आध्यात्मिक पातळी न्यून झालेल्या साधकांनो, ‘निराश न होता आपण साधनेत कुठे न्यून पडलो ?’, याचा तत्त्वनिष्ठतेने अभ्यास करा आणि इतरांचे साहाय्य घेऊन साधनेचे नेमकेपणाने प्रयत्न करा !
‘गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने प्रसिद्ध झालेल्या आत्मोन्नतीदर्शक आढाव्यामध्ये काही साधकांची आध्यात्मिक पातळी न्यून झाली आहे. पातळी न्यून झाल्यास साधकांना निराशा येते. वर्षभर व्यष्टी आणि समष्टी साधनेचे अपेक्षित प्रयत्न न झाल्यास आध्यात्मिक पातळी न्यून होते. वर्षभर चांगले प्रयत्न केल्यास साधकांची आध्यात्मिक पातळी १ टक्का वाढते, तर सातत्याने अधिकाधिक चांगले प्रयत्न केल्यास ती २ टक्केही वाढू शकते. पातळी न्यून होण्यामागे शारीरिक आजार, मानसिक त्रास, अनिष्ट शक्तींचे आक्रमण, कौटुंबिक अडचणी, मायेत अडकणे, तसेच स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया गांभीर्याने न करणे, समष्टी सेवेत गंभीर चुका करणे आदी अनेक घटक कारणीभूत असतात.
पातळी न्यून झालेल्या साधकांनी नकारात्मक विचार न करता ‘मी साधनेत नेमके कुठे न्यून पडलो ?’, याचा तत्त्वनिष्ठतेने अभ्यास करावा. आपले साधक-कुटुंबीय आणि सहसाधक यांचे साहाय्य घ्यावे. ‘आपल्या साधनेची दिशा योग्य आहे का ?’, याविषयी व्यष्टी साधनेचा आढावा घेणारे, तसेच उत्तरदायी साधक यांना विचारावे. आपण साधनेत १ पाऊल मागे आलो असलो, तरी मनापासून प्रयत्न केल्यास ४ पावले पुढे जाता येणार आहे’, हे मनावर बिंबवावे. अध्यात्मात तळमळीला ८० टक्के महत्त्व असल्याने साधनेचे प्रयत्न तळमळीने अन् चिकाटीने करावेत.
साधकांनो, ‘माझी आध्यात्मिक पातळी वाढली नाही’, या नकारात्मक विचारांत न अडकता सकारात्मक राहून तळमळीने प्रयत्न करण्यातील आनंद घ्या !’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.७.२०२०)