‘श्री गणपतीचे ‘विडंबनात्मक चित्र’ आध्यात्मिकदृष्ट्या हानीकारक, ‘सर्वसाधारण चित्र’ थोडे लाभदायक आणि ‘सनातन-निर्मित सात्त्विक चित्र’ पुष्कळ लाभदायक असणे
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केलेली वैज्ञानिक चाचणी !
‘प्रत्येक देवता हे एक विशिष्ट तत्त्व आहे. देवतेची उपासना करतांना पूजकाच्या मनात त्या देवतेविषयी सतत भावजागृती होईल, असे तिचे रूप असणे महत्त्वाचे ठरते. देवतेचे द्विमितीय रूप (चित्र) अथवा त्रिमितीय रूप (मूर्ती) जितके त्या देवतेच्या मूळ रूपाशी जुळणारे असेल, तितके त्यात त्या देवतेचे तत्त्व अधिक आकृष्ट होते. सध्या सर्वसाधारणतः देवतांची चित्रे वा मूर्ती बनवत असतांना सूक्ष्मातून देवतेची स्पंदने जाणून घेऊन त्यानुसार चित्र किंवा मूर्ती बनवण्यापेक्षा कल्पनाविष्कारावर अधिक भर दिला जातो.
देवतांच्या उपासनेच्या मुळाशी श्रद्धा असते. देवतांचे कोणत्याही प्रकारचे विडंबन हे श्रद्धेवर घाला घालते. सध्या देवतांचे विविध प्रकारे विडंबन होते, उदा. हिंदूद्वेष्टे चित्रकार म.फि. हुसेन यांनी हिंदूंच्या देवतांची नग्न चित्रे काढून ती जाहीर विक्रीसाठी ठेवली होती, तसेच व्यापारी हेतूने विज्ञापनांमध्ये देवतांचा ‘मॉडेल’ म्हणून वापर केला जातो. श्री गणपतीचे विडंबनात्मक चित्र, सर्वसाधारण चित्र आणि सनातन-निर्मित सात्त्विक चित्र यांतून प्रक्षेपित होणार्या स्पंदनांचा वैज्ञानिक दृष्टीकोनातून अभ्यास करण्यासाठी वर्ष २०१४ आणि २०१५ मध्ये रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात चाचणी घेण्यात आली. त्यासाठी ‘पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ या वस्तू आणि व्यक्ती यांच्या ऊर्जाक्षेत्राचा (‘ऑरा’चा) अभ्यास करण्यासाठी उपयुक्त असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.
१. चाचणीचे स्वरूप
या चाचणीत पटलावर (‘टेबला’वर) श्री गणपतीचे चित्र ठेवण्यापूर्वी वातावरणाचे ‘पिप’ तंत्रज्ञानाद्वारे छायाचित्र घेतले. ही ‘मूळची नोंद’ होय. त्यानंतर श्री गणपतीचे विडंबनात्मक चित्र, पेठेत मिळणारे चित्र आणि सनातन-निर्मित सात्त्विक चित्र एकेक करून पटलावर ठेवून ‘पिप’ छायाचित्रे घेतली. या छायाचित्रांचा तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर या तीनही चित्रांतून प्रक्षेपित होत असलेल्या स्पंदनांचा वातावरणावर काय परिणाम होेतो ?’, हे समजले.
२. चाचणीतील श्री गणपतीच्या चित्रांची माहिती
२ अ. विडंबनात्मक चित्र : या चित्रात श्री गणपतीचे अवयव झाडाच्या पानांच्या आकारात दाखवलेले आहेत. सध्या देवतांची चित्र-विचित्र रूपांतील चित्रे अन् मूर्ती बनवण्याकडे कलाकारांचा कल दिसून येतो. पाने-फुले, फळे-भाज्या, बिस्किटे, चॉकलेट यांपासून श्री गणपतीची चित्रे वा मूर्ती बनवणे, क्रिकेट खेळणारा, दुचाकी चालवणारा, अशा वेशांत श्री गणपतीला दाखवणे, हे श्री गणपतीचे विडंबनच आहे. विडंबनात्मक चित्रे देवतांचे हेतुपुरस्सर विडंबन करून अनादर करणे, मनोरंजन आदी उद्देशाने काढलेली असतात. त्यामुळे ‘अशा चित्रांकडे पाहू नये’, असे वाटते, तसेच अशी विडंबनात्मक चित्रे संबंधित कलाकाराची विकृत मानसिकता दर्शवतात.
