‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या अद्वितीय संशोधन कार्याची लेखमालिका
१९ ऑगस्टपासून प्रतिदिन वाचा …
‘आजचे युग हे यंत्रयुग किंवा वैज्ञानिक युग आहे. प्रत्येक गोेष्ट वैज्ञानिक उपकरणाद्वारे सप्रमाण सिद्ध केली, तरच त्याची संपूर्ण जगात नोंद घेतली जाते. नवनवीन वैज्ञानिक शोधांचे स्वागत करणार्या भौतिक जगाकडून गुरूंच्या किंवा संतांच्या संदर्भात घडणार्या अध्यात्मशास्त्रीय निकषांचे मात्र हसे उडवले जाते, तसेच गुरुवचनांवर श्रद्धा ठेवणार्या व्यक्तींची टिंगलटवाळी केली जाते अथवा त्यांना अंधश्रद्धेच्या पारड्यात बसवून त्यांची निंदानालस्ती केली जाते. या सर्व प्रकारांमुळे अध्यात्मातील मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे असणार्या एका मोठ्या विश्वाच्या अभ्यासाला नास्तिकतावादी, बुद्धीप्रामाण्यवादी किंवा संशोधकवृत्तीचे लोक मुकतात. असे होऊ नये; म्हणून ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने वैज्ञानिक उपकरणांद्वारे जेवढे संशोधन करता येईल, तेवढे करण्यावर अधिक भर दिला आहे; कारण ती काळाची आवश्यकता आहे. ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार विविध वैज्ञानिक उपकरणांद्वारे विश्वातील सकारात्मक आणि नकारात्मक अशा अतींद्रिय शक्तींचा वेध घेणे अथवा त्यांची प्रत्यक्षता अन् अप्रत्यक्षता पडताळणे आदी माध्यमांतून विज्ञान आणि अध्यात्म यांची सुरेख सांगड घालून जगाला अध्यात्म वैज्ञानिक भाषेत सांगण्याचे अमूल्य कार्य ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’ करत आहे. हे अद्वितीय संशोधन कार्य समाजापर्यंत पोचण्यासाठी ते लेखस्वरूपात दैनिक ‘सनातन प्रभात’तून प्रसिद्ध केले जाणार आहे. या लेखमालिकेतून संशोधनकार्याच्या संदर्भातील काही वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करत आहोत.’
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने केलेले अभूतपूर्व संशोधन कार्य ‘श्री गणेशचतुर्थीच्या’च्या निमित्ताने १९ ऑगस्टपासून प्रसिद्ध करत आहोत.