सावंतवाडी शहरात आज दहीहंडी उत्सव साध्या पद्धतीने साजरा होणार
सावंतवाडी – शहरात प्रतीवर्षी दहीहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. विविध मंडळांच्या माध्यमातून शहरात २० हून अधिक हड्या बांधल्या जातात; मात्र यंदाच्या वर्षी कोरोनाचे संकट असल्याने १२ ऑगस्टला दहीहंडी उत्सव साध्या पद्धतीने करण्यात येणार आहे. शहरात नागरिकांनीही अन्य हंड्या बांधू नयेत, तसेच हंडीच्या ठिकाणी येऊन गर्दी करू नये, असे आवाहन युवा सामाजिक कार्यकर्ते अमेय तेंडोलकर, तसेच सावंतवाडी पोलिसांनी केले आहे.
शहरातील सालईवाडा येथील श्रीकृष्ण मंदिराजवळ मानाची हंडी फोडली जाणार आहे; मात्र यंदा या हंडीची उंचीही ६ फुटांपेक्षा अल्प असणार आहे. मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत सामाजिक अंतर पाळून, मास्क, सॅनिटायझरचा वापर करून हंडी फोडली जाणार आहे. त्यानंतर शहरातून प्रतिकात्मक मिरवणुकीने श्रीकृष्ण मूर्तीचे साध्या पद्धतीने विसर्जन होणार आहे, असे तेंडोलकर यांनी सांगितले.