२ आ. सर्वसाधारण चित्र : हे पेठेत (बाजारात) मिळणारे श्री गणपतीचे चित्र आहे. पेठेत मिळणारी देवतांची चित्रे बहुतांश चित्रकारांनी केवळ धन आणि प्रसिद्धी मिळवणे अथवा ‘कलेसाठी कला’ या उद्देशाने काढलेली असल्याने या चित्रांमध्ये देवतांचे तत्त्व अल्प प्रमाणात असते. ही चित्रे आध्यात्मिकदृष्ट्या फारशी लाभदायी नसतात.
२ इ. सनातन-निर्मित सात्त्विक चित्र : ‘हे कलियुगात अधिक गणेशतत्त्व असलेले चित्र आहे. कलियुगात कोणत्याही देवतेचे चित्र किंवा मूर्ती यांत त्या त्या देवतेचे अधिकाधिक ३० टक्केच तत्त्व येऊ शकते. सनातन-निर्मित ‘श्री गणपतीच्या चित्रात’ २८.५ टक्के (टीप) गणेशतत्त्व आले आहे. या चित्रात अधिकाधिक गणेशतत्त्व येण्यासाठी सनातनच्या साधक-चित्रकारांनी हे चित्र भावपूर्वक रेखाटले आहे. या चित्राकडे पाहून अनेकांना ‘नापजप चांगला होणे’ आदी आध्यात्मिक अनुभूती आल्या आहेत.’ (संदर्भ : सनातन-प्रकाशित ग्रंथ ‘श्री गणपति – खंड १’, पृ. ३१)
टीप – ‘एखाद्या चित्रात त्या देवतेचे तत्त्व किती प्रमाणात आले आहे ?’, हे अध्यात्मातील जाणकार व्यक्तीच सांगू शकतात. चाचणी केलेल्या चित्रातील श्री गणपतितत्त्वाचेे प्रमाण हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ध्यानातून मिळालेल्या ज्ञानातील आहे.
वाचकांना सूचना : जागेअभावी या लेखातील ‘पिप’ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने घटकांची सकारात्मक आणि नकारात्मक स्पंदने रंगांच्या माध्यमातून दिसण्याची सुविधा असणे’, ‘चाचणीसंबंधाने घेतलेली दक्षता’, ‘प्रभावळीत दिसणार्या रंगांची माहिती’ इत्यादी नेहमीची सूत्रे https://www.sanatan.org/mr/PIP या दैनिक सनातन प्रभातच्या संकेतस्थळावरील लिंकवर दिली आहेत.
३. निरीक्षणांचे विवरण आणि निष्कर्ष
३ अ. मूळ नोंद : मूळ नोंदीच्या प्रभावळीत (चाचणीतील घटक चाचणीसाठी ठेवण्यापूर्वीच्या वातावरणाच्या प्रभावळीत) ४३ टक्के एकूण नकारात्मक स्पंदने आणि ५७ टक्के एकूण सकारात्मक स्पंदने होती.
पुढे दिलेल्या निरीक्षणांत चाचणीतील घटकांच्या प्रभावळींची तुलना ‘मूळ नोंदी’च्या प्रभावळीशी केली आहे.
३ आ. श्री गणपतीच्या विडंबनात्मक चित्रामुळे वातावरणातील नकारात्मक स्पंदनांचे प्रमाण पुष्कळ वाढणे : मूळच्या नोंदीच्या तुलनेत विडंबनात्मक चित्राच्या प्रभावळीतील नकारात्मक स्पंदने दर्शवणारा भगवा रंग पुष्कळ वाढला आणि नारिंगी रंग तेवढाच राहिला आहे. सकारात्मक स्पंदने दर्शवणार्या रंगांपैकी गडद हिरवा आणि हिरवा हे रंग थोडे वाढले; पण त्यांपेक्षा उच्च सकारात्मक स्पंदनांचा दर्शक असलेला चैतन्याचा पिवळा रंग पुष्कळ घटला आहे. या चित्रात मूळच्या नोंदीच्या (४३ टक्क्यांच्या) तुलनेत पुष्कळ अधिक, म्हणजे ५८ टक्के नकारात्मक स्पंदने आहेत. या चित्रातून पुष्कळ प्रमाणात प्रक्षेपित होणार्या त्रासदायक स्पंदनांचा हा परिणाम आहे. हे चित्र उपासकाला आध्यात्मिकदृष्ट्या हानीकारक आहे.
