाणे भौतिक स्तरावरील सिद्धता करण्यासह आंतरिक साधना वाढवून भगवंतांचे भक्त बना !