सनातन-निर्मित श्री गणेशाच्या सात्त्विक चित्राचा सूक्ष्मातील प्रयोग
‘आतापर्यंत काही बुद्धीप्रामाण्यवादी ‘सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या देवतांच्या सात्त्विक चित्रांतील देवतातत्त्वाचे प्रमाण खरे कशावरून ?’, असा प्रश्न विचारायचे. ‘ते सत्य असल्याचा अनुभव कसा घ्यायचा ?’, याची पद्धत पू. (डॉ.) गाडगीळ यांच्या या लेखावरून लक्षात येईल.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
प्रयोगाचा उद्देश : ‘सनातनच्या साधक-कलाकर्ती सौ. जान्हवी शिंदे यांनी, इतर कलाकार-साधकांच्या साहाय्याने आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली देवतांची सात्त्विक चित्रे निर्माण केली आहेत. त्यामध्ये एखाद्या देवतेची सूक्ष्मातील स्पंदने जाणून त्याप्रमाणे त्या देवतेचे चित्र साकार करण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रातील देवतेचा आकार, तिचे अवयव, तिच्या अंगावरील दागीने, तिची शस्त्रे इत्यादी घटक देवतेच्या प्रत्यक्षातील त्या त्या घटकांशी किती प्रमाणात जुळतात, यावरून त्या चित्राची एकूण सत्यता, म्हणजेच सात्त्विकता ठरते. प्रत्येक देवतेचे चित्र निर्माण झाल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले त्या चित्राची सात्त्विकता सूक्ष्मातून जाणून ती अगदी दशांश आकड्यापर्यंत सांगतात, उदा. ३१.७ टक्के. ‘त्यांनी सांगितलेल्या सात्त्विकतेनुसार प्रत्यक्षात त्या देवतेच्या चित्राकडे पाहून अनुभूती येतात का आणि त्या देवतेचा नामजप केल्यास येणार्या अनुभूती देवतेच्या चित्राकडे पाहून आलेल्या अनुभूतींशी जुळतात का ?’ हे पहाणे’, हा या प्रयोगाचा उद्देश आहे.
१. गणपतीचे ३१.७ टक्के गणेशतत्त्व असलेले चित्र
कलियुगात सर्वसामान्य मनुष्याने निर्माण केलेल्या देवतेच्या एखाद्या कलाकृतीत, म्हणजे चित्र किंवा मूर्ती यामध्ये अधिकाधिक ३० टक्के सात्त्विकता, म्हणजे सत्यता येऊ शकते. येथे गणपतीच्या चित्रामध्ये त्याहून अधिक सात्त्विकता येणे, हा सनातनच्या साधक-कलाकारांच्या उच्चतम भावावस्थेचा परिणाम आहे.
१ अ. गणपतीच्या चित्राकडे पहाणे
१. प्रयोगाच्या आरंभी माझी चंद्रनाडी कार्यरत होती.
२. मी गणपतीच्या चित्राकडे पाहू लागल्यावर मला ‘त्यातून माझ्याकडे पुष्कळ प्रमाणात स्पंदने येत आहेत’, असे जाणवले. मला अनाहतचक्रावर थंडावा जाणवू लागला.
३. मला आज्ञाचक्रावर शक्तीची स्पंदने जाणवू लागली. माझी सूर्यनाडी कार्यरत झाली. आज्ञाचक्र बुद्धीशी संबंधित असते. गणपति हा बुद्धीदाता आहे, तसेच तो प्राणशक्ती देणाराही आहे.
४. माझ्या सहस्रारचक्रावरही स्पंदने जाणवू लागली.
५. त्यानंतर मला माझ्या थेट मूलाधारचक्रावर स्पंदने जाणवू लागली. माझी कुंडलिनी जागृत झाल्याच्या संवेदना मला जाणवू लागल्या. मूलाधारचक्राची देवता गणपति आहे.
६. गणपतीच्या चित्रातील स्पंदनांचा वरील प्रवास माझ्या पिंडामध्ये पूर्ण झाल्यावर पुन्हा माझ्या आज्ञाचक्रावर स्पंदने जाणवू लागली. तेथून ती सहस्रारचक्राकडे गेली आणि पुढे ती ब्रह्मांडात जाऊ लागली. तेव्हा माझी सुषुम्ना नाडी जागृत होण्यास आरंभ झाला.
७. अशा प्रकारे गणपतीच्या चित्रातील स्पंदनांचा ब्रह्मांडी ते पिंडी (गणपतीचे चित्र ते माझा देह) आणि पिंडी ते ब्रह्मांडी (माझा देह ते वातावरण) हा प्रवास पूर्ण झाल्यावर पुन्हा माझ्या आज्ञाचक्रावर शक्तीची स्पंदने जाणवू लागली. तेव्हा पुन्हा माझी सूर्यनाडी कार्यरत झाली.