३ इ. श्री गणपतीच्या सर्वसाधारण चित्रामुळे वातावरणातील सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण थोडे घटणे : मूळच्या नोंदीच्या तुलनेत श्री गणपतीच्या सर्वसाधारण चित्राच्या प्रभावळीतील नकारात्मक स्पंदने दर्शवणारा भगवा रंग थोडा वाढला आणि नारिंगी रंग तेवढाच राहिला आहे. सकारात्मक स्पंदने दर्शवणार्या रंगांपैकी गडद हिरवा आणि हिरवा हे रंग थोडे वाढले; पण त्यांपेक्षा उच्च सकारात्मक स्पंदनांचा दर्शक असलेला चैतन्याचा पिवळा रंग घटला आहे. या चित्रात मूळच्या नोंदीच्या (५७ टक्क्यांच्या) तुलनेत अल्प, म्हणजे ५४ टक्के सकारात्मक स्पंदने आहेत. हे चित्र उपासकाला आध्यात्मिकदृष्ट्या फारसे लाभदायी नाही.
३ ई. सनातन-निर्मित श्री गणपतीच्या सात्त्विक चित्रामुळे वातावरणातील सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण पुष्कळ वाढणे : मूळच्या नोंदीच्या तुलनेत सनातन-निर्मित सात्त्विक चित्राच्या प्रभावळीतील नकारात्मक स्पंदने दर्शवणारे भगवा आणि नारिंगी हे दोन्ही रंग पुष्कळ घटले आहेत. सकारात्मक स्पंदने दर्शवणार्या रंगांपैकी गडद हिरवा थोडा घटला, तर हिरवा रंग दिसत नाही; पण त्यांपेक्षा उच्च सकारात्मक स्पंदनांच्या दर्शक रंगांपैकी चैतन्याचा पिवळा रंग थोडा वाढला, पवित्रतेचा निळसर पांढरा रंग पुष्कळ प्रमाणात, तर सूक्ष्म स्तरावरील आध्यात्मिक उपायक्षमता असणारा पोपटी रंगही थोडा दिसत आहे. या चित्रात सर्वाधिक, म्हणजे ८७ टक्के सकारात्मक स्पंदने आहेत. हे चित्र सात्त्विक असून उपासकाला आध्यात्मिकदृष्ट्या पुष्कळ लाभदायक आहे. (याचे कारण सूत्र ‘४’ मध्ये दिले आहे.)
४. सनातन-निर्मित ‘श्री गणपतीच्या सात्त्विक चित्रात’ श्री गणपतितत्त्व पुष्कळ अधिक प्रमाणात असण्यामागील अध्यात्मशास्त्रीय कारणे
४ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संकल्प अन् त्यांचे लाभलेले मार्गदर्शन ! : ‘संतांच्या उच्च आध्यात्मिक स्तरामुळे त्यांच्यात संकल्पशक्ती असते. ‘एखादी गोष्ट घडो’, एवढाच विचार त्यांच्या मनात आला, तरीही ती गोष्ट घडते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मनात ‘समाजाला देवतांची सात्त्विक चित्रे उपलब्ध व्हायला हवीत’, असा विचार येणे, हा संकल्पच आहे. त्यामुळे देवतांची चित्रे काढणारे साधक-कलाकार पुढे आले आणि त्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार परिश्रमपूर्वक आणि सूक्ष्म-स्तरावरील अभ्यास करून चित्रे काढली.
