सक्षम भारत !
जगप्रसिद्ध तंत्रज्ञ आणि ‘मायक्रोसॉफ्ट’ आस्थापनाचे सर्वेसर्वा बिल गेट्स यांनी मागील मासात ‘डिस्कव्हरी’ वाहिनीच्या एका कार्यक्रमात भारताचे कौतुक करतांना म्हटले, ‘‘भारताकडे संपूर्ण विश्वाला कोरोनाची लस पुरवण्याची क्षमता आहे. भारतात कोरोना रुग्णांचे प्रमाण तुलनेत न्यून असूनही भारताने लसीच्या संदर्भात महत्त्वपूर्ण काम केले आहे. भारतात एरवीही जगाच्या तुलनेत सर्वाधिक लसनिर्मिती होते आणि ती निर्यात केली जाते. आता भारत विश्वभरातील औषध आस्थापनांचे संशोधन आणि औषध पुरवठा याच्याशी संबंधित ‘कोऑलिशन फॉर एपिडेमिक प्रिपेअर्डनेस इनोव्हेशन्स’ या संस्थेत सहभागी झाला आहे. बिल गेट्स यांची संस्था भारत सरकार आणि भारतातील विविध संशोधन संस्था यांच्या संपर्कात आहे.’’ यानंतर ८ ऑगस्टला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषित केले, ‘‘औषधे बाहेरून मागवू नका; अमेरिकी आस्थापनांकडून ती खरेदी करा, अमेरिका सक्षम होत आहे.’’ असे सांगण्याची वेळ त्यांच्यावर येऊ घातलेल्या निवडणुकांमुळे आली कि चीनला शह देण्यासाठी त्यांनी ही घोषणा केली, हे आपल्याला ठाऊक नाही; परंतु भारत-चीन संघर्षात अमेरिकेने खरोखरंच असे धोरण अवलंबले, तर भारताची हानी होऊ शकते; कारण प्रतिवर्षी ४० ते ४२ सहस्र कोटी रुपयांची औषधे अमेरिकेत पाठवली जातात. बिल गेट्स यांनी म्हटले की, मी वर्ष २०१६ मध्ये ट्रम्प यांच्यासमवेत महामारीच्या संदर्भात चर्चा केली होती. पुढे त्यांनी म्हटले की, गेल्या काही वर्षांत मी अनेक देशांच्या प्रमुखांना भेटलो आणि महामारीविषयी चर्चा केली आहे; काही देशाच्या प्रमुखांनी ती गांभीर्याने घेतली होती. येथे लक्षात घेण्याचे सूत्र म्हणजे अन्य अनेक विषयांप्रमाणेच भारतात महामारीच्या संकटाला तोंड देण्याची क्षमता अधिक आहे, हे पुन्हा एकदा बिल गेट्स यांच्या मुखातून आले आहे.
संयम आणि बंधने भारतियांची बलस्थाने !
विदेशात लोक सहसा सामाजिक नियम पाळतात; कारण ते राष्ट्रभक्त असतात, असे चित्र दिसते; मात्र कोरोनासारखा भयंकर आपत्काळ आला असतांना त्यासाठी लागणारी बंधने पाळण्यात विदेशी अपयशी ठरत असल्याचे वेगळे चित्र समोर येत आहे. ब्राझिलमध्ये कोरोनाचा हाहाःकार झालेला असतांनाही फूटबॉल सामने घेण्यात आले. त्यानंतर कोरोनाचे रुग्ण प्रचंड प्रमाणात वाढले. प्रसिद्ध फूटबॉलपटू रेनॉल्डने यावर टीकाही केली होती. यामध्ये कुणाची काय आर्थिक गणिते दडली असतील ती असतील; पण संबंधित उत्तरदायींना लोकांच्या जिवाची पर्वा नव्हती, हेच यातून सिद्ध झाले. इटलीमध्ये तर ‘विनाशकाले विपरीतबुद्धिः ।’ उफाळून आली. चिनी लोकांना वेगळे न पाडता, त्यांच्यावर टीका न करता त्यांना आलिंगने द्या, अशा आशयाची ध्वनीचित्रफीत तेथील एका महापौरांनीच प्रसारित केली आणि शहरभर इटलीकर चिन्यांना आलिंगने देत सुटले. गंभीर आपत्काळात यासारखी अत्युच्च मूर्खपणाची गोष्ट आतापर्यंत जगात कुठे घडली नसेल. यामागेही अर्थात्च चीनची आर्थिक गणिते असू शकतात, असे कुणाला वाटले तर चूक ठरणार नाही.