८. गणपतीच्या चित्रातील स्पंदनांशी पूरक अशी मुद्रा शोधल्यावर ती ‘मधल्या बोटाच्या टोकाला अंगठ्याचे टोक लावणे’ ही तेजतत्त्वाची मुद्रा आली. (मी जेव्हा ‘तर्जनीच्या टोकाला अंगठ्याचे टोक लावणे’ ही वायुतत्त्वाची मुद्रा केली, तेव्हा मला गणपतीचे चित्र अस्पष्ट दिसू लागले. मी जेव्हा ‘अंगठ्याच्या मुळाशी तर्जनीचे टोक लावणे’ ही आकाशतत्त्वाची मुद्रा केली, तेव्हा मला गणपतीचे चित्र अधिक अस्पष्ट दिसू लागले.)
९. तेजतत्त्वाची मुद्रा केल्यावर गणपतीच्या स्पंदनांचा प्रवास ‘माझे आज्ञाचक्र ते सहस्रारचक्र आणि तेथून वातावरण’, असा होऊन पुन्हा माझ्या आज्ञाचक्रावर मला स्पंदने जाणवू लागली. त्यानंतर पुढे काही पालट झाला नाही. त्यामुळे मी प्रयोग थांबवला.
१०. प्रयोगाच्या आरंभी माझ्या नाडीचे ठोके ५२ होते. प्रयोगानंतर ते तेवढेच राहिले.
१ आ. ‘ॐ गँ गणपतये नमः ।’ हा नामजप करणे
१ आ १. गणपतीच्या नामजपातून अनुभवलेली स्पंदने सनातनच्या गणपतीच्या सात्त्विक चित्राच्या स्पंदनांशी अगदी तंतोतंत जुळणे : आश्चर्य म्हणजे या नामजपाच्या प्रयोगामध्ये जाणवलेली स्पंदने गणपतीच्या चित्राकडे पाहून केलेल्या प्रयोगातील स्पंदनांशी अगदी तंतोतंत जुळली. स्पंदनांचा जाणवलेला क्रम, तसेच पूरक मुद्रा आणि तिच्यामुळे जाणवलेली स्पंदने हेही सारखेच होते.
१ आ २. ‘गणपतीच्या नामजपाच्या स्पंदनांचा परिणाम करण्याचा वेग गणपतीच्या चित्रातीच्या स्पंदनांच्या परिणाम करण्याच्या वेगापेक्षा दुप्पट असणे’, केवळ हाच भेद गणपतीचा नामजप आणि सनातनचे गणपतीचे सात्त्विक चित्र यांमध्ये असणे : या दोन्ही प्रयोगांमध्ये केवळ भेद इतकाच होता की, क्रमाने विविध चक्रांवर स्पंदने जाणवण्याची गती गणपतीच्या नामजपाच्या प्रयोगामध्ये अधिक होती. गणपतीच्या चित्रातील स्पंदनांचा माझ्यावर परिणाम करण्याच्या वेगापेक्षा गणपतीच्या नामजपातून माझ्यावर परिणाम होण्याचा वेग पुष्कळ अधिक, म्हणजे दुप्पट होता. गणपतीच्या चित्राचा संपूर्ण प्रयोग करायला मला २० मिनिटे लागली, तर गणपतीच्या नामजपाचा प्रयोग १० मिनिटांत झाला. याचे कारण हे की, चित्र तेजतत्त्वाच्या स्तरावरील आहे, तर नामजप आकाशतत्त्वाच्या स्तरावरील आहे.
१ इ. चित्रामधील गणपतीची कुंडलिनीचक्रे जागृत असल्याचे जाणवणे : मी प्रयोग म्हणून गणपतीचे आज्ञाचक्र ते मूलाधारचक्र या प्रत्येक चक्राकडे अर्धा मिनिट पाहिल्यावर मला माझ्या त्या त्या चक्रावर स्पंदने जाणवली. याचा अर्थ चित्रामधील गणपतीची सर्व चक्रे जागृत असल्याची अनुभूती मला आली; म्हणून ‘चित्रामधील गणपति प्रत्यक्ष तिथे आहे’, असे जाणवते. चित्रामध्ये सजीवता आली आहे. गणपतीचे आज्ञाचक्र सर्वांत जास्त प्रभावी असल्याची अनुभूती मला आली.