४ आ. ‘सनातन-निर्मित श्री गणपतीचे सात्त्विक चित्र’ हे धर्मशास्त्रात दिलेल्या गणपतीच्या रूपाच्या वर्णनानुसार, तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी काळानुसार केलेल्या मार्गदर्शनानुसार असणे : ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती नेहमी एकत्रित असते’, असा अध्यात्मातील एक सिद्धांत आहे. त्यामुळे देवतेचे रूप आले की, त्याची शक्ती तेथे असतेच. प्रत्येक देवतेच्या रूपाचे वर्णन द्रष्ट्या ऋषिमुनींनी धर्मशास्त्रात लिहून ठेवलेले आहे. त्यामुळे चित्रकाराने स्वतःच्या कल्पनेने काढलेल्या चित्रापेक्षा धर्मशास्त्रात दिलेल्या वर्णनानुसार असलेल्या चित्रांत त्या त्या देवतेचे तत्त्व अधिक प्रमाणात असते. धर्मशास्त्रात एकाच देवतेची अनेक नावे आणि त्यानुरूप असणार्या रूपांचा उल्लेख आढळतो. अशा वेळी उपासकांनी काळानुसार देवतेच्या कोणत्या रूपाची उपासना करणे आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायी आहे, ते केवळ अध्यात्मातील जाणकार, म्हणजे संतच सांगू शकतात. सनातन-निर्मित ‘श्री गणपतीचे सात्त्विक चित्र’ हे धर्मशास्त्रात दिलेल्या गणपतीच्या रूपाचे वर्णन आणि काळानुसार परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन यांनुसार बनवलेले आहे.
४ इ. साधक-कलाकारांनी व्यावसायिक हेतूने प्रेरित होऊन नव्हे, तर ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’, या भावाने देवतांची चित्रे काढणे : चित्रकला, संगीत, नृत्य आदी सर्व कलांची निर्मिती ईश्वरापासून झाली आहे. त्यामुळे ईश्वराची (सर्वोच्च आणि सातत्याने मिळणार्या आनंदाची) अनुभूती घेता येणे, हे या सर्व कलांचे अंतिम साध्य आहे. थोडक्यात सांगायचे, तर ‘कलेसाठी कला नव्हे, तर ईश्वरप्राप्तीसाठी कला’, याची जाणीव परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनामुळे साधक-कलाकारांना सतत होती. देवतांची चित्रे काढण्यामागे त्यांचा अन्य कोणताही व्यावसायिक हेतू नव्हता.
४ ई. साधक-कलाकारांमध्ये सूक्ष्म स्पंदने जाणण्याची क्षमता असणे : स्थूल पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म.’ देवतांची चित्रे काढतांना त्या चित्रांत त्या देवतेचे तत्त्व येत आहे का ? हे कळण्यासाठी चित्रकारामध्ये सूक्ष्मातील स्पंदने जाणण्याची क्षमता असावी लागते. ही क्षमता योग्य साधनेने विकसित होते. साधक-कलाकारांमध्ये ती क्षमता असल्याने ते परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार श्री गणपतीची अधिकाधिक गणेशतत्त्व असणारी चित्रे काढू शकले.’
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१७.८.२०१७)
ई-मेल : mav.research2014@gmail.com
सूचना १:
ही वातावरणातील प्रभावळीची चाचणी असल्याने ‘पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ छायाचित्र क्र. २, ३ आणि ४ यांची तुलना मूळच्या प्रभावळीशी (छायाचित्र क्र. १ शी) करतांना छायाचित्रांतील पटल, तसेच छायाचित्रे यांवरील रंग येथे ग्राह्य धरलेले नाहीत.
सूचना २ :
‘पिप’ छायाचित्रात पोपटी किंवा पांढरा (निळसर पांढरा) हे उच्च सकारात्मक स्पंदनांचे दर्शक असलेले रंग दिसू लागल्यास काही वेळा पिवळा, गडद हिरवा किंवा हिरवा या सर्वसाधारण सकारात्मक स्पंदनांच्या दर्शक रंगांचे प्रमाण घटते किंवा ते रंग पूर्णपणे दिसेनासे होतात. हा चांगला पालट समजला जातो; कारण त्या वेळी सर्वसाधारण सकारात्मक स्पंदनांची जागा त्यापेक्षाही उच्च प्रतीच्या सकारात्मक स्पंदनांनी घेतलेली असते.
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात. • सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’, याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात. |