नुकत्याच अमेरिकेत शाळा चालू केल्या; परंतु ८ दिवसांतच प्रचंड मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आणि शिक्षक कोरोनाग्रस्त झाले. या सर्व पार्श्वभूमीवर भारतातील बहुसंख्य नागरिक अतिशय सक्रीय चलनवलन करत असूनही त्यांनी पाळलेल्या संयमाचे वर्तन अतिशय उठून दिसते. हा संयम त्यांच्यातील मूलभूत आत्मिक शक्तीतून आलेला आहे. विदेशांच्या तुलनेत भारतातील गावांमध्ये आणि शहारातील इमारतींमध्ये अद्यापही गांभीर्याने काळजी घेतली जात आहे. विश्वात सर्वांत अधिक उत्सवप्रिय लोक भारतात आहेत आणि वर्षभर सातत्याने ते समूहाने उत्सव साजरे करण्याची त्यांची प्राचीन परंपरा आहे. कोरोनाच्या काळात बहुसंख्य हिंदूंनी राखलेला संयम अपूर्व आहे. आताही भारतात आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणि विमानात सामाजिक अंतर राखणे, मास्क बांधणे, ‘क्वारंटाईन’चे शिक्के मारणे आदी पद्धतशीरपणे केले जाते; मात्र अमेरिकेत या संदर्भातील काटेकोरपणा विमानतळावर आदी ठिकाणी अत्यल्प प्रमाणातच पहायला मिळत आहे. याला कारणीभूत आहे, तेथील नागरिकांची बंधने झुगारण्याची मानसिकता. विमानतळावर सामाजिक अंतर राखणे, मास्क बांधणे आदी उद्घोषणा सातत्याने झाल्या, तरी तेथील नागरिक मोठ्या प्रमाणात त्याचे उल्लंघन करतात, असे प्रत्यक्षदर्शी सांगतात. ‘हातावर शिक्के मारणे’ म्हणजे त्यांना सौंदर्यात बाधा वाटते. या सर्व अनिर्बंध व्यक्तीस्वातंत्र्याच्या कल्पनांमुळे अमेरिकी लोकांना मरणाच्या दारातही ही साधी बंधने पाळणेही कठीण वाटते. मृत्यूची भीती असूनही तेथील लोक कोरोनाचे नियम पाळण्याच्या संदर्भात गंभीर नाहीत. अतिरेकी व्यक्तीस्वातंत्र्याच्या मानसिकतेमुळे आणि कायद्यामुळे शासनही त्यांना एका मर्यादेपेक्षा बंधने पाळण्यासाठी आग्रह करू शकत नाही. ‘आई ओरडली म्हणून खटला भरण्याची’ मानसिकता असणार्या या देशातील लोकांच्या व्यक्तीस्वातंत्र्याच्या अतिरेकाचे दुष्परिणाम कोरोनाच्या मृत्यूदराच्या रूपाने आपण पहात आहोत. या पार्श्वभूमीवर भारतियांची बंधने पाळण्याची मानसिकता तुलनेत पुष्कळ चांगली आहे, असेच म्हणावे लागते.
भारतात आता रुग्णांची संख्या प्रचंड वाढल्याने आणि त्या तुलनेत सेवा-सुविधांचा अभाव होणे अन् खासगी रुग्णालयांकडून रुग्णांना लुबाडले जाणे अशी स्थिती काही ठिकाणी निर्माण झाली आहे; परंतु तरीही भारताने हात टेकलेले नाहीत; ज्यांना बंधने नको आहेत, त्यांच्यावरही कधी नियंत्रण ठेवून, कधी त्यांना चुचकारून, कधी थोडे त्यांच्या मनाप्रमाणे करून केंद्र आणि राज्य सरकारांनी ही लढाई चालू ठेवली आहे. ११ ऑगस्टला सर्वाधिक कोरोनाबाधित १० राज्यांना आवाहन करतांना पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘‘अधिक रुग्ण असणार्या १० राज्यांनी कोरोनाच्या लढाईत यश मिळवले, तर देश कोरोनाच्या लढाईत जिंकेल.’’ पंतप्रधान देशाला म्हणजे नागरिकांना जिंकवण्यासाठी सिद्ध आहेत. नागरिकांनीही त्यांची विवेकबुद्धी जागृत ठेवून देशाला जिंकवण्याची, म्हणजे कोरोनामुक्त करण्याची संधी साधण्यासाठी प्रयत्नरत रहावे, यासाठी श्रीकृष्णचरणी प्रार्थना !