१ उ. पृथ्वीतत्त्वाची मुद्रा केल्यावर चित्रामधील गणपतीचे लघु रूप जाणवणे आणि तेजतत्त्वाची मुद्रा केल्यावर गणपतीचे भव्य रूप जाणवणे : गणपतीच्या चित्राशी पूरक अशी ‘मधल्या बोटाच्या टोकाला अंगठ्याचे टोक लावणे’ ही तेजतत्त्वाची मुद्रा आली. मी सहज प्रयोग म्हणून पृथ्वीतत्त्वाची मुद्रा, म्हणजे ‘करंगळीच्या टोकाला अंगठ्याचे टोक लावणे’ ही मुद्रा करून पाहिली असता मला ‘गणपतीचे रूप लहान झाले आहे’, असे जाणवले. पृथ्वीतत्त्वाच्या मुद्रेमुळे गणपतीमध्ये अधिक प्रमाणात पृथ्वीतत्त्व आल्याने त्याला जडत्व येऊन त्याचे रूप लघु झाले. त्यानंतर मी तेजतत्त्वाची मुद्रा केल्यावर पुन्हा तो मूळ रूपामध्ये येऊन भव्य दिसू लागला. तेव्हा त्याच्यामध्ये तेजतत्त्व अधिक प्रमाणात आल्याने आणि पृथ्वीतत्त्वापेक्षा तेजतत्त्व हलके असल्याने तो मोठा झाला, असे लक्षात आले.
१ ऊ. चित्रातील गणपतीची सुषुम्ना नाडी, सूर्यनाडी आणि चंद्रनाडी बोटाला जाणवणे : बोट चित्रातील गणपतीच्या मध्यरेषेवरून वरून खाली फिरवल्यावर मला शांतीची स्पंदने जाणवली. त्यानंतर मी गणपतीच्या देहाच्या उजव्या भागावरून वरून खाली बोट फिरवल्यावर मला शक्तीची स्पंदने जाणवली. मी गणपतीच्या देहाच्या डाव्या भागावरून वरून खाली बोट फिरवल्यावर मला अल्प शक्तीची स्पंदने जाणवली.’
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (३०.१०.२०१८)
गणपतीच्या चित्रामध्ये शक्ती, भाव आणि आनंद जाणवण्याची स्थाने
गणपतीच्या चित्रामध्ये त्याच्या दोन्ही पायांकडे, विशेषतः त्याच्या चरणांकडे पाहिल्यावर पुष्कळ भावजागृती होते. त्यांच्याकडे पहात रहावेसे वाटते. इतके ते सुंदर झाले आहेत. गणपतीचा गळा ते कंबर या देहाच्या मधल्या भागाकडे पाहिल्यावर पुष्कळ आनंद होतो. तेव्हा अनाहतचक्रामध्ये गुदगुल्यांसारखी स्पंदने जाणवतात. गणपतीच्या तोंडावळ्याकडे (चेहर्याकडे) पाहिल्यावर शक्ती जाणवते. तेव्हा आज्ञाचक्रावर ती स्पंदने जाणवतात.
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ
गणपतीच्या चित्रातील स्पंदनांशी पूरक अशी मुद्रा शोधण्याच्या संदर्भातील प्रयोग
प्रयोग १ : गणपतीच्या चित्राकडे पाहून तर्जनीच्या टोकाला अंगठ्याचे टोक लावून मुद्रा करून प्रयोग करणे : ‘तर्जनीच्या टोकाला अंगठ्याचे टोक लावून वायुतत्त्वाची मुद्रा केल्यावर निर्गुण-सगुण स्तरावर ऊर्जा कार्यरत होते. अशा वेळी निर्गुणतत्त्व कार्यरत झाल्याने चित्र पहाणार्या व्यक्तीला चित्र अस्पष्ट दिसते. त्या वेळी चित्रात सगुणतत्त्व ४० टक्के आणि निर्गुणतत्त्व ६० टक्के असते.
प्रयोग २ : गणपतीच्या चित्राकडे पाहून अंगठ्याच्या मुळाशी तर्जनीचे टोक लावून मुद्रा करून प्रयोग करणे : अंगठ्याच्या मुळाशी तर्जनीचे टोक लावून आकाशतत्त्वाची मुद्रा केल्यावर निर्गुण स्तरावर ऊर्जा कार्यरत होते. अशा वेळी चित्र पहाणार्या व्यक्तीला निर्गुणतत्त्व कार्यरत झाल्याने चित्र अस्पष्ट दिसते. त्या वेळी चित्रात सगुणतत्त्व ८० टक्के आणि निर्गुणतत्त्व २० टक्के असते.
मी जेव्हा ‘तर्जनीच्या टोकाला अंगठ्याचे टोक लावणे’ ही वायुतत्त्वाची मुद्रा केली, तेव्हा मला गणपतीचे चित्र अस्पष्ट दिसू लागले. मी जेव्हा ‘अंगठ्याच्या मुळाशी तर्जनीचे टोक लावणे’ ही आकाशतत्त्वाची मुद्रा केली, तेव्हा मला गणपतीचे चित्र अधिक अस्पष्ट दिसू लागले.’
– कु. प्रियांका लोटलीकर, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१०.७.२०२०)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या आणि संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक